abhinandan
यशवंतराव चव्हाण

अभिनंदन ग्रंथ

संपादक : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
--------------------------------  

 pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

उपोद्घात

गोपाळराव खेडकर
अध्यक्ष, महराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. यशवंतरावजी चव्हाण यांचा ४७ वा वाढदिवस नागपूर येथे सार्वजनिक रीतीने साजरा होत आहे ही गोष्ट अभिनंदनास व अभिमानास पात्र आहे. महाराष्ट्राचा भाग्योदय निश्चित होणार आहे, याचें एक शुभ महान् लक्षण म्हणजे महाराष्ट्राला पुरोगामी ध्येयवादाने प्रेरित झालेला प्रज्ञावंत तरुण नेतरा लाभला आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापन इतक्या लवकर होईल, विशेषत: संसदीय कायद्याने शिक्कामोर्तब होऊन द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाल्यानंतर इतक्या अनपेक्षित स्वरेनें होईल, याची कल्पना त्रिकालदर्शी मुनीशिवाय कोणालाहि करतां आली नसती. महाराष्ट्र राज्य व्हावें अशी तीव्र वासना प्रत्येक महाराष्ट्रीयाच्या हृदयात वसत होती हें जरी खरें असले तरी ते राज्य फार दुरावलें होतें. तें राज्य स्थापन व्हावें म्हणून रात्रंदिवस जे धडपडत होते व त्या राज्याकरिता तळमळून ज्यांचा निद्राभंग कायम झाला होता, ते सुद्धा निराशेच्या अंधारमय सागरांत पूर्ण बुडाले होते.  अशा परिस्थितींत श्री. यशवंतराव चव्हाण महत्त्वाच्या स्थानी नसते तर हा निराशेचा काळ अधिक लांबलाहि असता.

श्री. यशवंतराव चव्हाणांसारखे धीराचे नेते अशा स्थिती धीर न सोडतां धोरणीपणाने वागले, मुंबईतील अल्पसंख्यांकांचे हृदयपरिवर्तन घडवून आणलें, म्हणून नेत्यांचा विश्वास बसला व महाराष्ट्र राज्य स्थापना लवकर होऊं शकली. मुळांतच महाराष्ट्र राज्य निर्मितीला पुष्कळ अरिष्टे आलीं, अनंत अडचणींनी अडवून धरलें, तो आता गतेतिहास झाला व त्यावर विस्मृतीचा पडदा कायम पडला. आता महाराष्ट्र राज्याच्या मंगल प्रकाशांत आपण शुभजीवन जगूं लागलों आहोंत.

या सर्व घटना घडत असतांना त्यांच्या पाठीमागे दूरदर्शी, निश्चियी, त्यागी आणि पवित्र अशी एक विचारशक्ति शांत रीतीने आणि दृढमनाने अनुकूल दिशेने पावलें टाकीत होती. ती शक्ति होती श्री. यशवंतरावजी चव्हाणांची. त्यांचा ४७ वा वाढदिवस साजरा करण्याचा मान महाराष्ट्र जनतेतर्फे नागपूरला मिळत आहे याबद्दल नागपूरकरांचेंहि मी अभिनंदन करतो.

चव्हाणसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा अभिनदन ग्रंथ प्रकाशित होत आहे. हा ग्रंथ संपादित व मुद्रित करण्यास फारच अल्प कालावधि मिळाला आहे. अशा अभिनंदन ग्रंथांत लिहिण्यास उत्सुक व  योग्य असे अनेक विचारवंत लेखक आहेत. त्यांना समयाभावामुळे लेख लिहिण्यास सवडहि मिळाली नाही किंवा देतां आली नाही म्हणा, गेल्या सहा वर्षांच्या राजकीय धामधुमीच्या कालखंडांत श्री. यशवंतरावजी चव्हाण यांच्या सान्निध्यांत आलेल्या व सहकार्य करण्याचें भाग्य लामलेल्या शेकडो लहानमोठ्या व्यक्ति आहेत. श्री. यशवंतरावजींच्या दूरदर्शी सल्लामसलतीचा उपयोग करणा-या शासनांतील व संघटनेंतील शेकडो व्यक्ति आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेच्या विविध अंगाचे जवळून दर्शन घेणारे किती तरी लोक आहेत. त्यांतील मोजक्या व महत्त्वाच्या व्यक्तींचे विचार व अनुभव लेखनिविष्ट झाले ते बहुत मोलाचे ठरतील. त्याचप्रमाणें महाराष्ट्र राज्याच्या परिस्थितीचें मूल्यमापन आणि प्रगतीचें दिग्दर्शन करण्यास समर्थ असे पुष्कळ लोक सापडतात. त्यांचेहि लेखया अभिनंदन ग्रंथाला शोभादायक ठरले असते यांत शकां नाही. परंतु या ग्रंथास जे कांही लेख लेखकांनी वेळांत वेळ काढून लिहून दिले त्यांचेही महत्त्व फार आहे. हातांत सापडलेला पक्षी दूरच्या झाडावरील अनेक पक्ष्यांपेक्षा अधिक मोलाचा ठरतो, तसें या लेखांचे आहे.

श्री. यशवंतरावजींच्या नेतृत्वाचा अत्यंत प्रभावी असा हा प्रथम कालखंड आहे. श्रीयुत यशवंतरावजींच्या नेतृत्वावर महाराष्ट्र काँग्रेसची पूर्ण श्रद्धा आहे. श्री. यशवंतरावजींनी केवळ महाराष्ट्र काँग्रेसचा विश्वास संपादन केला असें नव्हे तर अखिल भारतीय काँग्रेसमध्येहि त्यांना एक थोर मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्याहिपेक्षा मोलाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रांतील विरोधी पक्षांनाहि त्यांनी ब-याच अंशी विश्वासांत घेतले आहे. महाराष्ट्रांतील सामान्य जनतेला पुष्कळ वर्षांनी फार दीर्घकाळाने आत्मविश्वास उत्पन्न करणारें आत्मप्रतीक श्री. यशवंतरावांमध्ये सापडलें आहे. महाराष्ट्र राज्याच्या सुसंघटित मांडणीचा खराखुरा आधारच हा होय. महाराष्ट्र राज्य हें समता प्रधान समाजाची रचना करण्यास समर्थ होईल असा भरवंसा या आधारामुळेच उत्पन्न होतो. सुसंघटित व व्यवस्थित असें हें लोकराज्य महाराष्ट्रांत वेगाने नवसमाजरचनेचा प्रयोग करावयास आज सज्ज झालें आहे. श्री. यशवंतरावजीचें नेतृत्व दीर्घकाळापर्यंत लाभलें तर हा प्रयोग यशाच्या शिखराला जाऊन पोहोचूं शकेल, व हें आदर्शभूत उदाहरण भारतांतील इतर प्रदेशांनाहि प्रगतीच्या मार्गांत स्फूर्तिप्रद ठरेल अशी आशा या. शुभ्र जन्मदिनी मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या नात्याने प्रदर्शित करतो.