व्याख्यानमाला-१९७४-२३

यंत्राची कार्यक्षमता आपण वापरतो आहोत तर माणसाची कार्यक्षमता आहे तीही आपण टिकवू शकत नाही अशा विरोधाभासामध्ये आपण सापडलो आहोत. म्हणून हिंदुस्थान हा अविकसित समाजाचा एक जर प्रातिनिधिक नमुना असेल तर हा प्रातिनिधिक नमुना डोळ्यांपुढे ठेवून आपण ज्या वेळेला विचार करु त्या वेळेला आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की समाजवादाचे पायाभूत महत्त्वाचे जे कार्य आहे त्यांत भांडवलाच्या निर्मितीचाही समावेश आहे. ही भांडवलाची निर्मिती करण्यासाठी सामाजिकदृष्टया ज्याप्रमाणे व्यक्तिगत नफा हा आपल्याला बंद करायला पाहिजे त्याचप्रमाणे ही भांडवलाची निर्मिती करताना उपभोग्य वस्तू आणि व्यक्तीगत चैन यांच्यासंबंधी कडक प्रकारची नियंत्रणे घातली पाहिजेत. याची काटेकोर अंमलबजावणी होईल या दृष्टीने जर त्याची आपण काही व्यवस्था करु शकलो नाही तर भांडवल संचलाचा जो प्रश्न आहे तो आपल्याला कधीही सोडवता येणार नाही. मी एका उदाहरण देतो. आपण दोनतीन महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचली असेल. छेलाराम नावाचे एक करोडपती व्यापारी आहेत. मुंबईमध्ये या छेलारामाच्या चिरंजीवांचे लग्न निघाले. मुलाचे लग्न निघाल्यानंतर मुलाचे केस कसे राखावे, भांग कसा पाडावा हे ठरविण्यासाठी छेलारामने लंडनहून न्हावी बोलावला ! ताजमहाल हॉटेलमध्ये तो राहायला आला. या न्हाव्याचा टाईम्समध्ये फोटो आला, त्याची मुलाखत आली. या छेलारामने आपल्या मुलाच्या नुसत्या एका दिवसाच्या लग्नासाठी त्या लंडनच्या हजामाला लंडनहून बोलावून विमानाचे जाण्यायेण्याचे भाडे दिले, ताजमहालमध्ये त्याला ठेवला आणि या सगळ्यावर हजारो रुपये उधळल्याची जगजाहीर बातमी आपण माझ्याप्रमाणेच वाचली असेल.वाह्यात प्रकारचा खर्च करु नये, उधळपट्टी करु नये, साधेपणा असावा हा नुसता उपदेश काय कामाचा? ठीक आहे. ज्या समाजामध्ये छेलारामसारखा एखादा करोडपती सर्व गोष्टी तुच्छ समजून अशी चौफेरपणाने करतो आणि उधळपट्टी व श्रीमंतीचे घृणास्पद प्रदर्शन हे वर्तमानपत्रामध्ये छापून आल्यानंतरसुद्धा त्याला काहीही बंदोबस्त शासन करीत नाही, त्या समाजामध्ये आर्थिक धोरणाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचे नियमन आहे, कुठल्याही प्रकारची शिस्त आहे, किंवा सरकार त्यासंबंधी संकल्पपूर्ण वर्तन करीत आहे असे मानायला माझ्यासारखा माणूस तयार होणार नाही. हे एक उदाहरण मी आपल्याला सांगितले, अशी शेकडो उदाहरणे सांगता येतील.

या समाजाचे एक मुख्य वैशिष्टय मघाशी मी आपल्याला सांगितले, ते कृपा करुन पुन्हा आपण लक्षात घ्या की अविकसित समाजामध्ये विषमतेची खाई जास्त असते. मूठभर श्रीमंत आणि कोटयावधी गरीब अशाप्रकारे केवळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे तर सामाजिकदृष्ट्यासुद्धा सर्वस्वी वंचित, उपेक्षित जसा मोठा मानवी समूह अविकसित राष्ट्रामध्ये जास्तीत जास्त असतो.या देशातला आदिवासी, या देशातला नवबुद्ध किंवा अन्य हरिजन, या देशातला शेतमजूर, या देशातला छोटा ५/७ एकरवाला शेतकरी हा बहुसंख्य समाज या समाजाला कुठल्याही प्रकारची प्रतिष्ठा नाही. या समाजातला निम्मा वर्ग स्त्रियांचा. कुठल्याही प्रकारची सामाजिक प्रतिष्ठा या स्त्रीला प्राप्त नाही. अशाप्रकारे समाजातील निम्मा भाग हा एका प्रकारच्या बंधनामध्ये आहे. उपेक्षेमध्ये आहे ज्याला कोणतेच व्यक्तित्तव नाही असा हाप्रचंड समूह आहे. अशा समाजामध्ये शेकडो छेलाराम व त्यांचे स्वैर वर्तन चालू ठेविले तर आर्थिक समता सोडाच पण समाजाच्या प्रचंड उपेक्षित जनतेला एखादवेळचा पोटभर घास देणेही जमणार नाही. विषमतेचे हे फार बोलके व दु:खद  प्रदर्शन आहे. म्हणून अविकसित समाजाला आपल्या समाजवादाच्या स्वप्नासंबंधी विचार करित असताना पहिला प्रमुख संकल्प जर कुठला करायचा असेल तर या समाजामध्ये केवळ निर्गुण ब्रह्माची चर्चा करुन उपयोग नाही. भारताचे शासनकर्ते व बहुतेक सर्व राजकीय पक्ष ह्या निर्गुणाच्या आनंदामध्ये नेहमी डुबकत असतात. आपण ज्याप्रमाणे तत्त्वज्ञानामध्ये, धर्मतत्त्वामध्ये निर्गुणाची चर्चा करतो, परमेश्वराचे रुप काय, परमार्थाचे स्वरुप काय, स्वर्गाचे रुप काय तशी आर्थिक आणि सामाजिक मल्यांचीसुद्धा आपण निर्गण चर्चा करीत असतो. माझ्या म्हणण्याचा अर्थ कृपा करुन असा करु नका की मी निर्गुणाला काही महत्त्व देत नाही. आदर्शासाठी, उच्च मानसिक विकासासाठी निर्गुणाचे महत्त्व आहे. पण केवळ निर्गुणाचीच चर्चा तुम्ही समाजात करीत राहिलात तर पाखंड निर्माण कराल. निर्गुणाच्या सगुण रुपाची प्रत्यक्ष अनुभूती लोकांना येण्याच्या दृष्टीने, समता असो, आर्थिक संरक्षण असो, सामाजिक प्रतिष्ठा असो अशा मूल्यांचे प्रत्यक्ष अनुभूतीचे जे महत्त्व आहे ते जर समाजामध्ये तुम्ही रुजविले नाही तर समाजामध्ये फक्त ढोंग वाढत राहाते.