• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९९५-९६-१८

“महाराष्ट्राची जडण-घडण आणि यशवंतराव”

सन्माननीय अध्यक्ष आणि बंधुभगिनींनो,

“महाराष्ट्राची जडण-घडण आणि यशवंतराव” या विषयावरील माझ्या दुस-या व्याख्यानास आपण आज अधिक संख्येने उपस्थित आहात याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. खरं म्हणजे आजकाल व्याख्यानमालांना चांगले दिवस राहिलेले नाहीत. लोकजागृतीसाठी विचार प्रसार आणि विचारप्रसारासाठी व्याख्यानमाला, हा उपक्रम स्वातंत्र्यानंतर हळू-हळू रोडावत चालला आहे. वक्ते, श्रोते आणि उपस्थिती सा-यांचा मिळून तो परिणाम असला पाहिजे. मुख्य कारण मला दिसते ते विचार आणि व्यवहार यांतील वाढलेले अंतर हे असावे. विचाराने जगणे हे अवघड झाले आहे. त्यापेक्षा अविचारानें किंवा विचार न करता जगणे हेच सोयीस्कर म्हणून अंगवळणी पडले आहे. सार्वजनिक क्षेत्रांत जातीपाती, गट, पक्ष यांच्या बाजारांत, विचारवंताची उपेक्षा सुरू झाली. ती उपेक्षा समजून घेता येते. पण आजकाल विचारांचीच उपेक्षा होत असल्याने चिंताजनक परिस्थिती वाटते आहे.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत अशी विचारांची उपेक्षा कै. यशवंतराव चव्हाण यांना अपेक्षित नव्हती. महाराष्ट्राच्या प्रगतीची आधारशीला मराठी माणसांच्या मनोमन एकात्मतेत आहे हा यशवंतरावजींचा विचार, मी कालच्या भाषणांत मांडण्याचा प्रयत्न केला. या एकात्मतेला बळकटी देणा-या ऐतिहासिक घटना नव्या पिढीपुढे नीटपणे ठेण्याची जशी गरज आहे तशी इतिहासांतून चालत आलेले अन्याय, अत्याचार, संशय, मानापमान, फसवणूक, विश्वासघात, भाऊबंदकी, फंदाफितरी यांचा निचरा करण्याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यकत आहे. महाराष्ट्रात मुख्यतः तीन जाती या विशेष आक्रमक व महत्वाच्या ठरल्या आहेत ब्राह्मण, मराठा आणि महार या तीन जाती जेव्हा एकोप्याने परस्पर विश्वासाने महाराष्ट्र चालवतात, त्या त्यावेळी महाराष्ट्राने काही उज्वल इतिहास घडविला आहे. मुळांत हिंदुधर्मातील जातीवर्ण व्यवस्थेनेच हा सारा देश दुबळा करून ठेवला आहे. सर्व जाती-जमाती, सर्व धर्म, स्त्री पुरुष यांच्यात अद्वैताची, विविधतेतील ऐक्याची भावना परिदृढ करणे महाराष्ट्र वा राष्ट्र समर्थ करण्यासाठी मूलभूत आवश्क असणारी गोष्ट आहे. द्विभाषिक मुंबई राज्यातून महाराष्ट्र निर्माण करतांना एकभाषा बोलणारे लोक एकात्म भावना जोपासून सर्वाच्या सर्वांगीण विकासाठी एक दिलाने झटतील अशीच भूमिका होती. चव्हाण साहेबांनी ती फार डोळससपणे उचलून धरली होती. आणि मराठी भाषिकांतील ती भावनिक एकात्मता निश्चित करण्यासाठी भरभक्कम पावलेही उचलली होती.

एकात्मभाव हाच राष्ट्रीयत्व या कल्पनेचाही आधार आहे. समाजधारणेसाठी हा बंधुभाव, एकात्मभाव आवश्यकच आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् एकदा म्हणाले होते-

“राष्ट्रीय एकात्मता ही एखाद्या इमारतीप्रमाणे चुना-विटांची घडविण्याची बाब नव्हे, राष्ट्रीय एकात्मता ही भावना लोकमानसांत हळूहळू व जपून रुजविली पाहिजे. त्यासाठी शिक्षण हे समर्थ परिणामकारक ठरेल.... भारतीय राज्यघटनेतील ध्येये व मूल्य ध्यानात घेऊन योग्य त-हेने ती आचरणांत आणण्याच्या कामी मदत करणे ही शिक्षणावरील जबाबदारी आहे.....”

महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मराठी माणसांची मनःस्थिती आणि परिस्थिती बदलण्यासाठी यशवंतराव चव्हाणांनी हाती घेतलेल्या तीन महत्वाच्या चळवळी नवमहाराष्ट्र उबारणीस पायाभूत अशा ठरल्या आहेत. शिक्षणप्रसाराची चळवळ, सहकारी कृषी औद्योगिक समाजरचनेची चळवळ आणि स्थानिक स्वराज्याकडे नेणारी पंचायत राज्याची चळवल. लोकशाही समाजवादाच्या पुस्तकी घोषणा, भाषणे करणारांना लोकशाही, समाजवाद आणि सामाजिक एकात्मता साधणारा व्यवहारी कार्यक्रम देता येत नाही. स्वातंत्र्यानंतर भूदान चळवळ ही एक आमूलाग्र क्रांतीची मूलभूत चळवळ होती. वीतभर जमिनीसाठी भाऊ भावाचा मुडदा पाडायला तयार होतो अशा घट्ट मालकी हक्काच्या वातावरणांत हजारो, लाखो एकर जमिनीवरची मालकी लोकांनी सोडली. संपूर्ण गावे ग्रामदानी झाली. लोकांनी त्या क्रांतीला तयारी दाखविली. पण भूदानानंतर पुढे काय? याचा कार्यक्रम देता आला नाही. नवसमाज निर्मितीचा पूर्ण आराखडा आणि त्यासाठी क्रमाक्रमाने व्यवहारी पावले टाकीत इच्छित क्रांतीकडे नेणारा कार्यक्रम देता आला नाही. भूदानाची क्रांती विझून गेली. हीच गोष्ट जाणून कै. यशवंतरावांनी राजकीय आर्थिक, सामाजिक ध्येयवादाला व्यवहारी कार्यक्रमाची जोड दिली. उच्च ध्येयवादांतून लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडवणारे उपाय शोधून काढले. प्रतिभावंत नेतृत्वाचा आदर्श कसा असतो त्याचे उदाहरणच त्यांनी देशापुढे ठेवले.