व्याख्यानमाला१९७३-१४

इथल्या समाजवादयांचा तर अधिक आहे. जिल्हा परिषदांकडे सत्ता द्या, ग्रामपंचायतीकडे सत्ता द्या पंचायत समित्यांकडे सत्ता द्या आणखी सत्ता विकेंद्रीकरण करा. हा सत्ता विकेंद्रीकरणाचा जो मृलमंत्र आहे, हा गांधीवादातून या समाजवाद्यांच्यामध्ये आला ही चांगली गोष्ट, आणि तिसरी गोष्ट सत्याग्रह करणारी मंडळी तुम्हाला कोठेही सापडणार नाहीत. अर्थात या सत्याग्रहाचा कधी कधी अतिरेक होतो. नको इतका त्याचा अतिरेक होतो. आणि याचं मूळ अर्थातच लोहियांच्या विचारातच आहे, लोहियांबद्दलच मी काही फार विवेचन करीत नाही.

पण लोहिया एक मोठे विचारवंत होते यात शंका नाही. पण कधी कधी ते कसे एका टोकाला जात होते याचं मी आपणाला फक्त एकच उदाहरण देतो १९५३/५४ साली लोहियांनी एक अशात-हेचा सिध्दांत मांडला होता की Theory of irrelevance, Equalirrelevance  म्हणजे या देशातले सगळे जे राजकीय पक्ष आहेत ते irrelevant  आहेत समाजवाद आणायला. समाजवाद कुणी आणूच शकत नाही. समाजवादीपक्ष जो आहे हाच फक्त समाजवाद आणू शकेल. कॉंग्रेसही आणू शकणार नाही. दुसरा कोणताही पक्ष आणू शकणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी Equidistance  Theory  मांडली होती. सगळ्याच राजकीय पक्षापासुन तुम्ही समान अंतरावर राहा अशा त-हेचा आदेश त्यांनी आपल्या अनुयायांना दिला होता. Equidistance  Theooy.  सगळ्यांच्या पासून समान अंतरावर राहायचं कोणालाही जवळ येऊ द्यायचं नाही. कोणाच्या जवळ जायच नाही कारण ते सगळेच irrelevant  आहेत. अशात-हेचा त्यांनी एक सिध्दांत मांडला होता. १९६४ साली त्यांनी असा एक सिध्दांत मांडला की भारतातील कोणत्याही पक्षाबरोबर तुम्ही समझोता करा आणि कॉंग्रेसला विरोध करा. कोणत्याही म्हणजे अगदी नक्सलवाद्यांशीही सहकार्य करा. डाव्या कम्युनिस्टांशी करा. जातीयवाद्यांशी करा, पटेल त्या पक्षाशी सहकार्य करा आणि कॉंग्रेसला विरोध करा. ५४ साली जे लोहिया सांगत होते की, कोणत्याही पक्षाबरोबर आम्हाला सारख्याच अंतरावर राहायचं आहे. हेच लोहिया ६४ सालामध्ये सांगायला लागलेत की, जगातील वाटेल त्या शक्तीबरोबर सहकार्यकरा, आणि कॉंग्रेसला विरोध करा. आणि त्याच्यातून पुढे काय निर्माण व्हायचे ते झालं पण सत्याग्रहाचा अतिरेक जो आहे तो वाईटच आहे. गांधीच्यामध्ये सत्याग्रहाची जी एक मूळ कल्पना होती की माणसातला परमेश्वर जागा करावा. माणसातल्या सतप्रवृती जाग्या कराव्यात, त्याचा ह्द्यपालट करावा, त्याचं मन:परिवर्तन कराव ते आत्मक्लेशामधून ही भूमिका गेली आणि लोहीयांनी सत्त्याग्रह हे एक राजकीय हत्यार म्हणून वापरायला सुरूवात केली. आणि त्यामुळे त्यामागील प्रेरणा व स्वरूपात मूलभूत बदल झाला. तो इतिहास वेगळा आहे. पण गांधीवादाचा प्रभाव या देशातील समाजवाद्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर झाला आहे, तो इतका की, समाजवादी कधी कधी गांधीवादाहूनही अधिक गांधीवादी आहेत असं वाटू लागतं इतका तो प्रभाव पडलेला आहे. मला स्वत:ला भारतीय समाजवादाच्या संदर्भामध्ये हा जो प्रभाव आहे त्यांतील काही भाग जो आहे तो चांगला आहे वाटत. त्यातील सत्ता विकेंद्रीकरणाचा भाग जो आहे तो चांगला आहे. तो छोट्या छोट्या उद्योगधंद्यावर जो आपला भर आहे. आणखीही दिला गेला पाहिजे. शेतीवर आपला आणखी अधिक भर असला पाहिजे. यूरोपमध्ये केवळ औद्योगिकरणापासून प्रश्न सुटलेले होते, आपल्या सबंध अर्थव्यवस्थेचा कणा शेती हा आहे. इंग्लंडमधल्या एक प्राध्यापिका आल्या होत्या काही वर्षापूर्वी पुण्याला. त्यांनी सांगितलं की बुवा ! तुमच्या देशामध्ये मी अनेक लोकांना भेटले आहे. प्रत्येकजणाला या उद्योगधंद्याचे आणि कारखान्याचे इतके विलक्षण आकर्षण आहे की शेती हा तुमच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं काही दिसतच नाही. तुमच्या लोकांच्या बोलण्यावरून वगैरे हा ७/८ वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. ६५ नंतर आपण शेतीकडे आणखी जास्त लक्ष द्यायला सुरूवात केली. पण त्यावेळेला काव्यमय वर्णन केललं होतं की ज्या देशातील ७० % लोक शेतीवर अवलंबून आहेत, आणि ज्या देशातील ५० %  राष्ट्रीय संपती ही शेतीमधून येत आहे. अशा देशामध्ये शेतीला फार मोठे महत्वाचे स्थान आहे. आणि त्यानी सांगितल होत की खरोखर तुमच्यासारख्या देशामध्ये या धूर ओकणा-या गिरण्या, या गिरण्यांच्या चिमण्या ज्या आहेत. यांच्यापेक्षां वा-याच्या झुळकेबरोबर शेतामध्ये डोलणारे शेतीमधील पिके जास्त आहेत. जी कणसं आहेत ती तुमच्या वैभवाची खरी प्रतीकं आहेत, आणि ते अगदी खर आहे, आणि आपला संबंध जो विकास आहे, आपल्या समाजवादाला यापुढे जर काही लक्ष द्यावयाचं झालं तर शेतीविकासाकडे अधिक लक्ष द्यावं लागणार आहे, ही मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते आहे. आणि भारताच्या संदर्भात मला आणखी एक अशी महत्त्वाची गोष्ट वाटते आहे की आपला समाजवाद जो आहे तो कोणत्याही प्रकारचा सैध्दांतिक भूमिका घेऊन चालणारा असा नाही, तो वास्तववादी असला पाहिजे तो व्यवहारवादी असला पाहिजे, कारण समाजवाद म्हणजे काही विशिष्ठ तत्त्वांचा सांगाडा नव्हे. समाजवाद म्हणजे शास्त्रीय पध्दतीने अभ्यास करण्याची ती एक पध्दति आहे. It is a mode of  thinking,  काही ठोकळेबाज सिध्दांतांचा सांगाडा म्हणजे समाजवाद नव्हे, समाजवाद म्हणजे सामाजिक आर्थिक प्रश्नांचा शास्त्रीय पध्दतीने अभ्यास करण्याची एक पध्दती आहे.