व्याख्यानमाला-१९७८-१०

जे अनुभव आले, वीस वर्षे जे चिंतन केले त्यातूनच बाबासाहेबांनी धर्मांतराचा निर्णय घेतला, धर्मांतराची ही ऐतिहासिक घटना म्हणजे दलितांच्या मुक्तिसंग्रामातील नव्या पर्वाची नांदी होती. १९२० नंतर बाबासाहेबांनी जे वैचारिक आंदोलन आणि मानव मुक्तीचा लढा पुकारला होता त्यातले महत्त्वाचे पाऊल म्हणजे बौद्दधर्मस्वीकार ! अस्पृश्यता-निवारणासाठी जे जे प्रयत्न झाले त्यामुळे अस्पृश्य म्हणून गणला जाणारा, राखला जाणारा, मानहानीचा, धार्मिक हीनतेचा दोष कुठे कमी झाला? अस्पृश्यांचा प्रश्न हा हिंदू समाजातील परिवर्तनाशिवाय, मूलभूत बदलाशिवाय कसा सुटेल? हिंदू धर्मात अस्पृश्य म्हणून राहणे भारतीय लोकशाहीच्या भवितव्याच्या दृष्टीने विघातक होते व कोट्यावधी दलित जनतेच्या विकासाच्यादृष्टीने अन्याय्य होते म्हणून बाबासाहेबांनी 'धर्मांतरा'चा क्रांतिकारक निर्णय घेतला ज्यांना हा निर्णय एक राजकीय स्टंट वाटतो त्यांना बाबासाहेबांचा मुक्ति-संग्राम नीट समजून घेता आला नाही असेच म्हणावे लागेल. धर्म माणसासाठी असतो ज्या धर्मात अस्पृश्याना पशू-पेक्षाही हीनपणे वागवण्यात येते त्या धर्मात का म्हणून राहावे ? लो. टिळक म्हणाले होते की मला न्याय हवा, मी दयेच्या याचनेसाठी उभा नाही. बाबासाहेब आंबेडकरांची हीच भूमिका होती. ते अस्पृश्यांच्या वतीने न्याय मिळविण्यासाठी लढ होते. दयेची, सहानुभूतिची भीक मागण्याची त्यांची वृत्ती नव्हती. ज्या धर्मात माणुसकी, शील, चारित्र्य, संघटना, शिस्त, सौजन्य यांचा सर्वव्यापी लाभ घेता येईल म्हणून ते बौद्धधर्माच्या स्वीकाराला तयार झाले. अस्पृश्यतेचे निर्मूलन केवळ राजकीय हक्का मिळवून होईल असे त्यांना वाटत नव्हते. आर्थिक व सामाजिक समतेशिवाय लोकशाही जिवंत राहणार नाही. म्हणून मला वाटते की धर्मांतर म्हणजे एक नवा मुक्तिमार्ग होता, धर्मांतर म्हणजे नवे सांस्कृतिक पुनरुत्थान होते. धर्मांतरामुळे अस्पृश्य समाजाच्या मानसिक शृंखला तोडल्या. मी बौद्ध आहे मी आता माणूस आहे या भावनेची ज्योत 'धर्मांतरा' नेच पेटविली, दलित जनतेने आपले 'दलितपण' टाकले, त्यांनी हिंदू देव-देवतांचा त्याग केला, बुद्धविहार उभे राहू लागले, प्रार्थना धीरगंभीर आवाजात होऊ लागल्या. बौद्धमहासभा स्थापन झाल्या. 'बुद्ध आणि त्याचा धम्म' या ग्रंथाचा अभ्यास सुरु झाला या धर्मांतरामुळे बाबासाहेबांना आपल्या बांधवांचे मन आमूलाग्र बदलता आले, त्यांची अस्मिता, त्यांचा अभिमान जागा करता आला. त्यांच्या 'वेदने' ला अर्थ आला. त्याच्या विद्रोही भूमिकेने सवर्ण हिंदू हादरून गेले. अस्पृश्यांचा मूळ प्रश्न सामाजिक आहे. माणूसपण नाकारलेल्या समाजाला माणूस म्हणून प्रतिष्ठित करण्याचा मार्ग म्हणजे धर्मांतर ! पण 'धर्मांतर' जसजसे अधिक प्रमाणात झाले तसतसे त्यांच्यावर गावगाड्यात नवी संकटे कोसळली. स्वाभिमानी, नव्याने जाग्या झालेल्या समाजाला दडपण्याचे अमानुष तंत्र हितसंबंधीयांनी अमलात आणले. बाबासाहेबांच्या निधनानंतर तर अत्याचार, दहशतवाद वाढतच गेला धर्मांतराने घडून आलेली मानसिक क्रांती ही सर्वंकष क्रांतीची नांदी होय.

स्वातंत्र्य मिळाले तरी जातीसंस्था व अस्पृश्यता यांच्यामुळे राजकारणात समाजकारणात, शिक्षणक्षेत्रात-नव्हे जीवनाच्या सर्व क्षेत्रात विषमतामूलक प्रवृत्ती उफाळून येत आहेत. सत्ता हस्तगत तरी करावी किंवा मूल्ये पायदळी तुडवून सत्ता हातात ठेवावी यात राजकीय पक्ष गुंतलेले आहेत. त्यांना समाजपरिवर्तनांची, माणूस सुखी करण्याची गरज वाटतेच कुठे ? उलट दलितांवरील अत्याचाराकडे मख्खपणे ते पहात तरी आहेत किंवा त्याला खतपाणी तरी घालीत आहेत. मूठभर लोक सत्ता आणि संपत्ती यांचा अमाप भोग घेत आहेत आणि देशातील दलित, आदिवासी, गिरीजन आदी मागासलेल्या जाती दारिद्रय, अज्ञान, दास्य, अन्याय यांच्या विळख्यातून मुक्त झालेल्या नाहीत. उलट या जाती कधीच मुक्त होऊ नयेत म्हणजे सत्ता व संपत्ती निर्वेधपणे भोगता येईल असे राजकीय पक्षाचे मनसुबे आहेत. सभास्थानी ते स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व सामाजिक न्याय आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशा घोषणा करतील पण धोरण मात्र उलट असेल. 'संपूर्ण क्रांती' ची कल्पना मांडताना जयप्रकाश म्हणाले, "गेल्या पंचवीस वर्षात अनेक कायदे झाले. जमीन सुधारणेचे कायदे झाले. अस्पृश्यता निवारणाचे कायदे झाले. हे सर्व कायदे होऊनही भूमिहीनांना जमीन मिळाली नाही आयुष्यभर एकाच जमीनदाराकडे गुलामाचे जिणे जगणारी कुटुंबेच्या कुटुंबे बिहारात आहेत. दलितांचे हाल तर विचारूच नका. त्यांना अजूनही मंदिरात जाऊ देत नाहीत. पाणी भरु देत नाहीत.