व्याख्यानमाला-१९७६-१५

हा विरोधाभास ज्या वेळेला आपण लक्षात घ्यायला लागतो त्या वेळेला या समाजाचे दुखणे नेमकं काय आहे हे आपल्या लक्षात यायला लागलं. मूल्यांची आलटापालट करणे म्हणजे सुधारणा नव्हे. जी आम्ही जुनी मूल्ये टाकून दिली आणि नवी मूल्ये स्वीकारली म्हणजे काय ? मानवी मूल्ये समाजहितकारक, व्यक्ति हितकारक असतील ; मग जी जुनी नवी असा भेद आपणाला करावाच लागत नाही! मूल्यांच्या बाबातीत जुनं नवं असं काही असतच नाही. मूल्यांच्या बाबतीत एकच प्रमाण असू शकतं की, हे मूल्य व्यक्तीच्या त्याचप्रमाणे समाजाच्या धारणेसाठी किती समर्थ आहे. याच्यावरतीच त्या मूल्यांची योग्यता व सामर्थ्य अवलंबून असतं. आणि म्हणून हे मनाचं मूल्य, हे आत्म्याचं मूल्य, ज्या वेळी बुध्दीला जोर देईल, आपल्या विचाराला जोर देईल, आपल्या भावनेला जोर देईल त्या वेळी आपल्या पूर्वजांनी, आपल्या ऋषींनी आपल्या संतांनी सांगितलेली आदर्श समाजाची ख-या परिवर्तनाची दिशा आपल्याला सापडेल. त्या दैदीप्यमान दिशेकडे मी वळलोच नाही. कारण ती दिशा फारच अवघड आहे.” जे खळांची व्यंकटी सांडो |तया सत्कर्मी रती वाढो | भूतां परस्परे पडो ! मैत्र जिवांचे” ही फारच पुढची दिशा आहे. ती सांगितली ज्ञानेश्वरांनी ! दुर्जन जगातून नाहिसे होऊ दे असं नाही ते म्हणाले. दुष्टांचं निर्दालन करू या असं नाही म्हणाले . माणसांमध्ये दुष्टपण असते ते नाहिसं होऊ दे, म्हणजे निर्मल –स्वच्छ-मांगल्यकारक मनुष्यत्व शिल्लक राहिलं ते हवे आहे. मनुष्य नाही मारायचा! मार्क्ससारखेच ज्ञानेश्वर सांगतात. मार्क्सने हेच सांगितल. की भांडवलशाही विचाराची  ही कीड मारायची. मार्क्सने असं सांगितलं की त्याची वृत्ती मारायची. त्या माणसाला नाही मारायचं “खळांची व्यंकटी सांडो| तया सत्कर्मी रती वाढो|” सत्कर्म करण्याकडे त्याच्या मनाची प्रवृत्ती होवो. “भूतां परस्परे पडो|मैत्र जिवाचे” आणि या भूतलावरती जन्मलेल्या केवळ माणसातच नव्हे तर जम्म घेतलेल्या प्रत्येक प्राणिमात्रात मैत्र-सेवाभाव निर्माण होवो. लोकशाहीच्या समाजवादाच्या पलिकडचा हा वाद आहे. विनोबाजी त्याला सर्वोद्यवाद म्हणतात.

