• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला१९७३-१७

या सर्वाबद्दल त्याच्या मनात आपुलकीची भावना असते. त्यांचे हितसंबंध या निर्घृण जीवनसंघर्षात कसे सुरक्षित राहतील याची त्याला दक्षता घ्यावीशी वाटते. या निरनिराळ्या प्रेरणांचा एकमेकांना छेद जाऊ लागला, तर त्यामधून दु:ख आणि आपत्ती ओढवतात. मानवी मनातील या निरनिराळ्या निष्ठांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी, त्याच्यामधील तारतम्य सांधण्यासाठी त्या त्या काळातील मूलभूत निष्ठेचा प्रथम शोध घेतला पाहिजे. अगदी प्राचीन काळी जमात हाच मानवी समाजातील प्रमुख गट होता. तेव्हा जमातनि्ठेला आग्रस्थान मिळणे स्वाभाविक होते. मध्ययुगामध्ये समाजजीवनाला धर्माचे अधिष्ठान होते. आधुनिक काळात राष्ट्र हेच मानवी संमाजाच्या संघटित जीवनसरणीचे प्राणतत्व आहे. म्हणून राष्ट्रनिष्ठा हाच आजचा युगधर्म आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबाच्या, जातीच्या, प्राताच्या हिताचा विचार अवश्य करावा, भाषेच्या विकासाची चिंता बाळगावी पण ते करताना राष्ट्राचे स्थैर्य आणि हितसंबंध धोक्यात येणार नाहीत याची काळजी घेणे हे त्याचे कर्तव्य आहे. आता राष्ट्रीयत्व ही आजची मध्यवर्ती कल्पना आहे असे आपण म्हणतो, तेव्हा हे लक्षात ठेवले पाहिजे की राष्ट्रवाद हे एकाच स्वरूपाचे साचेबंद असे सामाजिक तत्त्वज्ञान नाही. निरनिराळ्या ठिकाणी राष्ट्रवादाचा आशय वेगवेगळा असल्याचे दिसून येते. राष्ट्र हा जीवनाचा मध्यबिंदु कल्पून त्या भोवती गुंफलेले तत्त्वज्ञान म्हणजे राष्ट्रवाद कुठे आक्रमक असेल, तर कुठे शांततावादी असेल. कुठे धर्माधिष्ठित असेल तर कुठे धर्मनिरपेक्ष असेल. काही देशांत राष्ट्रवादाला हुकुमशाही अधिष्ठान असेल. आजच्या जगामध्ये या सर्व प्रकारचा राष्ट्रवाद आपणांस दिसून येतो. भारतीय राष्ट्रवादाचा उदय येथील स्वातंत्र्याच्या चळवळीतून झाला आणि तिच्यातून त्याला एक विशिष्ट वळण लागले. या स्वातंत्र्यसंग्रामामागील ज्या प्रेरणा होत्या, त्यामधूनच भारतीय संविधानाची निर्मिती झाली आहे. घटनेने प्रत्येक माणसाला काही मूलभूत हक्क दिलेले आहेत. ‘ Secularism’ किंवा ‘इहवाद’  हे आपल्या या घटनेला पायाभूत असलेले एक तत्त्व आहे. यालाच धर्मनिरपेक्षता असेही म्हणतात. आपल्या देशात हिंदु, मुसलमान, पारशी, ख्रिस्ती बौध्द,जैन, असे नाना धर्माचे व पंथाचे लोक आहेत. त्यांच्यामधे भेदभाव न करता घटनेने सर्वाना सारखे ह्क्क दिले आहेत. याचाच अर्थ हा की आपल्या देशाचे नागरिकत्व जातिधर्मनिरपेक्ष असे आहे. आता सेक्युलॅरिझम. किंवा ऐहिकनिष्ठा या कल्पनेबाबतही पुष्कळदा आशयासंबंधी अनिश्चितपणा दिसून येतो. ऐहिकनिष्ठा म्हणजे धर्मविरोध नव्हे. सर्व धर्मसमभाव असाही त्याचा अर्थ नव्हे. शासनाला स्वत:चा असा कोणताच धर्म नाही. धर्मावरून शासन नागरिकामध्ये भेदभाव करणार नाही. उलट प्रत्येक धर्माला व संस्कृतीला शासनाचे संरक्षण मिळेल असे स्पष्ट आश्वासन घटनेने भारतातील नागरिकांना दिलेले आहे. पण शासन धर्मनिरपेक्ष आहे. हे इतक्या अट्टाहासाने सांगण्यची गरज काय? याचे कारण असे की ब्रिटिशपूर्व कालात आपल्या देशामध्ये धर्म ही सामाजिक जीवनाची एक नियामक शक्ती होती. येथील सामाजिक जीवनावर धर्माचे अधिराज्य होते. माणसामाणसांतील, गटागटातील संबंध धर्माने निश्चित झाले होते. उदाहरणार्थ पतीची सेवा करणे हा पत्नीचा किंवा धन्याशी इमान राखणे हा चाकराचा धर्म मानला जात होता. विज्ञानोत्तर काळात शिक्षण, राजनीती, अर्थव्यवहार या सारखी सामाजिक जीवनाची विविध अंगे धर्माच्या कक्षेतून हळु हळु बाहेर पडली. कोणताही धर्म घ्या, तो हिंदू असो किंवा इस्लाम असो, ख्रिस्ती असो की यहुदी असो, त्याची स्थुलमानाने चार अंगे असतात. प्रत्येक धर्माचे एक स्वतंत्र तत्त्वज्ञान असते. सुष्टी, परमेश्वर आणि मानव या तिघांचे परस्परसंबंध याचा विचार तत्त्वज्ञानामध्ये केला जातो. धर्माचे दुसरे अंग म्हणजे आचार. प्रत्येक धर्मातील लोकांचा एकमेकांशी संबंध येतो. हे संबंध नियमित करणारे शास्त्र म्हणजे धर्मशास्त्र मनु—याज्ञवल्क्यांच्या स्मृती म्हणजे हिंदु धर्मशास्त्र. परंपरागत हिंदू कायदा होय. मात्र केवळ कायद्याने मानवी मनाचे समाधान होत नाही. कायद्याच्या मागे विशिष्ट मूल्यभाव, एक सर्वकष नीतिविवेकही असतो. धर्माचे तिसरे अंग म्हणजे कर्मकांड. प्रत्येक धर्माने परमेश्वर—प्राप्तीचे काही मार्ग सांगितले आहेत. गृहस्थ आणि संन्यासी असा फरक करून प्रत्येकाला वेगळा आचारधर्म घालून दिलेला आहे. धर्माची विशिष्ट अशी एक उपासनापध्दती आहे. विज्ञानाच्या युगात वरीलपैकी पुष्कळ गोष्टी शास्त्राच्या कक्षेत आल्या आहेत. उदा. पृथ्वी, चंद्र, ग्रहगोल, अणुपरमाणू यांचे ज्ञान हवे असेल तर बायबल अथवा उपनिषदे वाचून भागणार नाही. त्या त्या शास्त्राचाच स्वतंत्रपणे अभ्यास करावा लागेल. त्याचप्रमाणे सामाजिक संबधांनाही आता धर्माचे अधिष्ठान राहिलेले नाही.