• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९८६-३३

"महाराष्ट्र दिशाहीन होतो आहे काय?"

अध्यक्ष श्री. पी. डी. पाटील, उपाध्यक्ष श्री. शिंदे, ग्रंथपाल विठ्ठलरावजी आणि बंधू-भगिनींनो! आपण गेली पंचावन्न वर्षे ही शारदीय व्याख्यानमाला चालवत आहात, याबद्दल मला खरोखरीच अतिशय आनंद होत आहे. सामान्यतः आपणा सर्व दाक्षिणात्यांच्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं की आपण लोक आरंभशूर आहोत. एखाद्या गोष्टीची सुरवात करावयाची आणि उत्साह आहे तोपर्यंत ती चालवायची आणि मध्येच ती सोडून द्यायची, परंतु आपल्या या संस्थेने एक निष्ठा म्हणून गेल्या पंचावन्न वर्षापासून हे ज्ञानसत्र सतत चालू ठेवलेलं आहे. त्याबद्दल मी आपणां सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आजच्या या व्याख्यानमालेचं उद्घाटन करण्याचं भाग्य आपण मंडळींनी मला दिलंत, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि या आपल्या पंचावन्नवर्षीय शारदीय व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो.

आजचा माझा जो चर्चेचा विषय आहे तो अतिशय जिव्हाळ्याचा असा विषय आहे. मी प्रथमच क-हाडकरांच्या सेवेमध्ये इथं उपस्थित आहे. प्रथमदर्शनी माझ्या असं लक्षात आलं की अलिकडच्या काळामध्ये माणसाने जी प्रगती केलेली आहे त्याचा आढावा घेणारं भाषण जर आपण केलं तर ते जास्त उपयुक्त होईल. परंतु पुन्हा मनामध्ये विचार आला की गेल्या दहा-बारा वर्षांपासून माझ्या मनामध्ये जो एक विषय घर करून राहिलेला आहे त्याच्या संदर्भात माझी जी काही प्रतिक्रिया आहे ती आपल्यापुढे व्यक्त केली तर जास्त संयुक्तिक होईल. कारण जो नवा महाराष्ट्र घडवायचं भाग्य या क-हाडच्या सुपुत्राला मिळालेलं होतं, इथच याच भूमीमध्ये त्यांनी जी स्वप्नं पाहिलेली होती- महाराष्ट्राच्या संदर्भातली ती पूर्ण झाली की नाही याच्या संबंधीचा पडताळा करून पाहण्याची संधी जर आपल्याला मिळाली तर जास्त संयुक्तिक होईल म्हणून मी आजचा हा विषय निवडला आहे.

विषय आहे “महाराष्ट्र दिशाहीन होतो आहे काय?” दिशाहीन होतो आहे हे कशावरून ठरवायचं किंवा तो होतो आहे ही आपल्या मनामध्ये जी शंका निर्माण होत आहे ती तरी कशामुळे? आपल्या मनामध्ये हा पहिला प्रश्न निर्माण होतो आणि त्याचं उत्तर आहे – एकोणीसशे साठ साली जेव्हा महाराष्ट्र निर्माण झाला- आपल्या सगळ्यांच्या कष्टामधून तेव्हा विधानसभेमध्ये त्या वेळचे महाराष्ट्राचे नेते- स्व. यशवंतरावजी चव्हाण यांनी केलेल्या भाषणाची आठवण झाली म्हणजे हा प्रश्न का निर्माण होतो हे कळेल. अनेक प्रकारचे प्रवाह त्यावेळी निर्माण झाले होते. काही मंडळींना असं वाटत होतं की पश्चिम महाराष्ट्रातील ही जी सामाजिक-शैक्षणिक चळवळीमध्ये पुढे गेलेली मंडळी आहेत ती मंडळी बाकीच्या उर्वरित भागावर कुरघोडी करतील आणि आपलेच काय म्हणणे असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जो काही मलिदा असेल तो आपल्या पानावर ओढून घेतील आणि जे काही मागासलेले भाग आहेत ते मागासलेलेच राहतील. हे मराठी राज्य न होता मराठा राज्य होईल. अशा अनेक प्रकारच्या शंकाकुशंकांनी त्यावेळी महाराष्ट्राचं मन विचलित झालेलं होतं. या विचलित झालेल्या मनाला यशवंतरावजींनी निश्चित स्वरूपाचं आश्वासन दिलेलं होतं की, हे मराठी राज्य होईल आणि जी आपली धाकटी भावंडे आहेत, काही ऐतिहासिक कारणांमुळे जे मागासलेले राहिलेले आहेत अशा सगळ्या धाकट्या भावंडांना सशक्त करून आपल्या बरोबर घेऊन सगळा महाराष्ट्र एकजीव, एकसंध असा आपण उभा करणार आहोत. महाराष्ट्र हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. या प्रांताचा हिंदुस्थानच्या जडणघडणीमध्ये काही महत्वपूर्ण असा वाटा आहे. आणि तो महत्वपूर्ण वाटा आपण आतापर्यंत मोठ्या अभिमानाने सांगत आलेलो आहोत. ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले ! महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले  ।।’  अशी आपली सगळ्यांची मनोमन धारणा आहेच, परंतु आज आपण आत्मनिरीक्षण केलं पाहिजे. आजच्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपण असं म्हणू शकतो का? काल आपण म्हणत होतो सर्वंकष असं हे आपलं विधान होतं. परंतु गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागामध्ये विकासाच्या ज्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत त्या प्रक्रिया गेल्या दहा वर्षांत, किंवा आपण पाच वर्षांचा काळ घेऊ या. मी चर्चेला थोडासाच काळ घेतो – त्याचं कारण असं की आपण मोठा कालखंड चर्चेला घेतला तर तासा-दीड तासामध्ये आपल्या विषयाचं प्रतिपादन करणं मोठं अवघड होऊन बसतं आणि मग धरसोड होते म्हणून अलिकडचाच काळ मी घेतो. कारण अलिकडे गेल्या पाच सहा वर्षात आपण सगळयांनी चिंताक्रांत व्हावे अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे.