म्हणून या देशामध्ये आपण जे म्हैसीवर अवलंबून आहोत, ते म्हैसीवर अवलंबून न राहता, आपणास गायीचे दूध वाढविण्याचा आणि गायींच्या जातींच्या विकास करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि त्यासाठी त्यांच्यातीलच काही मूलभूत प्रश्न शोधून, कोणत्या पद्धतीने त्या क्षेत्रात जावयाचे, याचा विचार कराव लागेल. मी पाहिले आहे की, आपल्या देशामध्ये दोन तीन प्रकारच्या गायी, या थोडं बरं दूध देतात. त्यामध्ये एक ‘थरपारकर’ दुसरी ‘सायवाल’ तिसरी ‘गीर’ चवथी ‘राठी’ आणि मग आपल्या विभागामध्ये आढळणा-या, होणा-या ज्या गायी आहेत, त्यामध्ये माजी पशुसंवर्धन खात्याचे संचालक, मुन्शी श्री. अब्दुल रहेमान, यांनी परिश्रमाने संशोधन करून निर्माण केलेली ‘देवणी’ ही पाचवी जात जरा बरी आहे. आपल्याकडील गायी पहिल्या चार गायींच्या तुलनेने तशा कमीच दूध देणा-या आहेत. ‘सायवाल’ ही जात तशी पाकिस्तानमध्ये गेली आहे. त्याचा काही भाग पंजाबला लागून आहे. ज्या ट्रॅकमध्ये (पाकिस्तानातील) ‘सायवाल’ जातीची गाय होती, आता काही भाग जो भारतामध्ये राहिला आहे, तेथे तेवढी ती आज उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ‘थरपारकर’ नावाचा जो डिस्ट्रिक्ट सिंधला लागून आहे. त्या थरपारकर डिस्ट्रिक्टमध्येच ‘थरपारकर’ गायी होत्या. राजस्थानच्या बॉर्डरवरती त्या आजही उपलब्ध होतात, पण फार कमी प्रमाणात. चोरट्या आलेल्या तरी मिलतात किंवा जी गावे आपल्या विभागाकडे राहिली तेथे एकमेकांची नाती-गोती असलेल्या ठिकाणी गेलेल्या गायी तेवढ्चायच पहावयास मिळतात. जोधपूरच्या मार्केटमध्ये त्या कधी कधी पहावयास मिळतात. या दोन्हीही महत्वाच्या जाती पाकिस्तानमध्ये गेल्या आहेत. तिसरी ‘गीर’ ही जात राजस्थानच्या काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. परंतु तिचा ड्राय पिरियड म्हणजे भाकड काळ, या अगोदर सांगितलेल्या दोन्ही जातींपेक्षा जास्त आहे चवथी जी गायीची जात आहे, ती म्हणजे ‘राठी’ ती अतिशय काटक, कणखर कष्टाळू व कोणत्याही नैसर्गिक परिस्थितीमध्ये टिकणारी अशी गाय आहे. ही राठी गाय बिकानेर नावाच्या संस्थानच्या आसपासच्या प्रदेशात उपलब्ध आहे. तिला जरी दिवसाआड पाणी मिळाले, तरी ती टिकाव धरते. कारण त्या भागामध्ये दोन-दोन, तीन-तीन वर्षे पाऊसच पडत नाही. जनावरांना पाणी पाजावयाचे म्हटले तरी पाच-पाच, सहा-सहा मैल जनावरे न्यावी लागतात. तेव्हा पाणी मिळते. (पाजता येते). अशा प्रकारच्या अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकणारी ही जात आहे. या चारही चांगल्या गायींचा विचार केला असता, त्यामध्ये ‘राठी’ चा शेवटचा नंबर लागतो. ‘गीर’ चा तिसरा नंबर लागतो. परंतु ‘राठी’ आणि ‘गीर’ या दोन्ही गायी आपल्या इकडे आणायला बंधन आहे. राजस्थान आणि गुजराथच्या काही भागमध्ये या दोन्ही जातीच्या गायी मिळतात. पण आपल्याकडे आणायला अवघड जातात. ‘थरपारकर’ आणि ‘सायवाल’ ह्यांची मी अगोदरच कथा सांगितली आहे. त्या दोन्ही जाती पाकिस्तनमध्ये गेल्या आहेत. आणि ह्या दोन आणता येत नाहीत. अशी परिस्थिती आहे.
