• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भाग २ विधानपरिषदेतील भाषणे-३१

४२

डॉ. भास्कर पटेल यांच्या निधनाबाबत शोकप्रस्ताव* (१७ मार्च १९६२)
------------------------------------------------------------
माजी दारुबंदी उपमंत्री डॉ. भास्कर पटेल यांच्या निधानासंबंधी मा.श्री.यशवंतराव चव्हाण यांनी शोक प्रस्ताव मांडून त्यांच्या कर्तृत्वपूर्ण कारकीर्दीबद्दल गौरवोद्‍गार काढले.
------------------------------------------------------------------------
*M.L.C. Debates. Vol. VI, Part II (Inside No 2), 19th March 1962, pp. 17-18.

ह्या सन्माननीय सभागृहाचे माननीय सभासद आणि मागील मंत्रिमंडळातील उपमंत्री डॉ. भास्करभाई पटेल यांच्या दुःखद मृत्यूसंबंधाचा उल्लेख करण्याचा कठोर प्रसंग ह्या वेळी माझ्यावर आलेला आहे. डॉ. भास्करभाई पटेल यांचा आणि माझा पहिला संबंध ते १९५२ साली मुंबई विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले तेव्हा आला. आपल्या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती, स्वातंत्र्याच्या चळवळीशी अगदी निकटचा संबंध असलेले आणि मुंबई शहरातील व गुजरातमधील एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून ते १९२० सालापासून सर्वांना माहीत आहेत. त्यानंतर १९५४  सालापासून पुढे ते जुन्या मुंबई राज्याच्या मंत्रिमंडळात दारूबंदी खात्याचे उपमंत्री म्हणून काम करीत होते. अध्यक्ष महाराज, मी ह्या सभागृहाला सांगू इच्छितो की, केवळ माझ्या आग्रहाला मान देऊनच त्यांनी हे उपमंत्रीपद स्वीकारले होते. तसे पाहिले तर मुंबई शहरात हजारो रुपयांची त्यांची प्रॅक्टिस होती, पण केवळ माझ्या आग्रहाखातर त्यांनी उपमंत्रीपदाची ही जिम्मेदारी स्वीकारली. एकदा कोणतेही काम पत्करले म्हणजे ते अत्यंत निष्ठेने पार पाडण्याचा त्यांचा स्वभाव होता आणि त्या स्वभावाला अनुसरून ते आजारी पडले त्या क्षणापर्यंत त्यांनी आपले काम निष्ठापूर्वक, एकमार्गीपणे आणि अत्यंत सरळपणे केले. खरोखरी त्यांच्यासारखा कार्यकर्ता मिळणे ही अत्यंत दुर्मिळ अशीच गोष्ट आहे. त्यांच्या मृत्यूने वैद्यकीय क्षेत्राचे त्याचप्रमाणे मुंबई शहरातील राजकीय आणि सामाजिक जीवनाचे फार मोठे नुकसान झाले आहे. असा अत्यंत कार्यदक्ष असा एक सहकारी गमावल्याबद्दल मला अत्यंत दुःख होत आहे.

डॉ. भास्करभाई पटेल यांचे आयुष्य अतिशय कर्तृत्वपूर्ण घटनांनी भरलेले होते. सन १८९७ साली गुजरातमधील कैरा जिल्ह्यातील सोजिरा गावी त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण आपल्या गावी घेतले व ते १९१२ साली ग्रँट मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी म्हणून दाखल झाले. पुढे १९२० साली महात्मा गांधींनी हाक दिल्यावरून ते राष्ट्रीय चळवळीत भाग घेण्यासाठी आपले शिक्षण सोडून पुढे आले. १९२१-२२ साली त्यांनी रावजीभाई पटेल यांच्याबरोबर साबरमती आश्रमात काम केले.

१९२६ सालच्या सुमारास राष्ट्रीय चळवळीचे वातावरण थोडेसे थंड झाले तेव्हा त्यांनी आपल्या अभ्यासक्रमास पुन्हा सुरुवात केली. १९२२ साली ते वैद्यकीय अभ्यासासाठी जर्मनीला गेले व त्यांनी १९२७ साली एम्.डी.ची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी आपली प्रॅक्टिस सुरू केली. इतक्यात १९३० साली देशात असहकार चळवळीचे आंदोलन सुरू झाले व त्यांनी ह्या चळवळीत भाग घेतला. १९३० ते १९३४  सालापर्यंत त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास पत्करला होता. १९३४  साली तुरुंगातून बाहेर आल्यानंतर उच्च वैद्यकीय अभ्यासासाठी ते परदेशी गेले व वेल्सच्या कार्डिफ युनिव्हर्सिटीचा टी.बी.चा स्पेशल डिप्लोमा संपादन करून परत स्वदेशी आले. तेव्हापासून टी.बी. स्पेशालिस्ट म्हणून ते नावाजले गेले. मुंबईत जे.जे.हॉस्पिटलमध्ये ऑनररी टी.बी.स्पेशालिस्ट म्हणून त्यांनी काम केले व पुढे १९४० साली ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून त्यांची नेमणूक झाली. पण पुढे लौकरच १९४२ साली क्विट इंडियाची चळवळ सुरू झाली तेव्हा त्यांनी आपला व्यवसाय सोडून ह्या चळवळीत भाग घेतला. ह्या वेळी त्यांनी पुन्हा ९ महिनेपर्यंत तुरुंगवास भोगला. नंतर १९४७ साली त्या वेळच्या मुंबई सरकारने एक वर्षासाठी स्पेशल टी.बी. ऑफिसर म्हणून त्यांची नेमणूक केली.

अध्यक्ष महाराज, अशा रीतीने त्यांचे सगळे जीवन पाहिले तर व्यवसाय वैद्यकीय असूनही जेव्हा जेव्हा राष्ट्राची हाक आली तेव्हा तेव्हा ते धावून आले व त्यांनी आपल्या आयुष्याची ४० वर्षे एक प्रकारची तपश्चर्या केली. अशा प्रकारचा एक अत्यंत तळमळीचा कार्यकर्ता आणि आपला सहकारी आपल्यामधून गेल्यामुळे ह्या सभागृहाचे फार मोठे नुकसान झालेले आहे. डॉ. भास्करभाई पटेल यांच्या निधनामुळे त्यांची उपमंत्री या नात्याने आपल्याला उणीव भासेलच. पण त्याहीपेक्षा डॉ. भास्करभाई ह्या व्यक्तीची उणीव अधिक भासेल.

अध्यक्ष महाराज, डॉ. भास्करभाई पटेल यांच्याबद्दल मी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात याव्यात अशी विनंती करून मी रजा घेतो.
------------------------------------------------------------------------------
On Monday, 19th  March 1962, Shri Y. B. Chavan. Chief MInister moved a condolatory resolution in the Council regarding the sad demise of Dr. Bhaskar R. Patel. M.L.C. and ex-Deputy Minister for Prohibition.