• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

महाराष्ट्रातील दुष्काळ - ९४

नजरेत भरणारे यश

केवळ दोनच वर्षातील या कार्यक्रमाचा उत्पादकतेवर किती परिणाम झाला, हेही पाहण्यासारखे आहे.  सुमारे ३.२ हेक्टरच्या क्षेत्रात वरील उपाययोजना करण्यापूर्वी म्हणजे १९८५ पूर्वी जेमतेम चार क्विंटल ज्वारी किंवा बाजरी पिकत होती.  परंतु १९८७-८८ मध्ये नऊ क्विंटल बाजरी, एक क्विंटल तूर, दोन क्विंटल मटकी आणि आठ किलो कापूस इतके उत्पन्न याच क्षेत्रातून मिळाले.  पैशाच्या भाषेत तुलना करायची तर त्या जमिनीतून आठशे रुपयांचे उत्पन्न मिळत होते, ते ४,१६० रुपये झाले.  याखेरीज याच जागेत आज बोरी, निलगिरी, चिंच, कडूलिंब, रिठा, बिब्बा, आवठा, तिळ, सुबाभूळ या जातींची एकूण १,४०० झाडेही वाढत आहेत.  त्यापासून मिळेल ते उत्पन्न वेगळे.

सन १९८७-८८ मध्ये आडगाव-खुर्दचे खरीप व रब्बी पिकांचे एकूण उत्पन्न सुमारे १५ लाख रुपये झाले आहे.  जमिनीचा कस जसा सुधारणार आहे आणि शेतीतील गुंतवणुकीसाठी आडगावातील शेतकर्‍यांकडे जसा अधिकाधिक पैसा येणार आहे, तसे हे उत्पन्न वाढतच जाणार आहे !

जवाहर गांधी यांना अभिप्रेत असलेला ग्रामीण विकासाचा प्रकल्प एकढ्यावरच संपत नाही.  मोठी धरणे बांधण्याऐवजी गाव पातळींवर छोट्या पाणलोटाचे नियोजन करून त्याच साधनसामुग्रीत गाव समृद्ध करता येते, हे दाखवून देणे हा फक्त पहिला टप्पा झाला.  अजून बरीच वाटचाल करायची आहे.  आडगावाकडे ग्रामस्वराज्याची कल्पना साकार करणारे 'आदर्श गाव' म्हणून बोट दाखविता आले पाहिजे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.  त्यासाठी गोबर गॅस प्रकल्प उभारणे, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गावात संडास बांधणे (त्यातील काही सार्वजनिक वापरासाठी) सांडपाण्याची वेगळी व्यवस्था करणे या बाबी अग्रक्रमाने करायच्या आहेत.

स्त्रियांचा सहभाग नाही

जवाहर गांधींना आणखी एक खंत आहे ती गावाच्या निर्णयप्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग नाहीच याची.  गावात निर्धुर चुलींचा वापर व्हावा असा प्रयत्‍न आहे.  आधी बनविलेल्या चुलींच्या बाबतीत व्यवहारात कोणत्या अडचणी येतात, हे स्त्रियांकडूनच समजावून घेऊन आता आणखी आठ 'निर्धूर चुली' गावातच बनविण्यात आल्या आहेत.  या चुली जर मनासारख्या आहेत असे स्त्रियांना वाटले, तर मग याच पद्धतीने अनेक चुली बनविण्याची योजना आहे.  याखेरीज गावातच उपयुक्त ठरेल असे व्यावसायिक तंत्रशिक्षण तरुण-तरूणींना देण्याचीही योजना आहे.  हे सर्व प्रत्यक्षात आले की, दैनंदिन जीवनातील बहुतेक गरजा भागविण्यासाठी आडगावातील रहिवाशांना गावाबाहेर जाण्याची आवश्यकताच उरणार नाही !

शेती फायदेशीर होऊ लागली.  अल्प भूधारकांचा शेतमजूर होण्याची प्रक्रिया थांबली.  गावातील भूमिहीनांना गावातच मजूरी मिळू लागल्यामुळे त्यांचे स्थलांतर बंद झाले.  गुरांना भरपूर चारा मिळू लागल्यामुळे गावातून दूध विक्रीसाठी बाहेर जाऊ लागले.  एकूणच दुष्काळाचे दुष्टचक्र गावाने मोडले.

लोकांचा सहभाग महत्त्वाचा

जवाहर गांधी यांच्या शब्दात प्रयोगाचे सार सांगायचे तर पाणी, माती, गवत आणि झाड या चार गोष्टींचा हा खेळ आहे.  पण त्यामागील निर्णायक घटक आहे तो माणूस.  माणसांचा आडगावसारखा सहभाग असेल तर कोणतेही गाव सुधारता येईल.  गावातील परिस्थितीनुसार या प्रकल्पांसाठी सुरुवातीला १० ते १२ लाख रुपये हवेत.  सरकारला खरोखरीच आडगावचे 'मॉडेल' इतरत्र यशस्वीपणे राबवायचे असेल तर जेथे स्वयंसेवी संस्थांमार्फत लोकांचा सहभाग शक्य आहे, तेथेच ते राबविले गेले पाहिजे अशी माझी भूमिका आहे....