अशा वेळी तुमच्या आमच्या समोर कोणता पर्याय राहतो? पर्याय एकच राहतो व तो म्हणजे, आपल्या विभागातील काही चांगल्या जातीच्या, चांगल्या बांध्याच्या चांगल्या कांतीच्या, थोड्याशा सकस प्रकृतीच्या, ज्यांची जीन थोडीसी सॉफ्ट आहे, त्या शोधून काढल्या पाहिजे. अशा गायीमध्ये दूध देण्याचे जे कॅरेक्टर आहे, ते तपासावे लागते. ते कॅरेक्टर कशावरून पहावयाचे, तर ते त्या गाईचा बांधा, तिची कातडी, इत्यादी गोष्टींशी गायीच्या दूध देण्याचा, म्हणजे कॅरेक्टरचा संबंध असतो. म्हणून असा प्रकारच्या गायी शोधून त्यावर आपणाला क्रॉस करून घ्यावा लागणार आहे. अशा गायीवर क्रॉस करताना, कोणत्या जातीच्या वळूचा क्रॉस करावयाचा, याचाही विचार करावा लागणार आहे. क्रॉस केल्यानंतर त्यांच्यामध्ये पन्नास टक्के गायी आणि पन्नास टक्के खोंड होणार आहेत, हे गृहीत धरले पाहिजे. पन्नास टक्के मेल आणि पन्नास टक्के फिमेल जसे माणसांमध्ये आहे, तसेच जनावरांमध्येही आहे. एखादा भाग्यवान मिळतो की, त्याला सगळेच मुलगे होतात व एखादा दुर्दैवी असतो की, त्याला सगळ्याच मुली होतात! परंतु गायींच्या बाबतीमध्ये ज्याच्या गायीला जास्त कालवडी झाल्या, तो खरा भाग्यवान! पण असे नेमके त्या क्षेत्रामध्येही होत नाही. आणि त्यामुळे पन्नास टक्के गायी होणार व पन्नास टक्के खोंड होणार हे गृहीत धरून, आपण त्या कार्यक्रमाकडे वळले पाहिजे. आपणास हे कळत असताना सगळे शास्त्रीयदृष्टीकोन स्वीकारून कोणत्या जातीपासून कोणती पैदास केली पाहिजे, यामध्ये नुसते ज्यापासून क्रॉस करावयाचे जे फौंडेशन मानावयाचे, तो वळूच महत्वाचा नसून त्याबाबतील गाय कोणती आहे, हेही महत्वाचे ठरते. याक्षेत्रामधले जे काही जाणकार लोक आहेत, त्यांच्यामध्ये याबाबतीत अजूनही मतभेद आहेत. ते नेहमी सांगतात की, ‘वळू’ ची कॉरेक्टर्स पाहिली पाहिजेत. गायीची कॉरेक्टर्स पहाण्याची गरज नाही. ती कोणत्याही निकशाची असली तरी चालेल. मात्र काही मंडळी म्हणतात की, ‘गायीमधले चांगले गुण हे सुद्धा विचारात घेतले पाहिजेत.’ विशेषतः आपण शेतीमध्ये पहातोच की, एखाद्या सकस जमिनीमध्ये हायब्रीडचा एखाद्या वाण आपण केला व तो वाण मध्यम प्रतीच्या व हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये केला, तर त्याचा उतार सर्वच जमिनीमध्ये सारखा मिळतो असे नाही. बियाणो सारखे असले तरीही ते शक्य होत नाही. आणि तोच निकश याही क्षेत्रातमध्ये – या क्रॉस ब्रिडींगच्या क्षेत्रामध्ये मादी ही कोणत्या तरी निकशावर पाहिली पाहिजे, असा विचार करण्याची आवश्यकता आहे. मात्र अजून तज्ञ मंडळी या मुद्याशी सहमत व्हायला तयार नाहीत.