लंडनमधून जगाकडे आणि आपल्या देशाकडे पाहताना तुम्हाला काय वाटले? असा एक प्रश्न चव्हाणसाहेबांनी विचारला आणि मी प्रामाणिकपणे म्हटले, साहेब तेथे गेल्यानंतर एक वेगळाच चित्रपट दिसतो. जमिनीवरून डोंगराकडे पहाता व डोंगरावरून खाली जमिनीकडे पहाताना जसा संपूर्ण चित्रपट दिसतो तसे काहीसे लंडनमधून जगाच्या राजकीय चित्रपटाकडे पहाताना भावते. जगाच्या पाठीवर दोन मोठे हत्ती झुंज घेताहेत. कम्युनिझम आणि कॅपिटॅलिझम. जगावर कब्जा करण्यासाठी त्यांची निकराची झुंज चालली आहे. बाकीचे जग घाबरून ती झूंज पहाताहेत. आणि आमचा “डेमॉक्रॅटिक सोशॅलिझम” कोकरासारखा कुठेतरी कोप-यात निरागस उड्या मारीत आहे असे वाटते. हत्तीच्या पेक्षा शेळीचा उपयोग गरीबांना जास्ती आहे. पण या झुंजीत तुडवून न जाता टिकून रहायचे असेल तर ज्यांचा ज्यांचा लोकशाही समाजवादावर विश्वास आहे त्या सर्वांनी एकत्र येवूच लोकशाही समाजवादी व्यवस्था उभी करून दाखवली पाहिजे. आपले वेगवेगळे गट, पार्ट्या आणि तपशीलाचे किरकोळ मतभेद बाजूला ठेवून लोकशाही समाजवाद प्रस्थापित करण्याची ही अखेरची संधी आहे. समजून उमजून निकराचे प्रयत्न केले पाहिजेत. नाहीत या दोन रेड्यांच्या झुंजीत लोकशाही समाजवाला उभे रहायला कुठे जागाच राहणार नाही. एक “लास्ट चान्स टू ट्राय” म्हणूनच सर्व लोकशाही समाजवाद्यांनी, जयप्रकाशजी, पं. जवाहरलाल नेहरु आणि इतर सर्व समाजवाद्यांनी एकत्र येवून हिंदुस्थानचे राजकारण केले पाहिजे. जगाला एक तिसरा, मधला मार्ग काढून दिला पाहिजे. हिंदुस्थान जगाला तिसरा मार्ग काढून देऊ शकेल, पण हे एकदोन पिढ्या तरी सर्वात एकोपा आणि प्रयत्नांची शिकस्त कशी साधता येईल? याची निकड फार फार वाटते.
माझे हे मनापासूनचे विचार चव्हाणसाहेब फार कौतुकाने ऐकत होते. त्यांच्या चेह-यावरून आमि नजरेतून मला ते शेवटी जाणवले. त्यामुळे मला आणकी उत्तेजन मिळाले.
“साहेब, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुमच्याजवळ मला मन मोकळं करावसं वाटतं. म्हणून विचारतो. माझा हा आगाऊपणा किंवा लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं वाटेल. तुम्हाला, खरंच ही काँग्रस, समाजवादी आहे असं वाटतं का?
चव्हाणसाहेब मागे खुर्चीला रेलून बसले, मी असा प्रश्न विचारून अयोग्य तर केलं नाही ना? असं मनांत येऊन गेले. गंभीर पण शांतपणे चव्हाणसाहेब म्हणाले, “समाजवादांत समाजाचे हितसंबंध आहेत. सामान्य माणसाचे हितसंबंध तर समाजवादातच आहेत. काँग्रेसला सामान्य माणसाचेच राजकारण करायचे आहे, केले पाहिजे. ज्या दिवशी काँग्रेस समाजवाद सोडेल त्यादिवशी समाज काँग्रेसला सोडून देईल.”
चव्हाणसाहेबांच्या या उत्तराने माझे मन उजळून गेले. १९६० च्या डिसेंबर महिन्यातले चव्हणसाहेबांचे हे उद्गार आहेत. दुर्दैवाने आजकाँग्रेसने समाजवाद सोडला आहे आणि समाजाच्या मनांतून काँग्रेस पूर्णतः उतरली आहे. चव्हाणसाहेबांचे राजकारण तत्वांचे होते. लोकशाही, समाजवाद आणि राष्ट्रीय एकता ही त्यांच्या राजकारणाची त्रिसूत्री होती. त्यांचा समाजवादावर पूर्ण विश्वास होता. समाजवादाचा पाळणा महाराष्ट्रात तरी प्रथम हलवू. त्यांनी केलेली ती प्रतिज्ञा होती.
दुर्दैवाने १९६९ नंतर काँग्रेसमध्ये समाजवादाची भाषा राहिली पण पक्षांतर्गत लोकशाहीला घरघर लागली आणि आणिबाणीमुळे तर देशातल्याच लोकशाहीच्या नरडीला नख देण्याचा प्रयत्न झाला. समाजवादाची “गरीबी हटाव” ची भाषा ही सुद्धा सत्ताबाजीचे व्यक्तीनिष्ठ राजकारण साधण्यासाठी, समाजाला व गरीबांना बनवण्यासाठी वापरलेली भाषा ठरली राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये समाजवाद व धर्मनिरपेक्षता ह दोन शब्द घातले, बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, परराष्ट्रीय व्यापार सरकारने ताब्यांत घेतला. तरीही संमिश्र अर्थव्यवस्थेचा प्रत्यक्ष व्यवहार खाजगी क्षेत्रात जोपासण्यासाठीच झाला. विचार आणि व्यवहार यांतील विसंगती वाढली. सहकारी कृषी औद्योगिक समाजरचना हे ध्येय डोळ्यापुढे नव्हते. शहरी संघटित औद्योगिक समाज याचीच नक्कल करण्याची घाई सर्वांना झाली होती. संमिश्र अर्थव्यवस्थेची मांडणी आणि कार्यपद्धतीच अशी होती की, त्यातून नोकरशाही वाढली. नोकरशाहीचे पांढरे हत्ती सार्वजनिक क्षेत्रात जोपासले गेले. नवी संस्थानेच जणू वाढली, पण ती मांडलीक होती खाजगी क्षेत्राची. गेल्या ३०-३५ वर्षातील संमिश्र अर्थव्यवस्थेचे प्रत्यक्ष व्यवहार पाहिले तर खाजगी क्षेत्राची तळी उचलून सार्वजनिक क्षेत्राचे दिवाळे निघावे असेच झालेले दिसतील, सार्वजनिक क्षेत्र तोट्यांत आणि खाजगी क्षेत्राची भांडवली गुंतवणूक मग शंभर शंभर पटीने वाढली.