भौतिकतेच्या पसा-यात अडकलेला माणूस आपलं माणूसपण हरवतो असं जेव्हा मी म्हणतो, जे एरिक फ्रॉमनं ‘सेन सोसायटी’ मध्ये फार चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्याचा मी पुनरुच्चार करतो. ताळ्यावर असलेला समाज म्हणजे काय तर अर्थपूर्ण जगणा-या माणसांचा समाज. ताळ्यावर नसलेला समाज म्हणजे काय तर केवळ भौतिक भराभराटीच्या मृगजळामागे धावणा-या माणसांचा समाज. हा दुस-या प्रकारचा समाज सुखी होऊ शकत नाही, हा समाज आनंदसुद्धा घेऊ शकत नाही. नैसर्गिक सौंदर्याचा आस्वादसुद्धा घ्यायचा कसं विसरतो आम्ही हे एरिक फ्रॉमच्या पुस्तकात छान सांगितलेलं आहे. नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद आम्ही घेत नाही. आम्ही काय करतो? आम्ही पिकनिकला जेव्हा जातो तेव्हा कॅमेरा घेऊन जातो, आणि मग कुठलंही चांगलं दृश्य दिसलं की आम्हाला ते कॅमे-यात पकडायचं असतं. नैसर्गिक डोळ्यांनी बघून त्याचा उपभोग घेण्याचं माणूसपण आम्ही हरवलेलं असतं. आम्हाला फक्त संग्रही अल्बममध्ये लावण्यासाठी निर्जीव छायाचित्र हवं असतं. त्यामुळे एखाद्या सौंदर्याचा साक्षात्कार झाल्यावर डोळे दिपून जाणं किंवा असी समाधी लागणं किंवा आपण देहभान विसरून जाणं यातला जो आनंद असतो, त्या उत्कट आनंदाचा क्षण आमच्या आयुष्यात येईनासाच झालाय, आम्हाला फक्त संग्रही काहीतरी हवं असतं. आम्ही दक्षिण भारतं पाहून आलो, आम्ही उत्तर भारत पाहून आलो, आम्ही परदेशी जाऊन आलो, आम्ही काश्मिरी ड्रेस घालून घोड्यावर बसून जोडीनं फोटो काढले एवढंच. हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी. निसर्ग सौंदर्याचा अनिर्वचनीय आनंद आपण घेतल्याचं मात्र सहसा कोणी व्यक्त करीत नाही. माणूस फक्त हे सांगू शकतो. छायाचित्रं तर कॅमे-यानं आपोआप काढता येतात, विकतही मिळतात, कुठे जाण्याची गरजच नाही. आज तंत्रज्ञानाची प्रगती इतकी झालेली आहे की रिमोटकंट्रोलने आपण इथं बसून सर्व देशातील काय अवकाशातले फोटोसुद्धा काढून आणू शकतो. चंद्रावरचे फोटोसुद्धा काढून आणलेत. म्हणजे डोळ्यांच्या ऐवजी कॅमेरा हेच जर जग पाहण्याचं साधन असेल तर त्यात ‘मानवी’ आनंदाचा भाग कितीसा येणार?
माणसाच्या गरजा असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा माणसाच्या या शब्दावर माझा भर असतो, गरजा या शब्दापेक्षासुद्धा माणसाच्या काही गरजा असतात, ‘ह्युमन वॉण्टस्’ असा शब्द एरिक फ्रॉमने वापरला आहे. कोणत्या गरजा असतात माणसाच्या? निर्मितीचा आनंद मिळण्याच्या, इतर माणसांशी संवाद करण्याच्या. त्यांची परिपूर्तता न होणं हे उपासमारीपेक्षासुद्धा भीषण संकट असतं. ह्या मानवी गरजा उपभोगातून किंवा चंगळवादातून पूर्ण होत नाहीत. या मानवी गरजा मानवी समजाच्या निर्मितीतूनच पूर्ण होतात. मानवी समाज हा अमर्याद उपभोगापेक्षा संयमावर आधारलेला असतो. मी येथे विरक्तीचं तत्वज्ञान सांगत नाहीं, मी दारिद्र्याचं गौरवीकरण करत नाही. कुणीतरी सांगितलं की गांधीजी हे दारिद्र्याचं गौरवीकरण करत होते. खोटं आहे. गांधीजी ज्या दारिद्र्याचं गौरवीकरण करीत होते ते दारिद्र्य परिस्थितीने लादलेलं, अगतिक करणारं दारिद्र्य नव्हतं तर स्वेच्छेने स्वीकारलेलं, माणसाला उन्नत करणारं दारिद्र्य होतं. मला दहा सूट शिवता येतात, पण एकही सूट न शिवता साधे कपडे घालायचं मी ठरवतो असं हे दारिद्र्य असतं. ओंगळ श्रीमंतीपेक्षा साधेपणाचं आयुष्य हे जास्त सुखद असू शकतं. कारण ते अर्थपूर्ण अस्तित्व शक्य करतं.