महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण एकाच पात्रातून प्रवाहित होऊ शकले नाही ही एक ऐतिहासिक वस्तुस्थिती असली तरी त्यांचे प्रवाह १९ व्या शतकाच्या शेवटपर्यंत एकमेकांच्या समांतर वाहत होते ही गोष्ट मात्र लक्षणीय आहे. ह्या दोन्ही प्रवाहामधील अंतर अधिक नव्हते ही गोष्टही आपण ध्यानात घेतली पाहिजे. एकमेकांना समांतर वाहणा-या या दोन्हीही प्रवाहातील पाण्याला एकाच मातीचा रंग व वास प्राप्त झालेला होता. कारण महाराष्ट्रात एकाच व्यासपीठावरून सामाजिक व राजकीय चळवळींचा विचार मांडला जात होता. सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्यांना बळकटी देण्यासाठी आर्थिक स्वातंत्र्यही आवश्यक आहे. हा विचार समासुधारकांना व राजकीय नेत्यांना पटलेला होता. स्वराज्य हे शेवटी सुराज्यासाठी असेल तर या देशातील आर्थिक आणि सामाजिक विषमताही घालवावी लागेल आणि त्यासाठी संघर्षही करावा लागेल याची जाणीव महाराष्ट्रातील ब-याच विचारवंतांना झाली होती यात शंका नाही. समाजकारण आणि राजकारण करण्यासाठी काही अंशी वेगळ्या प्रवृत्ती व प्रेरणा लागतात याचीही कल्पना त्यांना होती. त्या दृष्टीने आपल्या असे लक्षात येईल की महाराष्ट्रातील समाजकारणामागे मानवतावादी प्रेरणा होत्या, तर राजकारणामागे राष्ट्रवादी प्रेरणा होत्या, मानवतावादी प्रेरणा ह्या अधिक उदात्त असतात. तर राष्ट्रवादी प्रेरणा ह्या अधिक प्रभावी असतात. मानवतावाद हा नेहमीच सखोल व विशाल पात्रातून वाहणारी, राष्ट्राराष्ट्रातील सीमा रेषांना ओलांडून पुढे जाणारी नदी असते. या नदीतील पाणी संथ असते. या उलट राष्ट्रवाद हा प्रामुख्याने एकाच भूप्रदेशात आणि कांहीशा अरूंद पात्रातून वाहणारी नदी असते. आणि म्हणूनच तिचा वेग अधिक तीव्र असतो. महाराष्ट्रातील समाजकारणाचा व राजकारणाचा अभ्यास करीत असताना त्यांच्यातील ह्या फरकाचीही दखल आपल्याला घ्यावी लागते.
आधुनिक महाराष्ट्रामध्ये समाजसुधारणेचा किंवा समाजपरिवर्तनाचा प्रथमतः ज्यांनी अगदी प्रकर्षाने विचार केला त्यात लोकहितवादी, बाळशास्त्री जांभेकर, विष्णुबोवा ब्रह्मचारी, महात्मा ज्योतिराव फुले, आगरकर आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या नावांचा आवर्जून उल्लेख कराव लागेल. या व्यक्तींनी आमच्या सामाजक अवनतीची कारणमीमांसा तर केलीच, पण त्याचबरोबर त्यांनी ती दूर करण्याचे उपायही सुचविले. समाजोन्नतीचे मार्ग त्यांनी शोधले, धुंडाळले. या विचारवंतांनी तथा समाजसुधारकांनी मराठी मनात सामाजिक जाणिवा निर्माण करण्याचा फार मोठा प्रयत्न केला. त्यांच्या विचारांनी आंधळ्या श्रद्धांवर आघात केले. आमच्या रूढीप्रीय समाजाच्या पाठीवर त्यांनी कठोरतेन कोरडे ओढले. त्यांनी व्यक्त केलेले विचार आजही आपल्याला उपयुक्त ठरणारे आहेत. समाज पुरुषाला सातत्याने जागं ठेवण्याचं सामर्थ्य आजही त्यांच्या विचारात आपल्याला सापडेल. या सर्व विचारवंतांच्या व समाजघधुरिणांच्या विचारांचा व कार्याचा तपशिलात जाऊन आढावा घेणे वेळेच्या अभावी शक्य नाही.
लोकहितवादींची “शतपत्रे” आपल्यापैकी ब-याच जणांनी वाचली असतील. सनातनी परंपरेच्या चिखलात खोलवर रूतून बसलेल्या समाजाचा गाडा वर काढण्याची व पुढे ढकलण्याची शक्ती त्यांच्या विचारांनी आम्हाला दिली. सामाजिक गुलामगिरी लादणा-या आपल्याच घरातील शत्रूविरूद्ध त्यांनी क्रांतीकारी विचारांचे धनुष्य उचलले ब्राह्मणावर कसलाही मुलाहिजा न बाळगता त्यांनी प्रखर हल्ले केले. या ठिकाणच्या जातिव्यवस्थेच्या विरूद्ध त्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली. माणसानेच माणसावर लादलेल्या अमानुषतेविरूद्ध त्यांनी वैचारिक लढा पुकारला. सामाजिक गतिसिद्धांतांची त्यांनी आजच्य सुशिक्षित लोकांना ओळख करून दिली. मरगळलेल्या समाजपुरुषाला परिवर्तनाच्या वाटेवर चालण्याचे त्यांनी आवाहन केले.
लोकहितवादींनी तात्कालिन सामाजिक प्रश्नांवर भाष्य तर केलेच; पण त्याच बरोबर राजकीय विचारांची दखल देखील त्यांनी घेतली. सामाजिक लोकशाहीचा विचार मांडित असतानाच राजकीय लोकशाहीची वैचारिक मांडणीही त्यांनी केली. लोकशाही संकल्पनेची सामाजिक बाजू ही राजकीय बाजू एवढीच मोलाची व महत्वाची आहे याचा प्रत्यय लोकहितवादींचे निवंध वाचीत असताना आपल्याला येतो. समाजकारण आणि राजकारण हे एकमेकांपासून विभक्त करता येत नाहीत, हाच आशय लोकहितवादींच्या लिखाणातून व्यक्त होतो, हे आपण विसरता कामा नये. इंग्रजी सत्तेमुळे समाजसुधारणेची प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू झाली याची डोळस जाणीव त्यांना होती. इंग्रज या देशात आले नसते आणि इंग्रजी विद्येचा लाभ एतद्देशियांना लाभला नसता तर समाज परिवर्तनाचं किंवा जनजागरणाचं युग भारतात निर्माण झालं नसतं याची पुरेपूर कल्पना लोकहितवादींना होती.