• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भाग १ विधानसभेतील भाषणे-१२

आमच्या एका मराठी कवीने यासंबंधीची आमची भावना फार सुंदर रीतीने व्यक्त केली आहे. तो म्हणतो, मराठी बोलणारा मनुष्य जेव्हा मराठवाडयाकडे जायला निघतो तेव्हा माहेराला जायला निघालो आहे असे त्याला वाटते. मराठीतील उत्कृष्ट काव्य मराठवाडयातल्या पैठणला लिहिले गेले आहे. एकनाथ, ज्ञानेश्वर ह्यांसारखे महाराष्ट्राचे मोठे संत त्या ठिकाणी होऊन गेलेले असल्यामुळे मराठवाडयाबद्दल महाराष्ट्रीयांना आपुलकी वाटते. थोडक्यात सांगावयाचे तर महाराष्ट्राचे अंतःकरण ह्या भागाशी एकजीव झालेले आहे अशी ह्या मराठवाडयाबद्दल भावना आहे. म्हणून हैद्राबादच्या निजामशाहीच्या कचाटयातून मराठी भाषिकांची मुक्तता झाली याबद्दल मला आनंद वाटला असून या भावनेमागे निर्भेळ आनंदाशिवाय अन्य कोणतीही भावना नाही. एका मराठी भाषिकाला दुसर्‍याबद्दल जी आपुलकीची भावना वाटत असते, त्या भावनेमुळे मराठवाडा महाराष्ट्राला मिळाला यामध्ये महाराष्ट्राला फार मोठा आनंद वाटत आहे. विदर्भाचे छोटे राज्य असावे असा आपला आग्रह राष्ट्रनेत्यांच्या विनंतीला मान देऊन तेथील काही पुढार्‍यानी सोडला आणि विदर्भासह महाराष्ट्र निर्माण होत आहे याबद्दल मला आनंद वाटतो. एका भाषेला एका राज्यात एकत्र आणण्याचा जो प्रवाह व जी प्रक्रिया दिसत आहे, ती स्वागतार्ह आहे. ज्या प्रमाणात असे एकत्रीकरण झाले आहे त्या प्रमाणात मी माझा या विधेयकावर आनंद व्यक्त करतो. पुरा महाराष्ट्र निर्माण झाला नसून त्यात थोडा दुःखाचा भाग आहे आणि मुंबई महाराष्ट्रात न घातल्यामुळे हे दुःख निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात मुंबई सामील न केल्यामुळे प्रत्येक मराठी भाषिकाला दुःख झाले आहे. मराठी भाषिक जनतेचे प्रतिनिधी किंवा त्यांच्यातील एक म्हणून मीही दुःखी झालो आहे.

मुंबई महाराष्ट्राची आहे की नाही याविषयी बोलताना कोणती परिभाषा वापरावी याबद्दल मी थोडासा संकोचलो आहे. शब्दांनी भावना पूर्णतया व्यक्त होतातच असे नाही आणि कधी कधी शब्दांनी गैरसमज व गोंधळ वाढण्याचा प्रकार घडतो असा माझा अनुभव आहे. म्हणून शब्दांचा वापर करताना मी काळजी घेत आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे की नाही हा शब्दप्रयोग माझ्या कल्पनेप्रमाणे  चुकीचा आहे. महाराष्ट्र कोणाचा, गुजराथ कोणाचा किंवा कर्नाटक कोणाचा असल्या प्रश्नाचे उत्तर आम्ही सगळे हिंदुस्थानचे आहोत हे आहे. तेव्हा मुंबईबाबत प्रश्न कोणता आहे तर मुंबई कुठे आहे? गुजराथ, कर्नाटक किंवा महाराष्ट्र हिंदुस्थानात आहेत, त्याप्रमाणे मुंबई महाराष्ट्रात आहे. मुंबई कोठे आहे याचे उत्तर भूगोलाने द्यावे लागेल आणि निसर्गाने ते आधीच देऊन ठेवले आहे. मुंबई कोणाची याचे उत्तर भूगोलाच्या परिभाषेतच मिळाले पाहिजे आणि मुंबई भौगोलिक दृष्टया महाराष्ट्रात आहे हे आजपर्यंत या विषयावर बोलताना कोणीही नाकारलेले नाही. एवढेच नव्हे तर पंडित जवाहरलाल नेहरूनींही ही गोष्ट मान्य केलेली आहे. इंग्रजी भाषेतील एका सुभाषितात बदल करून मी असे म्हणेन की

“History may Conceal Certain things but Geography Cannot”

इतिहास काही गोष्टी दडवून ठेवत असेल, पण भूगोल काही दडवू शकत नाही. या दृष्टीने मुंबई महाराष्ट्रात आहे यासंबंधी कोणाचेच दुमत नाही, आणि ही गोष्ट  महत्त्वाची आहे.

मुंबईच्या प्रश्नाचा विचार करताना औत्सुक्याने इतिहासाकडे पाहिले तर मुंबईच्या इतिहासाचे दोन कालखंड पडलेले आढळून येतात. मुंबईत ब्रिटिशांची राजवट येण्यापूर्वीच मुंबईचा इतिहास आणि ब्रिटिश राजवट आल्यानंतरचा मुंबईचा इतिहास असे दोन मुंबईच्या इतिहासाचे भाग पडतात. आज वारंवार ज्या इतिहासाचा उल्लेख केला जातो तो इतिहास हा ब्रिटिश राजवट सुरू झाल्यानंतरचा आहे. मुंबईमध्ये ब्रिटिशांची राजवट येण्यापूर्वी मुंबई हे महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावरील एक मागासलेले बेट होते आणि त्याप्रमाणे हिंदुस्थानच्या इतर समुद्रकिनार्‍यावरील बंदरांची थोडीफार हीच स्थिती होती. पोर्तुगालच्या राजाने इंग्लंडच्या राजाला मुलीच्या लग्नाच्या वेळी मुंबई बेट आंदण देऊन टाकले. मुंबई बेट आंदण देऊन टाकताना त्या बेटाची अवस्था अत्यंत मागासलेली होती.