महाराष्ट्रातील दुष्काळ - १८२

९.  जलसिंचन धोरणात खालील बाबींचा समावेश असावा.

अ)  मुबलक जलसंपत्ती असलेल्या प्रदेशात उपलब्ध क्षेत्रात बहूपिके घेऊन कमाल उत्पादन करणे.

ब)  देशातील बर्‍याच भागात जेथे मध्यम अगर अल्प पाऊस होतो तेथे उपलब्ध पाण्याचा वापर करून कमाल उत्पादन घेणे.

क)  अवर्षण प्रवण क्षेत्रास संरक्षक सिंचनाची हमी देणे.

ड)  पावसाला पूरक सिंचन देऊन पावसाळ्यात कमाल क्षेत्र ओलिताखाली आणणे.

इ)  उन्हाळी हंगामात बाष्पीभवनामुळे तलावातील पाण्याची जास्त तूट होत असल्याने उरलेल्या आठ महिन्यात साठविलेल्या पाण्याचा सिंचनाकरिता कमाल वापर करणे.

फ)  प्रवाही व भूजलाचा एकत्रित वापर करणे.

१०.  खरीप हंगामातील सिंचनासाठी बारमाही प्रवाहित नसलेल्या नाल्यावरही पाणी वळवून सिंचन करण्याच्या योजनांचे अन्वेषण करणे.

११.  कमी पर्जन्याच्या प्रदेशात नवीन सिंचन योजना तयार करतांना सलग गटात जळण आणि वृक्ष वैरणीच्या क्षेत्रासाठी सिंचनाची सोय निर्माण करण्याचे प्रयत्‍न करावेत.

१२.  पाटबंधारे प्रकल्पाच्या अन्वेषणाला बराच कालावधी लागतो.  महणून बरेचसे पूर्णपणे अन्वेषण केलेले पाटबंधारे प्रकल्प अहवाल वेळीच तयार असणे आवश्यक आहे.  म्हणजे गरजेप्रमाणे कोणताही प्रकल्प हाती घेता येईल.

१३.  पाटबंधारे प्रकल्प अहवाल तीन भागात तयार करावा -

भाग - १  पाणी पुरवठ्याच्या उगमापासून तर विमोचके व जलनिस्सारण चरापर्यंतची सर्व अभियांत्रिकी कामे.
भाग - २  जमीन सपाटीकरण, शेतकर्‍यांची बांधकामे, अस्तरसहित व अस्तररहित शेतचार्‍या.  शेतातील चर-शेतरस्ते इ. लाभक्षेत्रातील अभियांत्रिकी कामे.

भाग - ३  कृषि, पशूसंवर्धन, वन, मत्सोद्योग आणि सहकारांसंबंधी इतर सर्व बाबी.

उपरोक्त सर्व बाबींचे एकाच वेळी अन्वेषण केले जावे व अहवालाला मंजुरी एकत्रितपणे घेतली जावी.

१४.  चार्‍याच्या अस्तरीकरणाच्या प्राथम्याबाबत खालील शिफारशी आहेत.

अ)  नवीन प्रकल्प आणि नुतनीकरणाचे प्रकल्पातील ज्या वितरिका जास्त काळ चालू राहातील अशांच्या अस्तरीकरणास प्राधान्य द्यावे, कारण एकदा सिंचन सुरू झाल्यावर त्यांचे अस्तरीकरण करणे अव्यवहार्य होते.

ब)  जुन्या प्रकल्पातील लहान चार्‍याच्या अस्तरी करणास प्राधान्य द्यावे.