कथारुप यशवंतराव-पैशाची अडचण आहे !

पैशाची अडचण आहे !

फलटण येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ताजीराव सूर्यवंशी यांनी सांगितलेली ही आठवण. दत्ताजीराव हे ज्ञानोबादादांच्या कन्येचे ( सुधाचे ) पती , म्हणजे यशवंतरावांचे जावईच होते. दत्ताजीरावांच्या थोरल्या बंधूंच्या विश्वासरावांच्या कन्येचा विवाह लातूर येथे संपन्न होणार होता. या विवाहाचे निमंत्रण यशवंतरावांना देण्यासाठी ते दोघे बंधू कराडला गेले. यशवंतराव तेव्हा कराडच्या विश्रामगृहावर उतरले होते. एकटेच होते. त्या अखेरच्या दिवसात त्यांना सोबत होती ती फक्त वेणूताईंच्या आठवणींची.

विश्वासरावांनी निमंत्रणपत्रिका साहेबांच्या हातात दिली व म्हणाले, ' साहेब तुम्ही लग्नाला आलंच पाहिजे असा आम्हा सर्वांचा आग्रह आहे.'


साहेबांनी निमंत्रण पत्रिका वाचली व म्हणाले, ' आपली कन्या तुम्ही मराठवाड्यात दिलीत हे छान झाले. मी मराठवाड्याशी राजकीय संबंध जोडले. पण तुम्ही कौटुंबिक संबंध जोडलेत याचा आनंद आहे. मराठवाड्याशी रक्ताचे नाते असावे असे मला नेहमीच वाटत आले आहे.'

' मग तर तुम्ही अवश्य आले पाहिजे.' दत्ताजीराव म्हणाले.

यशवंतराव स्तब्ध झाले. त्या दोघांना बाजूला घेऊन हळू आवाजात म्हणाले. ' या लग्नाला मी आनंदाने आलो असतो. पण आता पहिले दिवस राहिलेले नाहीत. पूर्वी मी कुठेही निघालो तरी माझ्यासाठी सरकारी विमान, हेलिकॉप्टर आणि मोटारींचा ताफा सज्ज असे. आज मी सत्तेत नाही. पैशाची ही अडचण आहे. मी लग्नाला येवू शकणार नाही. पण त्या भागातले केंद्रीय मंत्री श्री. तुकाराम शृंगारे हे माझे मित्र आहेत. त्यांना मी माझा प्रतिनिधी म्हणून अवश्य पाठवेन. आपण मला समजून घ्याल  अशी आशा आहे. माझे आशीर्वाद सदैव तिच्या पाठीशी राहतील.' एवढे बोलून यशवंतरावांनी आवंढा गिळला व ते परत फिरले. त्यांच्या पाठमो-या आकृतीकडे ते दोघे बंधू पहात राहिले. चाळीस वर्षे सत्तेत राहिेलेल्या यशवंतरावांची ही अवस्था...!

त्यांचा आपल्या कानांवर विश्वास बसला नाही.

असा एक राजकारणी या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला यावर भावी पिढ्यांचा तरी विश्वास बसेल काय ?