संरक्षणाचे प्रश्न, देशाच्या ऐक्याचे व स्थैर्याचे प्रश्न, भारताचे कठीण आर्थिक प्रश्न व त्यांची सामाजिक पार्श्वभूमी व त्यांसाठी मूलभूत पुनर्रचनेची आवश्यकता, आजचे राजकारण डोळसपणाने करीत असतानासुद्धा भविष्यकाळाकडे आशेने पाहण्याची सवय, त्यांमधील उद्याचा भारत कसा असावा, वगैरे विषयासंबंधीचे माझे चिंतन या लेखांमधून वाचकांस पाहावयास सापडेल.
१९६७ आणि १९७७ या दोन वेळा झालेल्या हिंदुस्थानच्या सार्वत्रिक निवडणुका ह्या देशाच्या राजकारणाला कलाटणी देणा-या निवडणुका ठरल्या. या दोन्ही निवडणुकांकडे दृष्टिक्षेप टाकून परिस्थितीचे माझे विश्लेषण मी यांत दिले आहे. दहा वर्षांच्या कालखंडानंतर केलेली ही दोन्ही भाषणं असली, तरी यात काही समान वैचारिक दृष्टिकोण नजरेस आल्याशिवाय राहणार नाही. माझा नम्र दावा असा आहे, की अनेक स्थित्यंतरे मी जरी पाहिली असली, तरी मी माझे राजकारण काही वैचारिक स्वरूपाचा दृष्टिकोण ठेवून केले आहे; आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी, की या तऱ्हेचे राजकारण काही मूलभूत विचारसूत्रांच्या आधारेच करण्याचा त्यात प्रयत्न केला आहे.
परिस्थिती व प्रसंग बदलले, तरी एक गोष्ट यातून दिसून येईल, की मी आतापर्यंत ज्या काँग्रेस पक्षात काम करीत आलो, त्या पक्षापासून कधी अलग झालो नाही. सत्तेची अनेक महत्त्वाची स्थाने मी मिळवीत गेलो. परंतु त्यासाठी पक्षनिष्ठेशी कधी खेळ केला नाही. माझ्या पक्षाच्या जीवनामध्ये कसोटीचे जे कठीण प्रसंग आले, त्यांचे राजकारणावर झालेले परिणाम वा प्रतिक्रिया या भाषणांत उमटलेल्या दिसतील. १९६९ साली काँग्रेसच्या जीवनात एक मोठे वादळ निर्माण झाले. या वादळात दोन प्रवृत्ती मुख्यत: दिसून येतात. काही वैचारिक दृष्टिकोणातून काँग्रेसची नवी दिशा घेण्याची ऊर्मी आणि अंतर्गत सत्तासंघर्ष या त्या दोन प्रवृत्ती होत्या. 'बांधिलकीचे राजकारण' हे अखिल भारतीय काँग्रेसच्या फरिदाबाद अधिवेशनातील भाषण व 'पुरोगामी आर्थिक धोरण' हे काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनातील भाषण, ही दोन भाषणे त्या कालातील राजकारणाची व अर्थकारणाची दिशा दाखवणारी अशी भाषणे आहेत. परराष्ट्रनीती व आंतरराष्ट्रिय आर्थिक पुनर्रचना यांचा विचार करणारी भाषणेही या पुस्तकात आहेत. ज्या कालखंडात मी अर्थमंत्री व परराष्ट्रमंत्री होतो, त्या काळच्या समस्यांचे चित्रण या भाषणांतून सापडेल.
या पुस्तकाचे शीर्षक 'भूमिका' हे ठरविले आहे. याचे कारण ज्या अनेक विषयांवर, जी वैचारिक क्षेत्रे निर्देशित केली आहेत, त्यांविषयी माझी आणि माझ्या पक्षाची काही निश्चित भूमिका होती, त्यात सुसंगतता व एकसूत्रता आहे, असे मला वाटते. ही भूमिका काहीशी स्पष्ट व्हायला या भाषणांचा उपयोग होईल, असे मला वाटते. मराठी वाचकांच्या हाती 'भूमिका' हे पुस्तक देताना माझी एवढीच अपेक्षा आहे, की या सुसंगत भूमिकेची नोंद त्यांच्याजवळ राहील.
१९८० सालच्या निवडणुका ऐन तोंडावर आल्या आहेत. त्यापूर्वी हे पुस्तक तयार झाले, याचा मला आनंद आहे. बदलत्या राजकारणाचे चित्र काय असेल, याची स्पष्ट कल्पना आज कोणालाही देता येत नाही, इतके धूसर वातावरण आज देशात आहे. ह्या निवडणुकीपूर्वी पुस्तक हाती देण्याचा उद्देश असा आहे, की निवडणुकीनंतर होणा-या प्रतिक्रियांपासून ते मुक्त असावे. हे पुस्तक वाचकांच्या हाती देतांना मला अतिशय आनंद होत आहेत.