व्याख्यानमाला-१९७८-१३

दुसरा मार्ग म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वंकष क्रान्तीचा मार्ग, या मार्गानेच क्रान्ती होईल. अन्यथा अत्याचार कधीच थांबणार नाहीत. हिंसाचार हिंसाचारालाच जन्म देतो, सू़ड हा सूडच प्रसवील. म्हणून हे चक्र थांबले पाहिजे.

या शारीरीक अत्याचाराबरोबर एक प्रकारचा मानसिक अत्याचार दलितवर्गीयांना विशेषत: त्यातील शिक्षित तरुणांना सोसावा लागतो शासकीय कार्यालये, उद्योधंदे, विद्यापीठे, शिक्षणसंस्था इ. ठिकाणी राखीव जागावर दलित व्यक्तीच्या नेमणुका होतात. या राखीव जागामुळे दलितेतर व्यक्ती दलिताचा राग करतात, त्याना घालून पाडून बोलतात त्यांची अवहेलना करतात, त्यांना अकार्यक्षम ठरविण्यासाठी वेगवेगळे उपाय योजतात आणि पर्यायाने दलिताला भाकरी देखील निश्चितपणे खाता येत नाही तर काही दलितेतर अधिकारी आपल्या सत्तेचा, पदाचा वापर करुन त्याला हैराण करतात. एका बुद्धिमान दलित तरुणाला पदोपदी अपमानित करुन त्याला राजिनामा द्यायला लावल्याची कथा मला माहीत आहे अशा अनेक कथा सांगता येतील. तसेच एका दलित वर्गातील स्त्री डॉक्टरला रोग्यांना औषधोपचार करण्याची किंवा बाळंतपणाच्या केसेस हाताळण्याची संधी न देता प्रशासकीय कामात सतत गुंतवून ठेवून तिचा मानसिक छळ केल्याची एक घटनाही मला माहीत आहे. दलित वर्गावरचे हे मानसिक अत्याचार उजेडात येत नाहीत. पण हळुहळू चाललेल्या छळाला परिणाम त्या माणसाच्या मनावर होतो. एक नव्याने उमलणारे मन कुसकरुन टाकणे बरोबर नाही.

म्हणून शतकानुशतके बद्ध असलेल्या या समाजाला मुक्ततेचा मार्ग दाखविण्यासाठी बाबासाहेबांनी म्हटले होते की अन्यायासमोर नम्र होऊ नका. या देशातील माणसाचे मन बदलण्यासाठी नव्या संस्काराची नव्या दृष्टीची गरज आहे. विद्रोहाची वाट धरल्याशिवय नवा सूर्य उगवणार नाही हेच खरे.

डॉ. आंबेडकरांचे तत्त्वज्ञान हे माणसाला मोठे मानणारे तत्त्वज्ञान आहे. या तत्त्वज्ञानाचा अंगीकार करुन अत्याचारांना सामोरे जायला पाहिजे. या तत्त्वज्ञानात निर्भयपणावर भर आहे. म्हणून जे दुबळे मागासलेले आहेत ते भयग्रस्त आहेत. तुम्हाला आम्हाला निरनिराळ्या भयांनी ग्रासलेलं आहे. भय सत्तेचं आहे, पंथाचं आहे पक्षाचं आहे, धर्माचं आहे, राजकारणाचं आहे, नोकरशाहीचं आहे. विज्ञानाच्या भयानंतर माणसाचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. आपल्या शिरावर संहाराची सतत टांगती तलवार आहे. जो भयग्रस्त समाज असतो त्याची वाढ खुंटते. म्हणून भयमुक्त समाज ही आजची गरज आहे.

आपल्या समाजाच्या नुसत्या चिरफाळ्या उडालेल्या आहेत. एका गटाचे दु:ख दुस-या गटाला जाऊन भिडत नाही. जो तो म्हणतो मला काय त्याचे ? अशा उदासीन, फुटीर वृत्तीने समाजाची विघटनाची प्रक्रिया वाढतच जाईल, असंतोष वाढतच जाईल. या फुटीरवृत्तीमुळे, असंतोषामुळे माणूस दु:खी होत जाईल. बाबासाहेबांनी बुद्धधर्माचे तत्त्वज्ञान मांडले ते हे तत्त्वज्ञान माणसाला कल्याणाची दिशा दाखवील म्हणून. "शोषणा" च्या विरुद्ध उभे राहणारे बौद्धमत बाबासाहेबांनी जाणिवपूर्वक स्वीकारले. बाबासाहेब म्हणत की मानवमुक्तीचा लढा कोणाच्या तरी निशाणाखाली जाऊन लढू नका. ज्याचा लढा त्याचेच निशाण हवे. ते निशाण म्हणजे माणुसकी मानणारे निशाण. या निशाणाखाली बाबासाहेबांचा विचार घेऊन देशाच्या कानाकोप-यांतून माणसे हळूहळू जमा होऊ लागली आहेत. एक दिवस या विचाराच्या तेजांतून वणवा पेटेल व त्यात सर्व प्रतिगामी प्रवृत्ती, शोषक प्रवृत्ती नष्ट होतील. असा दिवस एकदा उजाडेल यात मला तरी कोणतीच शंका वाटत नाही. कारण वामन निंबाळकर म्हणतात त्याप्रमाणे -

या गावकुसाबाहेरचा काळोख मावळणाराहे
आमच्या ओठातील प्रकाशगीताचे स्वर
दाही दिशांना धंद करणार आहेत
असे सारे एकत्रित या,
हातात हात घालून प्रकाशाचे गीत गा

माझे तरी यापेक्षा दुसरे काय म्हणणे आहे. प्रकाशाचे गीत गा.