• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भाग १ विधानसभेतील भाषणे-८०

२२

दिवंगत मान्यवर व्यक्तीना आदरांजली* (२७ नोव्हेंबर १९६१)
----------------------------------------------------

कै. भाऊसाहेब हिरे, सर रेजिनाल्ड स्पेन्स, श्री. एल्.एन्. भोईर व डॉ.एम्.यू्. मस्कारेन्यास यांच्या निधनाबद्दल मा.चव्हाण यानी शोक प्रस्ताव मांडला.
----------------------------------------------------------------
(* Maharashtra Legislative Assembly Debates, Vol. v, Part II, 27th November 1961, pp. 1-2

अध्यक्ष महाराज, या सेशनच्या अगदी पहिल्याच दिवशी एका दुःखद प्रसंगाचा उल्लेख करण्याचा प्रसंग माझ्यावर आलेला आहे आणि तो म्हणजे श्री.भाऊसाहेब हिरे यांच्या दुःखद निधनाबद्दल. कै. भाऊसाहेब हिरे हे सध्याच्या विधानसभेचे सभासद होते व जुन्या मुंबई राज्याच्या मंत्रीमंडळात ते एक ज्येष्ठ मंत्री म्हणून काम करीत होते. यामुळे आपणा सर्वांचे त्यांना श्रध्दांजली वाहण्याचे कर्तव्य आहे. गेल्या महिन्याच्या ६ तारखेला अनपेक्षित रीत्या आम्हाला त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकण्याचा प्रसंग आला. मृत्यूसमयी त्यांचे वय ५७ वर्षांचे होते. त्या दिवशी ते काही कामानिमित्त धुळयाला जीपमधून चालले होते. त्यावेळी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला व धुळयाला पोचल्यानंतर त्यांना मृत्यू आला. त्यांच्या मृत्यूची बातमी आम्हाला इतक्या अनपेक्षितरीत्या ऐकावयास मिळेल अशी कोणालाही कल्पना नव्हती.

अध्यक्ष महाराज, कै. भाऊसाहेब हिरे यांचे जीवन अनेक कामांनी भरलेले आहे. त्यांच्या कोणत्या कामाला महत्त्व द्यावे आणि कोणत्या कामाला गौण लेखावे हेच समजत नाही. त्यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये फार मोलाची कामगिरी केली आहे. महाराष्ट्र निर्मितीचे त्यांनी प्रथमपासूनच समर्थन केले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीकरिता जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्‍नांना महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत मोलाचे स्थान आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीकरिता ज्या काही गोष्टी केल्या आहेत त्यांच्यापैकी काही केल्या नसत्या तर आज निर्माण झालेला महाराष्ट्र याच परिस्थितीमध्ये आपल्याला दिसला असता किंवा नाही याबद्दल मला शंका आहे. महाराष्ट्राची निर्मिती व्हावी याकरिता पहिली परिषद त्यांनीच घेतली. त्याचप्रमाणे नागपूर करार घडवून आणण्याच्या कामी आणि त्याला मूर्त स्वरूप देण्याच्या कामी त्यांनी अत्यंत महत्त्वाची कामगिरी केली आहे.

दुसरी गोष्ट अशी की, गेल्या चार-पाच वर्षांत ते सरकारच्या बाहेर असतानासुध्दा त्यांनी सरकारने केलेल्या कामाकडे पाहण्याचे धोरण अत्यंत उदात्त असे ठेवले होते; आणि त्यांनी असे धोरण ठेवल्यामुळेच सरकारला बरेच काम करता आले. या राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने, राज्यकर्त्या पक्षाचा प्रमुख म्हणून आणि मी स्वतः व्यक्तिगतरीत्या त्यांनी महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीला जी जी काही मदत केली आहे त्याच्याबद्दल त्यांचा येथे कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो, आणि असा उल्लेख करणे मी माझे कर्तव्य समजतो.

या व्यतिरिक्त कै. भाऊसाहेब हिरे यांनी शिक्षण क्षेत्रात आणि सहकार क्षेत्रात अत्यंत मोलाची अशी कामगिरी केली आहे. त्यांची शिक्षण क्षेत्रातील कामगिरी पाहावयाची असल्यास आपल्याला नाशिक जिल्ह्यात जावे लागेल. तेथे त्यांनी या क्षेत्रात फार मोठी कामगिरी करून ठेवली आहे. मागच्या तीन-चार वर्षांपासून ते सहकारी क्षेत्रात काम करीत होते आणि या क्षेत्रात त्यांनी महाराष्ट्रात अत्यंत मोलाची कामगिरी करून ठेवली आहे. त्यांच्या या प्रगतीमुळेच महाराष्ट्र सहकारी क्षेत्राची फार मोठी प्रगती करू शकला. त्यांच्या निधनामुळे आमच्यातील एक मोठा सहकारी क्षेत्रातील कार्यकर्ता एक थोर राजकीय नेता व एक थोर राज्यकर्ता आमच्यातून गेला असे म्हणावे लागते. त्यांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्राचे जे नुकसान झाले आहे ते लवकर भरून निघणार नाही. गेल्या काही दिवसात आम्ही त्यांच्या आणखी जवळ जाण्याचा प्रसंग निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होतो, परंतु दुर्दैवाने काळाने त्यांना आमच्यापासून हिरावून घेतले. या सभागृहाच्या भावना त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात याव्यात, अशी मी विनंती करून त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असे जाहीर करतो.