• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९९०-२

व्याख्यान पहिले

१३ मार्च १९९०

‘भारतीय राजकारण : अभ्यासाची एक दिशा’

महाराष्ट्राचे थोर नेते श्री. यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती आहे. म्हणून माझ्या भाषणाची सुरवात त्यांना माझी आदरांजली वाहून मी करीत आहे. आधुनिक महाराष्ट्राचे ते सर्वार्थाने शिल्पकार होते. लोकमान्य टिळकांच्या नंतर जनमानसामध्ये इतके अलौकिक स्थान मिळविलेला दुसरा नेता महाराष्ट्रामध्ये झाला नाही. हे स्थान त्यांनी आपल्या कर्तृत्वानं मिळवलं आणि आपल्या सामाजिक विचारांच्या झेपेमुळे त्यांना ते मिळवता आलं. महाराष्ट्रीय समाजाची जडणघडण आतापर्यंत कशी झाली, तिची शक्तीस्थाने आणि मर्मस्थाने कोणती हे त्यांना माहीत होते. जर लोकहितवादी, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्राला पुढे जायचे असेल तर सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया ही डोळसपणे आणि नेटाने पुढे नेली पाहिजे, वेगाने पुढे नेली पाहिजे आणि या संदर्भात वैचारिक नेतृत्व सबंध महाराष्ट्राला दिले पाहिजे या भूमिकेवरती ते अविचल उभे राहिले. ते एक कुशल प्रशासक तर होतेच. द्वैभाषिक मुंबई राज्याचा प्रयोग यशस्वी करून त्यांनी पं. नेहरू आणि इतर राष्ट्रीय नेत्यांचे मन वळविले आणि एकभाषी मराठी राज्याच्या स्थापनेला त्यांना प्रवृत्त केले, अनुकूल करून घेतले. त्यामध्येही आणि पुढे महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री म्हणून त्यांचे प्रशासन कौशल्य दिसले. राष्ट्रीय स्तरावरती गेल्यावर तर संरक्षण खाते, अर्थखाते, गृहखाते, परराष्ट्रसंबंध खाते अशा एकाहून एक जोखमीच्या जबाबदा-या त्यांनी अतिशय तोलाने पेलल्या आणि त्यामध्ये आपले प्रशासकीय कौशल्य आणि आपला पुरोगामी दृष्टिकोन त्यांनी उत्कटपणे भारतीय जनतेला दाखवून दिला.

त्यांच्या वैचारिक वारशाची महाराष्ट्राला आज कधी नव्हे तेवढी गरज आहे अशी माझी धारणा आहे. त्यांच्या वैचारिक वारशाचा एक अविभाज्य भाग म्हणजे महाराष्ट्राने व्यापक राष्ट्रीय संदर्भाचे कधीही विस्मरण होऊ देता कामा नये. महाराष्ट्राचे राजकारण हे जर पुरोगामी दिशेने जायचे असेल तर महाराष्ट्राने राष्ट्रीय संदर्भ सतत आपल्या नजरेसमोर ठेवला पाहिजे. हा त्यांच्या वैचारिक वारशाचा एक अविभाज्य घटक आहे. त्यांनी “सह्याद्रिचे वारे” या व्याख्यान संग्रहामध्ये म्हटले आहे त्याप्रमाणे मुख्यमंत्री म्हणून जरी मला अनेक वेळा महाराष्ट्राचा विचार करावा लागत असला तरी त्या वेळच्या विचारांचा संदर्भ राष्ट्रीय असतो. भारतीय संदर्भामध्ये मी या राज्याचा विचार करतो असे त्यांनी म्हटले आहे. हे सूत्र त्यांनी कधीही नजरेआड होऊ दिले नाही. त्यांचा वारसा सांगणा-यांनीही ते नजरेआड होऊ देता कामा नये आणि महाराष्ट्रातल्या आमजनतेनेही नजरेआड होऊ देता कामा नये, असे या वेळी मला सांगावेसे वाटते. त्याचे विस्मरण होऊ देणार नाही अशी शपथ घेणे आणि त्यानुसार वर्तन करणे हीच खरी त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली ठरेल, असेही मला ठामपणे सांगावेसे वाटते. एवढे बोलून मी माझ्या पहिल्या व्याख्यानाला सुरवात करतो आहे.