महाराष्ट्रातील दुष्काळ - ११०

महाराष्ट्राच्या पठारावरती पाणी कमी आहे.  हे सगळ्यांनाच माहीत आहे.  परंतु ह्याच महाराष्ट्रात कोकणात भरपूर पाऊस पडतो.  हे सर्व पाणी अरबी समुद्राकडून मिळते आणि अखेरीस अरबी समुद्राला मिळते.  पाण्याची कोकणाला जेवढी गरज असेल तेवढी भागवूनसुद्धा, ते घाटावरती आणणे शक्य आहे की नाही ?  ते शक्य आहे.  आमच्या संगमनेर भागांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष आहे.  हे खरे आहे.  पण देशावरचे पाणी आम्ही कोकणात पाठवले असे कोठे कोठे घडले आहे ?  तर असे हे सगळ्या ठिकाणी घडले आहे.  प्रथम टाटांनी हे घडवले.  टाटांनी काय केले इंग्रजांच्या काळात ?  आहे का कोणाला माहीत ?  आणि देशावरचे पाणी कोकणात नेले.  याला टाटांनी प्रथम सुरवात केली.  लोणावळ्याजवळ धरण बांधले आहे.  ते देशावर आहे.  तेथील पाणी टाटांनी खोपोलीला आणले कोकणात आणले.  तेथे वीज निर्माण केली.  त्यानंतर देशावर बांधले गेलेले कोयनेवरचे धरण !  हेही मुंबईकरांसाठी केले.  वैतरणा धरण बांधले आणि वैतरणा धरण बांधून देशावरचे पाणी कोकणात पाठवले.  अशापद्धतीने आम्ही देशावरचे पाणी कोकणात पाठवायला लागलो.  ह्या उलट कोकणातले पाणी जर देशावर आणले, आणि आजचा क्रम उलटा ठेवला तर ?  आम्ही ह्या पाण्यातून निर्माण करतो हायड्रो.  एके काळी हायड्रोची गरज होती.  हायड्रो इलेक्ट्रीसिटी.  महाराष्ट्रामध्ये ७० टक्के वीज हैड्रोमार्फत होते.  परंतु आज काय प्रमाण आहे ?  आज महाराष्ट्रामध्ये थर्मल पावरची स्टेशने झाली आहेत.  जवळ जवळ अकरा हजार मॅगावॅट इलेक्ट्रीसिटी तयार होते.  त्यातून फक्त २० टक्के इलेक्ट्रीसिटी त्या हायड्रोमार्फत होते.  जर तुमची ८० टक्के इलेक्ट्रीसिटी ही थर्मल पावर स्टेशनामधून होते, तर २० टक्के तुम्ही हायड्रोमार्फत तयार करताच कशाला ?  आज महाराष्ट्रामध्ये जर पाण्याचा दुष्काळ आहे तर हायड्रो इलेक्ट्रीसिटी निर्माण बंद करून हे पाणी शेतीसाठी का वापरू शकत नाही ? अशाप्रकारे विचार करण्याची गरज नाही काय ?

दुसरा मुद्दा मी मांडू इच्छितो :  तो हा की ऊस लावायचा की ज्वारी-बाजरी करायची ?  हा वाद काही ठिकाणी चालू असलेला दिसतोय.  ही काय शेतकर्‍याला हौस आहे ऊस लावण्याची ?  जर ज्वारी-बाजरीच्या धान्याला चांगले भाव मिळाले तर ऊस लावला पाहिजे काय ?  ऊस की ज्वारी-बाजरी अशी तुलना करण्याची काही गरज आहे काय ?  पण मूळ मुद्दा राहातो बाजूला, ज्वारी बाजरी, गव्हाला भाव काही द्यायचे नाहीत.  त्यांचे संशोधन करायचे नाही की व्हायचे नाही !  आज जे संशोधन विद्यापीठात चाललेले आहे किंवा जिला आपण हरित-क्रांती म्हणतो त्या हरित-क्रांतीकडे पाण्याच्या दृष्टीकोनातून बघितले पाहिजेत.  पाण्याशिवाय ज्वारी येत नाही, की पाण्याशिवाय बाजरीही येत नाही.  तसेच पाण्याशिवाय गहूही येत नाही.  आठआठ वेळा पाणी देऊनसुद्धा गहू येत नाही.  अशी पाण्याची बिकट अवस्था आलेली आहे.  आणि मग आम्ही जिरायत कशाला म्हणायचे ?  महाराष्ट्रामध्ये उत्पन्न वाढत नाही.  जर महाराष्ट्रांमध्ये शेती उत्पन्न वाढत नाहीतर महाराष्ट्राचे संशोधन तरी कोणत्या दिशेला चालले आहे ?  महाराष्ट्र कृषी विद्यापीठांची दिशा ती काय ?  महाराष्ट्रामध्ये जर ८० टक्के जिराईत भाग आहे, तर ८० टक्के जिराइती भागासाठी शेतीचे संशोधन व्हायला पाहिजे.