महानुभावपंथी चक्रधर स्वामींनी महाराष्ट्राची काही स्वभाव वैशिष्ट्ये सांगितली आहेत.
“महंतराष्ट्र म्हणोनि महाराष्ट्र, राष्ट्र भणिजे देशः, परि सुखरुप आणि इष्टकारक....”
“आपण अनाचारु न करी, आणि कासि करु नेदि इति ते महाराष्ट्र, धर्मसिद्धी जाय ते महाराष्ट्र....”
उपभोगापेक्षा त्यागाकडे, व्यक्ती उत्कर्षापेक्षा सामाजिक संस्थात्मक उत्कर्षाकडे ओढ, स्वातंत्र्य, समता, न्याय याकडे अधिक ओढ, महाराष्ट्र हा स्वराज्यप्रेमी देश आहे. छत्रपती शिवरायांचे राज्य ते एका राजाचे राज्य नाही, तर ते “हिंदवी स्वराज्य” आहे, त्यातला सैनिक हा ‘स्वराज्या’ चा शिलेदार म्हणून अभिमानाने लढतो. लोकमान्य टिळक “स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क” असे म्हणत नाहीत, तर “स्वराज्य” माझा जन्मसिद्ध हक्क आहे” अशी गर्जना करतात. स्वातंत्र्य कशासाठी? तर हिंद स्वराज्यासाठी अशी म. गांधी मीमांसा करतात. “ग्रामस्वराज्यासाठी” चे स्वातंत्र्य हा विचार, प्रतिसरकार चालवतानाही आम्हाला अधिक भावतो. आणि स्वराज्यासाठी मरायला किंवा मारायला आम्ही सिद्ध होतो.
इतिहास प्रेरणा देतो. नवा इतिहास घडवण्याची प्रेरणा आणि आत्मविश्वास जागवतो. मराठी माणसाला महाराष्ट्राचा हा प्राचीन, अतिप्राचीन इतिहास नीटपणे सांगितला पाहिजे. आम्ही केवळ वारकरी नाही, केवळ धारकरी नाही, केवळ शेतकरी नाही किंवा केवळ कामकरी नाही. आम्ही शककर्त्या राज्यकर्त्याचे वारस आहोत. जगभर समुद्र पर्यटन करणारे दर्यावर्दी खलाशी आहोत. जगाशी व्यापारी करणारे व्यापारी आहोत. रोमच्या सम्राटाला आणि पोपला भुरळ पाडणा-या कलाकुसरीच्या वस्तू तयार करणारे कारागीर आहोत. अजोड शिल्पी, चित्रकार, रसायनशास्त्रज्ञ, धातूशास्त्रज्ञ, खोगलशास्त्रज्ञ, गणिततज्ञ, आयुर्वेदाचार्य, भाषाप्रभू, साहित्यिक, कलाकार, संगीतकार, नाटककार आहोत, जीवनाचे कुठे क्षेत्र आम्हाला अज्ञात नाही. हे भान, हा विश्वास, हे चैतन्य आम्ही आमच्या इतिहासांतून जागवू शकलो पाहिजे. खरा सलग प्राचीन इतिहास, सद्हेतूने आणि उचित स्वरुपात नव्या पिढ्यांच्यापुढे परिणामकारक रीतीने सतत मांडला पाहिजे.
आमचा शाळा कॉलेजमधल्या पाठ्यपुस्तकांतला इतिहास देवगिरीच्या यादव सम्राटापासून सुरू होतो. यादव सम्राटांनी आजचा महाराष्ट्र साकारला. “ज्ञानेश्वरी” सारखे लेणे मराठी भाषेत खोदले. “अमृतातेहि पैजा जिंके” अशा श्रेष्ठ पदावर प्राकृत मराठी भाषेला बसविले. राजदरबाराची भाषा म्हणून मराठीला राजसिंहासनावर बसविले. त्या मराठी भाषेच्या आधारावरच आजचा महाराष्ट्र उभा आहे.
अल्लाउद्दीन खिलजी, मलिक अंबर, बहामनी सुलतानशाह्या आणि मोंगल यांनी आमच्यावर राज्ये केली. त्या काळांत आम्ही पंढरपूरच्या वा-या सुरू केल्या. मराठी भाषेला इहलोकीचे विषय वर्ज करून, देव, धर्म, परलोक, नशीव, दैव या विषयाना बांधून टाकले. ब्रह्मानंदी टाळी लावून या क्षणभंगूर जगण्याच्या कटकटीतून मुक्ती देणारा, आणि मेल्यावर सर्व सुखे मिळतात म्हणणारा, ब्राह्मणधर्म बुडू नये म्हणून सर्व जातीतून आम्ही संत उभे केले. जातीपाती भेदाभेदांची जन्माधिष्ठीत समाजव्यवस्था प्रमाण मानून, मायावादी भ्रमांत निचेष्ठा होऊन पडलो. इहवादातील विद्या, सत्ता, संपत्तीला पूर्णपणे पारखे होऊन अवघा बहुजन समाज स्त्रीशूद्राचे जिणे जगण्यास तयार केला.
भ्रमचित रोग्याला एकाएकी शुद्ध याची, तसा थोडा पन्नास पाऊणसे वर्षाचा काळ, सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात आला. “हिंदवी स्वराज्या” च्या विजा मराठी मनांच्या आभाळात चमकल्या. राजे शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सेनापती संताजी घोरपडो, आणि महाराणी ताराबाई यांच्या कारकीर्दीची पन्नास पाऊणशे वर्षे हा मराठी अस्मितेचा अलिकडील इतिहासातील सर्वात तेजस्वी कालकंड आहे. तीन बादशाह्या पालथ्या घालून, शेवटी आलमगीर औरंगजेबाची कबर, मराठी मातीत बांधण्याचा महापराक्रम, याच काळात घडला. त्यानंतर मात्र पुन्हा भ्रमचित्त कोमात मराठी मन नेले गेले. पेशवाईने हिंदवी स्वराज्याचे निशाण टाकून दिले. ब्राह्मणी राज्यांचे सोवळे फडकावले. जन्मजात चातुर्वर्ण्याचेच नव्हे तर कुटील विष्णुगुप्त चाणक्याने वळलेले, द्विवर्णाचे दावे, मराठी मनाला करकचून बांधले. छत्रपतींनाही शूद्र म्हणून राज्याभिषेक नाकारण्यापर्यंत या ब्रह्मवृंदाने मजल मारली. तिसरा पेशवा नानासो याने मातागमनी राजकारण करून, सातारच्या छत्रपतींनाच कैद केले. रायगड किल्ला उध्वस्त केला. शिवछत्रपतींनी दूरदृष्टीने उभारलेले आणि कान्होजी आंग्रे यांनी नावारूपाला आणलेले मराठी आरमार बुडविले. आणि तेहि इंग्रज आरमाराची मदत घेऊन. आणि शेवटी पानिपतावर मराठी अस्मितेची धुळवड खेळून, महाराष्ट्र भूमीत अश्वत्थाम्याच्या डोकीतले सूडांचे चिरंजीव किडे, पेरून ठेवले. त्या किड्यांनी आजतागायत मराठी मन पोखरण्याचे काम चालूच ठेवले आहे. प्रधानाने राणीसह राजाचे राज्य बळकावले असा वग तमाशांत असतो, तसाच तमाशा पेशवाईने हिंदवी स्वराज्याचा केला. सेवकाचे स्वामी झाले आणि ब्राह्मणी राज्यासाठी महाराष्ट्राची एकात्मता, महाराष्ट्राची अस्मिता देशोधडीस लावली.