शोकांतिका ही आहे की संपूर्ण समाजाला सध्दर्माचा, कल्याणाचा मार्ग दाखविणारा एवढा प्रचंड बुध्दिमत्तेचा ऋषितुल्य मनुष्य आपल्यात असताना, आमची कुवत नसल्यामुळे ती दिशा आम्ही पाहू शकत नाही. तो त्यांचा पराभव नव्हे, ब-याच वेळेला लेख येतात वर्तमानपत्रातून की यांचं तत्त्वज्ञान अपयशी आहे! यांचं तत्त्वज्ञान पराभूत आहे! यांना काहीच साधलेलं नाही! ते तसे नसते! आमची क्षमता वाढलेली नसते! ते स्वीकारण्यास आम्ही दुबळे असतो आणि आम्ही दुबळे असल्यामुळे तिथपर्यत जाऊ शकत नाही. तो त्या पर्वताच्या उंच शिखरावर बसलेल्या माणसाचा दोष नव्हे. आम्ही तिथपर्यत जाऊ शकत नाही. ती शक्ती आमच्या पायामध्ये आम्ही अजून आणलेलीच नाही. पूर्ण राजकीय विचारांचे, पूर्ण सामाजिक परिवर्तनाचे, पूर्ण आर्थिक परिवर्तनाचे, एवढेच सत्य आम्हाला सध्या गाठायला अवघड होते आहे  तेवढेच गाठूया. हे सत्य फारच पुढचे आहे. हा जो परिवर्तनाचा प्रयोग वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अगदी पूर्वीपासून सुरू आहे. माणसाला बदलण्याचा प्रयोग माणसाच्या निर्मितीपासूनच सुरू झालेला आहे. माणसालाच माणसाने बदलायचे असते. ज्यावेळी माणसाने अणुकुचीदार दगड तासला. बाण शोधून काढला त्यावेळी त्याला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याची ईर्षा होती म्हणून त्यांनी हे सगळं  केलं. पण त्या वेळच्या अवस्थेतल्या परिवर्तनाचा अडथळा आणि आजच्या प्रगतकाळातील परिवर्तनाचा अडसर एक असू शकत नाही. माणसाला इतर प्राणिमात्रांप्रमाणे बुध्दी आणि भावना या दोन गोष्टी जरी असल्या, कुत्रा, मांजर यांना भूक लागते, ते माणसावर माया करातात, त्यांना ही भावना असते, असं जरी असलं तरी या जगतामध्ये -  गतिमान असलेल्या या विश्वामध्ये जन्माला अलेला मनुष्यप्राणी हा एकच असा आहे की ज्याची बुध्दी आणि भावना ही देखील गतिमान असतात. गतीशिवाय पुढचं पाऊल तो टाकूच शकत नाही म्हणूनच त्यानं चंद्रावर पाऊल टाकलं. ते इतर प्राण्यांना जमत नाही. ठराविक वेळ झाली की कुत्रं अन्न खायला येणार. त्याच्या पलीकडे त्याला समजत नाही त्याच्या पलीकडे तो प्रगती करू शकत नाही. मनुष्यमात्राला याच्या पलिकडची शक्ती परमेश्वराने दिलेली आहे. बुध्दीला आणि भावनेला गती देऊन आपल्या मनासारखं विश्व कसं घडवायचं याचे ज्ञान माणसाला असल्यामुळे हे ज्ञान समजावून घेणे जरूर आहे. ज्ञानामध्ये या परिवर्तनाचं मूळ आहे अस जर मी म्हटलं तर ते आतापर्यंच्या प्रचलित तत्त्वज्ञानाच्या विरूध्द होईल असं मला वाटत नाही.

या परिवर्तनाचे जे काही वरकरणी दिसणारे घटक होते त्या संबंधींचे विवरण मी आता केले. उद्याच्या माझ्या भाषणामध्ये या परिवर्तनाच्या प्रयोगासाठी कुठली कुठली साधने उपलब्ध आहेत कुठली कुठली क्षेत्रे उपलब्ध आहेत आणि या क्षेत्रांमध्ये या साधनांच्या द्वारे आपणाला किती वेगाने पुढे गेले पाहिजे, किती वेगाने पुढे सरकलो किंवा सरकलो नाही. याचं विवरण मी करीन. तेव्हा आजचं हे भाषण या ठिकाणी संपवितो. आणि आजच्या या भाषणाला उपस्थित राहून अत्यंत एकाग्र चित्ताने माझे विचार आपण ऐकून घेतलेत या बद्दल मी सगळ्यांचे मन:पूर्वक आभार मानून आजचे भाषण संपवितो.

जयहिंद !