लोकनेते यशवंतराव चव्हाण - ३३

“लोकांचे समोर विषयाची मांडणी करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यावेळी प्रकाशित पुस्तकाद्वारा लोकांना ख-या कल्पना देता येत नाहीत, त्यावेळी आपणच फिल्म व रेडियओचा उपयोग केला पाहिजे. कित्येक वेळा रेडिओवरील भाषणांचा आपल्या कल्पना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी खरा उपयोग होतो की नाही हे निश्चितपणे सांगता येणार नाही. आपण कुठेतरी चुकत असल्याचे मला वाटते. पुष्कळवेळा लोकांचेसाठी मी जी भाषणे करतो त्यांतील १० टक्के देखील कल्पना ज्यांचेसाठी भाषण केलेले असते, त्यांना समजली की नाही याची मला शंका वाटते. आपण हे चांगले कसे करू याचा मार्ग शोधला पाहिजे. या प्रयत्नांतच आपण आपणालाही आणि सरकारलाही मदत करू शकतो. विषयाची मांडणी अशी पाहिजे की ती लोकांना समजली पाहिजे.”

सरकारी अधिका-यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाताना पूर्ण तयारीनिशी जावे. याबाबत चिकिस्तक मार्गदर्शन करताना यशवंतराव म्हणतात.
“वृत्तसंस्थेशी संबंध ठेवताना आपण ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, आपण ज्यांच्या हातांत शब्द सामर्थ्याची सत्ता आहे अशा चाणाक्ष लोकांशी संवाद साधत असतो. जगात शब्दासारखी सत्ता कशातही नाही. शब्द हे कदाचित अँटम बॉम्बपेक्षाही अधिक प्रभावी असतील. शब्द कोणत्याही गोष्टीची उलथापालथ करू शकतात. शब्दांनी क्रांत्या निर्माण केल्या आहेत आणि कदाचित अँटम बॉम्बची उत्पत्तीसुद्धा शब्दातूनच झाली असावी. मी तुम्हाला शब्दाचे महत्त्व सांगत बसत नाही. कारण तुम्ही शब्दसृष्टीचे राजे आहात हे गृहीत आहे: परंतु ज्यावेळी तुम्ही वृत्तसंस्थेशी संबंध ठेवाल त्यावेळी एक गोष्ट विसरू नका की, ज्याचे शब्दरचनेवर प्रभुत्त्व आहे व ज्यांना शब्दांची कसरत करता येते अशांच्या संपर्कात राहून तुम्ही आपले काम करीत आहांत, म्हणून तुम्हाला फार सावधगिरी बाळगली पाहिजे. ज्यावेळी त्यांच्याकडे जाल त्यावेळी मोठ्या कलात्मकरितीने तुम्ही तुमचे काम केले पाहिजे.”

आदर्श राज्याच्या निर्मितीमध्ये सरकार इतकीच जबाबदारी नागरिकांचीही आहे. याबाबत आपले विचार खालील शब्दांत यशवंतराव मांडतात,

“आदर्श राज्यात सरकारला कमीत कमी महत्त्व असते. म्हणून प्रत्येक नागरिकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की, तो राज्याचा एक भाग आहे, महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्यावर काही जबाबदा-या आहेत. सरकारचा राज्यकारभार पाहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य तो ज्या प्रमाणात पार पाडतो त्या प्रमाणात तो राज्याला उपयुक्त आहे. कल्याणकारी राज्यात सरकार नागरिकाचे मदतीस तत्त्पर असते. एवढेच नव्हे तर नागरिकही सरकारला मदत करणेस तत्त्पर असतात. असे कल्याणकारी राज्य अनुभवास येणेस अवधी लागेल. परंतु, सर्वांनी आतापासूनच प्रामाणिकपणे आणि उत्साहाने या प्रयत्नास लागले पाहिजे.”

महाराष्ट्राचा कोकण किनारा निसर्गसान्निध्यात भरून गेला आहे. विपूल प्रकारची नैसर्गिक साधनसंपत्ती कोकणात आहे. या साधनसंपत्तींचा आजपर्यंत योग्यरितीने वापर न झाल्यानेच कोकणच विकास खुंटला आहे. कोकणाची भौगोलिक रचना व विविध उद्योग याबाबत सखोल विवेचन यशवंतराव खालील शब्दांत करतात.

“कोकणामध्येही तीन वेगवेगळे भाग आहेत. रत्नागिरी हा एक वेगळा भाग मानला पाहिजे. कुलाबा, ठाण्याचा वेगळा भाग मानला पाहिजे. रत्नागिरीमध्येही काही ऐतिहासिक कारणाणुळे -  निव्वळ राजकीय ऐतिहासिक कारणामुळे नव्हे, तर सामाजिक परिस्थितीच्या कारणामुळे दक्षिण रत्नागिरी आणि उत्तर रत्नागिरी असे भाग पडतात. ही गोष्ट काही भाग पाडण्याच्या दृष्टीने नव्हे तर परिषदेपुढे असणा-या कार्याचा अंदाज घेण्यासाठी मी आपल्या नजरेसमोर आणू इच्छितो. या दृष्टीने कोकणचे जे प्रश्न आहेत, त्यांचा विचार करीत असताना कोकणचा समुद्र किनारा, तिथे पडणारा पाऊस, तेथे असणारी मनुष्य-संपत्ती, तेथील जमिनीचा एकंदरीत असणारा कस आणि परिस्थिती यांचा विचार करूनच तेथील विकासाचे कार्यक्रम निश्चित करता येतील. आम्ही नुसत्या मनामध्ये विकासाच्या योजना मांडून यश मिळणार नाही. त्यासाठी कृतीची गरज आहे.”