महाराष्ट्रातील दुष्काळ - १५८

८. देवसिंह रामसिंह शेखावत

अमरावती,

प्रश्न  :  पश्चिम विदर्भाच्या कोरडवाहू व खारमिश्रित भूभागातून आठ-दहा-बारामाही वाहाणार्‍या नद्यावर पात्रभर लहान लहान बंधारे घालून पाणी अडवणे शक्य आहे काय ?  नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ऍल्युव्हियल भूभागात सस्वयंनियंत्रित बंधारे घालण्याचे तंत्र उपलब्ध करता येईल काय ?  अशा आराखड्यांचे आराखडे उपलब्ध आहेत काय ?  अशा बंधार्‍यातून पिण्याच्या पाण्यासाठी व सिंचनासाठी उपयोग करण्याच्या हेतूने प्रायोगिक योजना तयार करता येतील काय ?  विदर्भांच्या अमरावती, अकोला, बुलढाणा व यवतमाळ ह्या चार जिल्ह्यात उत्तम प्रकारची शेती आहे पण विहिरीशिवाय पाणी सिंचनाच्या दुसर्‍या योजना नाहीत.  विहिरींचे पाणी आटत चालले आहे.  त्यामुळे संत्राबागांवर कोळशीचा रोग पाण्याच्या कमतरतेमुळे निर्माण झालेला आहे.  ह्यावर उपाय म्हणून नद्यांचे पाणी अडविणे, मुरविणे व जिरवणे ह्या उपायांची सिंचनासाठी उपलब्ध करता येईल काय ?  बंधारे होण्यासाठी पृष्ठभागात खडक नाहीत तेव्हा या परिस्थितीत कमी खर्चात पाणी अडविण्यासाठी बंधारे घालण्याचे तंत्र उपलब्ध नाही.  हे तंत्र प्रगत करणे आवश्यक आहे.  नदीच्या पात्रात पायाभूत जमीनदोस्त भिंत टाकून गोडबोले पद्धतीने दार घालून छोटे बंधारे उभे करणे लाभदायक होऊ शकेल काय हे तपासण्यास यावे.

उत्तर :  डॉ. शेखावत यांनी उपस्थित केलेले प्रश्न जमीन व पाणी ह्या दोन्ही नैसर्गिक संपत्तीच्या संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

डॉ. शेखावत ज्या पश्चिम विदर्भातील प्रदेशाचा उल्लेख केला आहे तेथे पावसाचे प्रमाणही बरे आहे.  पाणी अडविण्यासाठी भूगर्भाच्या रचनेतील लक्षात घेऊन, नवीन तंत्रविद्येचा वापर करावा लागेल.  अभियांत्रिकी तंत्रविद्येत आता कमालीची प्रगती झाली आहे.  श्री शेखावत ह्यांनी जे प्रश्न मांडले आहेत, त्यांची उत्तरे शोधून, वास्तवात त्यांना आकार देणे, अवघड नाही, फक्त एकाच पद्धतीने त्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढणे, शक्य होत नसले म्हणून हे प्रश्न सदासर्वकाळ अनुत्तरित राहाणार असे समजणे योग्य ठरणार नाही.  स्थानिक परिस्थिती, भूगर्भाची रचना, मातीचा प्रकार; त्याचबरोबर, वृक्ष, शेती आणि गवत व पीकरचना ह्या सर्व संबंधित बाबींचा विचार करून, स्थानिक पाणी अडवण्याचे आकृतिबंध तयार करावे लागतील.  जरूर पडल्यास ह्यासंबंधी काही प्रयोगही करता येतील.  तथापि जमिनीची धूप थांबू शकेल व विहिरींच्या पाण्याची पातळी वाढवली जाऊ शकेल, ज्यामुळे उन्हाळ्यात व हिवसाळ्यातही पाणी सहजतेने उपलब्ध होऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण करणे आवश्यक आहे.

डॉ. शेखावत ह्यांनी उपस्थित केलेल्या समस्या जनहिताच्या दृष्टीने सोडवण्याचा प्रयत्‍न झाला पाहिजे.  त्यासाठी प्रचलित व परंपरागत पीक पद्धतीतही आवश्यक तो बदल केला पाहिजे.  शेतकर्‍यांच्या अधिक फायदा होईल अशी पीक पद्धती सुचविल्यास शेतकर्‍यांकडून सहकार्य सहजपणे मिळू शकेल.