शब्दांशिवायचे भाषण
१ जून १९८३ रोजी सौ. वेणूताई या जगातून गेल्या. यशवंतरावांच्या जीवनातील चैतन्य हरपले. ते खचले. त्यांना कशातच रस वाटेनासा झाला. अगोदरच राजकीय जीवनात विजनवास भोगत असलेले यशवंतराव वेणूताईंच्या जाण्याने अक्षरश: पोरके झाले. आपल्या प्रिय पत्नीच्या निधनाने दु:खी होणारे लाखो- करोडो लोक या जगात आहेत, पण वेणूताईंच्या निधनानंतर यशवंतरावांची जी अवस्था झाली तशी क्वचितच कुणाची झाली असेल. यशवंतराव किती खचले होते याची साक्ष देणारा हा प्रसंग.
पुण्यातील टिळक स्मारक मंदिरामध्ये यशवंतरावांचे व्याख्यान होणार होते. तुडुंब गर्दी जमली होती. यशवंतराव आले. प्रास्ताविक, स्वागत वगैरे झाले. उपस्थित श्रोत्यांना त्यांचे भाषण ऐकण्याची प्रचंड उत्सुकता होती. याच टिळक स्मारक मंदिरामध्ये यशवंतरावांनी दिलेली अप्रतिम भाषणे अजून लोकांच्या लक्षात होती. यशवंतरावांचा शब्द न् शब्द टिपून घ्यायला ती गर्दी आतुर झाली होती. ते बोलायला उभे राहिले. क्षणभर त्यांनी सभागृहावर नजर फिरवली आणि काय झालं कोणास ठाऊक, अचानक त्यांचा कंठ दाटून आला. वेणूताईंच्या आठवणींने त्यांचे डोळे भरून आले. अवघे सभागृह स्तब्ध झाले. आयुष्यभर पापण्यांमध्ये आसवांच्या नद्या गोठवणारे साहेब, भर सभागृहात स्वत:चे अश्रू रोखू शकले नाहीत. स्वत:ला सावरत मोठ्या मुश्किलीने यशवंतराव फक्त एकच वाक्य बोलले, ' माफ करा, मी बोलू शकणार नाही. आपण शांतपणे निघून जावे.' असे म्हणून ते आपल्या जागेवर जाऊन बसले. जमलेले श्रोते डोळे पुसत एक एक करीत बाहेर पडले. आज त्यांना एक जगावेगळे भाषण ऐकायला मिळाले होते - शब्दांशिवायचे भाषण...!