• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९८६-२१

ज्या परिस्थितीत यशवंतराव दिल्लीला गेले त्यावेळचा थोडा इतिहास मी आपल्याला सांगतो. १९६२ साली कृष्णमेनन यांचं संरक्षण मंत्रीपद यशवंतरावांना घेण्याची पाळी आली त्यावेळी खरं सांगायचं म्हणजे यशवंतरावांना महारष्ट्र सोडावयाचा नव्हता. मुंबई सोडावयाच्यावेळी त्यांची भेट घेण्याचा मला जो योग आला होता त्यावेळी प्रत्यक्षपणे त्यांनी माझ्यापाशी उद्गार काढले होते; “आताच कुठे महाराष्ट्राचं राज्य सुरू झाल आहे आणि माझ्या कारकीर्दीची सुरुवात होत आहे. तेव्हा अशा वेळी महाराष्ट्रातील सारी जबाबदारी बाजूला टाकून दिल्लीला जाणं मला काही आवडत नाही” तथापी १९६० साली महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा सोहळा साजरा केला गेला आणि संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश राजभवनामध्ये ठेवण्यात आला तेव्हां पंडितजी आणि इंदिरा गांधी दोघेही या सोहळ्याला हजर होते. त्यावेळी यशवंतरावांनी का कोण जाणे पण, उत्स्फूर्तपणे एक भविष्यवाणी केली होती की हिमालयावर संकट आलं तर महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाच्या संरक्षणासाठी धावून जाईल. आता हे सहजपणे केलेले उत्स्फूर्त वक्तव्य होते. पण काय योगायोग पहा, वर्ष दीडवर्षाच्या काळातच हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्रीला धाव घ्यावी लागली. आता तिथे यशवंतरावांचं चांगलं स्वागत होणं स्वाभाविकच होतं. कारण कृष्णमेनन हे अत्यंत बुद्धिमान आणि पंडितजींच्यावर प्रभुत्व असलेले एकमेव नेता असले तरी ते एक वादग्रस्त व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे चीनी आक्रमणानंतर कृष्णमेनन यांना काढून टाकण्यात यावं आणि संरक्षण मंत्रीपद दुस-या कोणाकडे तरी सोपवावं अशा रीतीचा देशभर प्रचार सुरू झाला. पण कृष्णमेनन यांच्यावर पंडितजींचा अतिशय लोभ होता. आणि तितकाच विश्वासही होता. काश्मीरची बाजू त्यांनी ज्या हिरीरीने राष्ट्रसंघटनेपुढे ठेवली होती तिच्याबद्दल तर पंडितजींना एकप्रकारची कृतज्ञताही वाटत होती. शिवाय कृष्णमेनन हे संरक्षणमंत्रिपद समर्थपणे सांभाळीत आहेत अशीही त्यांची भावना होती. परंतु त्यावेळी कृष्णमेनन यांच्याबद्दल इतके प्रचंड काहूर उठलें की अखेरीस पंडितजींनाच प्रत्यक्ष लोकांनी सुनावले की जर कृष्णमेननच्या बाबतीत आपण निर्णय घेणार नसाल तर पंडितजी, आपल्या बाबतीत सुद्धा आम्हाला विचार करावा लागेल. इतक्या तीव्र भावना त्यावेळी पार्लमेंटमध्ये आणि पार्लमेंटच्या बाहेर आणि देशामध्ये पसरलेल्या होत्या की पंडितजींना कृष्णमेनन यांच्या बाबतीत निर्णय घेणे भागच पडले.

आपल्या दृष्टीने भूषणास्पद गोष्ट आहे ती ही की संरक्षण मंत्रीपद कृष्ण मेनन यांच्यासारख्या समर्थ माणसापासून काढून घेतल्यानंतर ती जागा घ्यावयाला पंडितजींच्या दृष्टीनं एकच माणूस समर्थ ठरला आणि ते म्हणजे यशवंतराव चव्हाण हे होते. यशवंतरावांनी त्यावेळी पंडितजींचे हात बळकट करण्यासाठी दिल्लीला जावयाचे मान्य केले आणि ते दिल्लीला जावयाला निघाले. त्यांच्या यशाचे पूर्वचिन्हच म्हणून की काय ते दिल्लीमध्ये पोहोचण्यापूर्वीच चीनी सैन्याने आणि चीनी सरकारने आपले सैन्य मागे घेतले आणि बिनशर्तपणे त्यांनी ते मागे घेतले. त्याचक्षणी युद्धबंदी भारतात आणि विशेषतः सीमेवर झाली. त्याक्षणी यशवंतरावांच्या शिरावरील एक मोठा भार नाहीसा झाला. तो भार अवघड होता. कारण आपली लष्करी तयारी आहे किंवा नाही याच्याबद्दलही शंका होती आणि पुढची पावले काय टाकावीत हेही निश्चितपणे ठरलेले नव्हते. तथापी यशवंतरावांचं भाग्य असं उजळलं की चिनी आक्रमण परत घेण्यात आलं आणि त्यांचा मार्ग सीमेपुरता तरी निष्कंटक झाला.

पण त्याच सुमारास जी एक घटना घडली तिचा मी उल्लेख करू इच्छितो, ती घटना अशी की दिल्लीला जाण्यापूर्वी यशवंतरावांनी जी काही भाषणे दिली, त्यातील पुण्याच्या भाषणात त्यांनी लोकांना पटेल आणि समजेल अशा शब्दात चीनी आक्रमणाची चिकित्सा केली. त्यांनी असं सांगितलं की चीनचे हे आक्रमण हे कम्युनिस्ट आक्रमण आहे असे समजावयाला पाहिजे. त्या दृष्टीने भारतीय राष्ट्रवादाला निर्माण झालेला हा धोका आहे. त्या संदर्भात त्यांनी पुढे असेही सांगितले की जी कम्युनिस्ट राष्ट्रे आहेत त्यांच्यावर आपल्याला फारसा भरंवसा टाकता येणार नाही आणि सोव्हियट युनियन आपल्याला संरक्षणाच्या दृष्टीनं मदत करील असं गृहीत धरून चालणार नाही. यशवंतरावांच्या या भूमिकेपेक्षा वेगळी अशी भूमिका पंडितजींनी घेतली. त्यांच्या मते हे कम्युनिस्ट आक्रमण नव्हे. राष्ट्रवादी भावनेने चीनने टाकलेले हे पाऊल आहे. त्या दृष्टीने या आक्रमणाकडे कम्युनिस्ट आक्रमण म्हणून पाहण्याचे आपल्याला कारण नाही.