• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९९५-९६-७६

प्रबळ विरोधी पक्षही असायला पाहिजे, ही प्रक्रिया आपल्या देशात स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १९६७ पर्यंत सुरु होऊ शकली नाही. स्थैर्य हे काँग्रेस पक्षाचं सामर्थ्य होते. त्यामुळे लोकशाहीची ती एक जमेची बाजू होती. परंतु त्याचवेळी स्थैर्य हे पुरेसे नाही हे लक्षात न आल्यामुळे प्रबल विरोधी पक्ष उभा राहू शकला नाही. जनता म्हणाली, " तुमचे काही मतभेद असतील तर काही वर्ष आम्ही काँग्रेस पक्षालाच पाठिंबा देऊ." आणि हेच १९५२, १९५७ आणि १९६२ च्या निवडणुकीत प्रकर्षाने प्रगट झालं. काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळालं. त्यावेळी मला आठवतं की, स्वातंत्र्यपूर्व काळात जसा पंडित नेहरू दौरा काढत. तसा स्वतंत्र भारतातही त्यांनी काढला. पंडित नेहरूंच्या बद्दल लोकांना प्रेम वाटे. त्यामुळे लोकांना वाटे, पं. नेहरू सांगतील त्याच मार्गानं आपण गेलं पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळात १९३६ ची फैजपूर काँग्रेस झाली आणि १९३७ च्या इलेक्शनमध्ये पंडित नेहरूंनी झंझावती असा दौरा काढला होता. त्यावेळी त्यांची भाषणे मी ऐकलेली आहेत. पुण्याच्या सभेतलं भाषण मी ऐकलेलं आहे. त्यात त्यांनी सांगितले, "मी काँग्रेसला मत द्या म्हणून मी तुम्हाला सांगत आहे याचं कारण काँग्रेसला मत म्हणजे स्वातंत्र्य लढ्याला मत असं तु्म्ही लक्षात ठेवलं पाहिजे." स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसला मत म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सेनानीना, त्यांच्या विचारसरणीला मत असे लोकांना वाटत असल्याचे दिसून आले. हे झाल्यामुळे जे विचारमंथन झाले त्यात दोन वैचारिक प्रभाव निर्माण झाले. त्याचे स्वरुप नीट समजून घेतले पाहिजे. १९५३ मध्ये समाजवादी पक्षात अशोक मेहता यांनी एका सिद्धांत मांडला की, जे अविकसित देश आहेत त्या देशात एक अधिकारारुढ पक्ष आणि त्याला सर्व बाबतीत विरोध करणारा विरोदी पक्ष हा आकृतीबंध योग्य नव्हे. यात दोन्ही पक्षांनी ज्या विषयावर आपली एकमत होतील अशी क्षेत्रं शोधून त्यांच्यासाठी एकत्र काम केलं पाहिजे. उदा. हिंदुस्थानची लोकसंख्या ही भरमसाठ वाढलेली आहे, या लोकसंख्येचं जर आपणाला नियंत्रण करायचं असेल तर हा केवळ अधिकारारुढ पक्षाचा कार्यक्रम असून चालणार नाही. सर्व देश त्याच्यामध्ये सहभागी झाला पाहिजे. अशोक मेहता यांनी ही भूमिका मांडताना अधिकारारुढ पक्ष व विरोधी पक्ष यांनी काही बाबतीत एकमेकांशी सहकार्य करणे हे मागास अर्थव्यवस्थेत आवश्यक आहे आणि अपरिहार्यही आहे असे सांगितले. आणि एकमत होणारी कुटुंब नियोजन, कृषी उत्पादन, सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण अशासारखी क्षेत्रे निश्चित करावीत असेही आवाहन केले. अशोक मेहता यांच्या भूमिकेस समाजवादी पक्षातही प्रखर विरोध झाला. त्यांचे टीकाकार आणि विरोधक असे म्हणाले की, एकदा आपण काँग्रेस बरोबर सहकार्याची भूमिका घेतली की लोकांत आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची जरूरच वाटेनाशी होईल आणि कालांतराने या भूमिकेवरुन काम करणा-यांना काँग्रेसमध्येच विलीन व्हावे लागेल. डॉ. राममनोहर लोहिया यांनी असा विचार मांडला की विरोधाची धार प्रखर करणे हेच विरोधी पक्षाचे कार्य आहे आणि ते समाजवादी पक्षाने सतत केले पाहिजे. ही भूमिका मांडताना डॉ. लोहिया म्हणाले, " समाजवादी पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकावयाचे असेल तर आर्थिक प्रश्नाबाबत काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षापेक्षा आपली भूमिका मूलत: वेगळी असली पाहिजे." डॉ. लोहिया यांनी अशी स्वतंत्र भूमिका पंचमढी येथील समाजवादी पक्षाच्या अधिवेशनात पुढील शब्दात मांडली. " भांडवलशाही व कम्युनिझम हे दोन ध्रुव वाटत असेल तरी दोनही समाजरचनांमध्ये अर्थसत्तेचे केन्द्रीकरण केले असून प्रचंड यंत्रांच्या सहाय्याने औद्योगिकरण केलेले आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशाला ते उत्पादन तंत्र परवडणार नाही. आपण आपल्या परिस्थितीत अनुरुप असे तंत्रविज्ञान ( अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी ) वापरले पाहिजे. आपल्याला भारतात छोटी यंत्रे वापरुन अधिक हातांना काम दिले पाहिजे. प्रचंड मोठे कारखाने, प्रचंड धरणे हा पं. नेहरुचा हव्यास मला चुकीचा वाटतो. म. गांधींचा विकेंद्रीकरणाचा विचार, त्याला परिस्थितीप्रमाणे योग्य ती मुरड घातल्यास, आपल्याला मार्गदर्शक ठरू शकेल. लोकांच्या श्रमातूनच आपल्याला नवा भारत निर्माण करावा लागेल." डॉ. लोहिया याच भाषणांत म्हणाले, "स्वातंत्र्यपूर्व काळात आणि नंतरही आपण आर्थिक समतेवर भर दिला. परंतु भारतात सामाजिक विषमतेचा प्रश्न आर्थिक विषमतेपेक्षाही अधिक बिकट आहे. सामाजिक समता व आर्थिक समता या दोनही उद्दिष्टांसाठी आपल्याला दीर्घकाळ लढा द्यावा लागेल आणि ही उद्दिष्टे साध्य होतील तेव्हाच आपले लोकशाही समाजवादाचे स्वप्न साकार होईल."

भारतीय लोकशाहीच्या वाटचालीत डॉ. लोहिया यांनी मांडलेले हे विचार फार मौलिक होते. या विचारांच्या आधारे वाटचाल करणारा विरोधी पक्ष संघटित करणे हे डॉ. लोहिया यांचे ध्येय होते, परंतु त्यांच्या अकाली निधनाने हे कार्य अपुरेच राहिले.

भारतीय लोकशाहीने १९४७ ते १९६७ अशी वाटचाल करताना कोणत्या वैचारिक भूमिका मांडल्या गेल्या याचा मी येथवर आढावा घेतला. १९६७ नंतर भारतीय लोकशाहीच्या वाटचालीत जे चढउतार झाले त्याचे विवेचन करुन आपली भविष्यकालीन वाटचाल कोणत्या दिशेने व्हावी या संबंधीचे विचार मी उद्याच्या भाषणात मांडेन. आपण शांतपणे माझे भाषण ऐकले याबद्दल मी आपला आभारी आहे.

- ग. प्र. प्रधान,  १३ मार्च १९९६