लोकनेते यशवंतराव चव्हाण -३७

११. यशवंतराव – एक प्रेरणास्त्रोत

शालेय जीवनामध्ये यशवंतरावांना शिकविण्यास शेणोलीकर या नावाचे एक गुरूजी होते. अत्यंत वक्तशीर व टापटिपपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुणविशेष. त्यांच्या चालण्या-बोलण्यात एक प्रकारचा वेगळाच रूबाब असायचा. शाळेत व गावात क्रिकेट रूजविण्यात या गुरूजींनी मोठे योगदान दिले होते. त्यांनी एकदा वर्गातील मुलांना ‘तुम्ही कोण होणार..’ हे एका कागदाच्या चिठ्ठीवर लिहिण्यास सांगितले. प्रत्येक मुलाने आपण भविष्यात कोण होणार याबाबत चिठ्ठीवर लिहून दिले. ब-याच मुलांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय नेत्याचे नांव लिहिले. यशवंतरावांनी मात्र लिहिले,

‘मी यशवंतराव चव्हाण होणार!’

गुरूजींनी सर्व मुलांच्या चिठ्ठ्या वाचल्या. यशवंतरावांची चिठ्ठी वाचून ते उद्गारले,

“अरे, तू चांगलाच अहंकारी दिसतोस. देशातील मोठ्या माणसांचा आदर्श तरी डोळ्यासमोर ठेवावयास हवा होतास.”

यावर यशवंतरावांनी उत्तर दिले,

“तुमचं म्हणणं खरं आहे गुरूजी; पण मी स्वतःच नावच देशात उज्ज्वल करणार.”

यशवंतरावांच्या या उत्तरावरून त्यांनी शालेय जीवनातच आपल्या नावाची पताका देशभर करण्याचा संकल्प केला होता, असे स्पष्ट होते.

स्वतःच्या नावाची द्वाही चौफेर करण्याचा निश्चय शालेय जीवनांतच केलेल्या यशवंतरावांनी तो दृढनिश्चय भविष्यात सार्थ ठरविला. स्वकर्तृत्वावर इतका मोठा आत्मविश्वास असणा-या यशवंतरावांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात मोठे यश मिळविले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या मातीतून अनेक कर्तबगार माणसे, राजकारण धुरंदर उदयास आले. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात काम करणा-या अनेकांच्या दृष्टीने यशवंतराव हे एक प्रेरणास्त्रोतच बनले.

पारतंत्र्याच्या काळात कृष्णेच्या घाटावर अनेक नेत्यांची भाषणे होत. वाई प्राज्ञ पाठशाळेचे तरूण, विद्वान पंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींची अनेक भाषणे यशवंतरावांनी ऐकलीत. ‘स्वातंत्र्यासाठीच् या शेवटच्या लढाईत आपण आपल्या सर्वस्वाचा होम केला पाहिजे.’ या त्यांच्या आवाहनाने यशवंतराव प्रेरीत झाले. काकासाहेब गाडगीळ, हरिभाऊ लाड, भाऊसाहेब बटाणे, मसूरचे राघूअण्णा लिमये, इंदोलीचे दिनकरराव निकम, वाईचे किसन वीर, वाळव्याचे आत्माराम पाटील, कातरखटावचे गौरीहर सिंहासने, तांबव्याचे काशिनाथपंत देशमुख अशा अनेक क्रांतीकारकांशी यशवंतरावांचा त्या काळात संपर्क आला. त्याद्वारे प्रभातफेरी, मिठाचा कायदा मोडणे अशा विविध लढ्यात यशवंतराव सहभागी झाले. नित्यनियमाने कराड शहराकमध्ये प्रभातफेरी काढणा-या दहा-पंधरा जणांबरोबरच यशवंतरावांनाही अटक झाली. कोर्टात केस सुरू झाली. खटल्याचा वृत्तांत यशवंतराव गुपचुप पुण्याच्या ‘ज्ञानप्रकाश’ या वृत्तपत्राला पत्रव्यवहाराद्वारे पाठवित. १९३०-३१ सालात सुमारे दीड वर्ष बातमीदार म्हणून यशवंतरावांनी काम केले. ते अधिकृत वातमीदार नसल्याने व ‘एका बातमीदाराकडून’ इतकेच त्या वृत्ताच्या वर छापले जात असल्याने पोलीस संशय असतानाही यशवंतरावांवर ठोस कारवाई करू शकले. नाहीत. स्वातंत्र्यलढ्यात सर्वस्वाचा त्याग करणारे कार्यकर्तें हेच यशवंतरावांचे प्रेरणास्थान होते.