महाराष्ट्रातील दुष्काळ - १३६

१५. दुष्काळ हटवण्यासाठी पाणी अडवा आणि वापरा

वसंतरावदादा पाटील
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
भूतपूर्व अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,
महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे शिल्पकार
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------

अडवलेले पाणी पुरेपूर वापरात नाही.  पावसाचे थोडेही का होईना पडणारे पाणी अडवण्याचे महान काम अण्णा हजार्‍यांनी केले. त्याचे अनुकरण करा.  राष्ट्रीय पाणी धोरण शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

''या चर्चेच्या संदर्भात मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत.  त्या मी सूत्र रूपाने सांगतो.  विनायकराव पाटलांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले.  दुष्काळ आणि पाणी या संबंधात त्यांचे तीन मुद्दे आहेत.  त्यांच्या सूचनांमध्ये दुरुस्ती करून मी एवढेच म्हणेन की आपण त्याचे दोन भाग करावेत.  ते असे :  एक, पाणी अडवा आणि जिरवा; दुसरा, पाणी अडवा आणि त्याचा वापर करा.

असे का ?  कारण जे मोठे प्रकल्प आहेत, तिथे आपण पाणी अडवतो; पण ते पाणी काही जिरवले जात नाही.  जे पाणी भूगर्भातून वाहते ते लोकांना पुरत नाही.

असे पाण्याचे जर दोन भाग केले तर, या दोन्ही भागांसाठी स्वतंत्र उत्तरे आहेत.  पण ते दीर्घ आहे.  उदाहरणार्थ, जिथे दुष्काळी विभाग आहे.  जिथे साधारणपणे ५०० मि. मी. पेक्षा कमी पाऊस पडतो.  बहुतेक अहमदनगर-पुणे हा भाग आहे.  ह्या भागाबाबत असे दिसून येईल की, साधारण १०० वर्षामध्ये जवळजवळ ४३ वेळा साधारणपणे ३०० ते ४०० मिली मीटर पाऊस पडतो.  आणि एका वेळेला तर २०८ मिली मीटर पडला होता.  जेमतेम पाऊस १९०७-७२ च्या दुष्काळामध्येही पडला होता.  तिथे काही प्रयोग, काही योजना कराव्या लागतील.  कारण इतर भागांध्मये जास्त पाणी (अहमदनगर-जिल्ह्यात) अडवलेले आहे.  ते कॅनॉलच्या रूपाने लोकांना दिले आहे.  उत्तराचा दुसरा भाग असा की राळेगण शिंदीला जे काही प्रयोग झालेले आहेत, त्यांचा मी जवळून अभ्यास केलेला आहे.  तांत्रिक दृष्ट्या ते मी आपल्यासमोर मांडतो.

राळेगण शिंदीची सर्वसाधारण लोकसंख्या २१०० आहे.  त्यांचे पाणलोट क्षेत्र आहे ते साधारण १२०० एकरचे आहे.  अशा परिस्थितीमध्ये अण्णा हजारे यांनी गेली दहा वर्ष पाणी अडवा आणि पाणी जिरवा हे प्रयोग केले.  ह्या प्रयोगांचा परिणाम असा झाला की यंदा पावसाचे पाणी पडो किंवा ना पडो तिथे पिण्याच्या पाण्यांची टंचाई नाही !  शेतकरी लोक मोठ्या अभिमानाने सांगतात की, शेजारच्या गावी टँकर्स जात आहेत.  पण हजार्‍यांच्या गावी टँकरचे पाणी आणत नाही.  परवा १५ दिवसांपूर्वी मी तिथे गेलो होतो.  माने नावाचे गाव तलाठी आहेत.  त्यांच्याशी गप्पा केल्या.  तलाठी असे म्हणाले की मामलतदाराकडून दोन पत्रे आलेली आहेत.  त्यात लिहिले आहे की तुमच्या गावातील ज्यांनी रोजगार हमी योजनेवर काम करण्याकरता नावे नोंदवलेली आहेत किंवा नावे नोंदवलेली नाहीत पण काम करायला जे तयार असतील त्यांना तुम्ही आमच्या कार्यालयात पाठवा.  तलाठी माने मला म्हणाले की, गावात चौकशी केली तर रोजगार हमीच्या योजनेच्या कामावर जाण्याची इच्छा बाळगणारा एकही मनुष्य नाही.  म्हणजे पाणी अडवून आणि जिरवून सायंटीफिकपणे सर्वांना भरपूर काम उपलब्ध होऊ शकते.

येथे काल महानोरसाहेबांनी आडगावची गोष्ट सांगितली.  एकदा मी आडगावला जाऊन आलेलो आहे.  तेथे मी पाहिलेले आहे.  राळेगण शिंदीला आडगांवपेक्षाही कमी पाणी आहे.  हे लक्षात ठेवा.  गेल्या शंभर वर्षात ४३ वर्षे ३०० मिलीमीटरपेक्षा जाऊस कमी पडलेला आहे.  तेथील लोकांना बाहेर खडी फोडायला जावे लागत होते परंतु गेल्या १० वर्षामध्ये जे नाला बंदीचे काम ग्रामीण शेतीवर सुरू झाले, त्याच्यामुळे स्वयंरोजगार हा उपलब्ध झाला.  आणि त्या उपलब्धीचा हा परिणाम झाला.