• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९९०-४ (6)

राजकारणात जसे सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब पडते तसे समाज जीवनातही हळूहळू मौलिक बदल घडवून आणण्याचे काम राजकारण करीत असते. आणि म्हणून राजकारण आणि समाज या दोन्हीही एकमेकांना घडवीत असतात. एकमेकांना बदलीत असतात. एकमेकांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणीत असतात. असा त्यांचा उभयान्वयी संबंध आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. राजकारणाचे हे स्वरूप लक्षात घेतल्यानंतर मी पुढची पायरी म्हणून विकसित देशांच्या राजकारणाच्या समस्या किंवा प्रश्न कोणते असतात ते सांगतो. याचे कारण भारत हा एक विकसनशील देश आहे. हे आपल्याला सर्वांना मान्य होईल. विकसनशील देशातल्या राजकीय विकासाचे पाच प्रमुख प्रश्न असतात आणि राजकारणाचा अभ्यास या पाच प्रमुख प्रश्नांची उत्तरे त्या देशाचे किंवा समाजाचे राजकारण कशी देतो, कोणत्या प्रक्रियेतून ही उत्तरे शोधली जातात, त्याच्यावरून राजकारणाचे स्वरूप ठरते. कोणते पाच प्रश्न? पहिला प्रश्न राष्ट्रैक्य भावना निर्माण किंवा “नेशन बिल्डिंग”. विकसनशील देश काल परवापर्यंत कुठल्या तरी पाश्चात्य साम्राज्यवादी देशाच्या वसाहती म्हणून वावरत होते. गेल्या ४० वर्षामध्ये ते स्वतंत्र झाले. पण हे जरी राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाले असले आणि एक राष्ट्र म्हणून त्यांनी जरी स्वतःला जाहीर केले असले तरी अजून राष्ट्रीयत्वाची भावना काही ठिकाणी निर्माणच झालेली नाही. काही ठिकाणी झाली असली तरी आज दुर्बळ आहे आणि ती मजबूत करण्याचे प्रयत्न चालू आहेत. नेहमी असे म्हटले जाते की, “इंडिया इज अॅन ओल्ड सोसायटी बट ए न्यू नेशन.” भारत हा एक पुरातन समाज आहे पण अगदीच नवोदीत राष्ट्र आहे आणि त्यामुळे राष्ट्रीय भावना जेवढी मजबूत असायला हवी तेवढी ती नाही. परचक्र आले म्हणजे ती सबल होते पण त्या आक्रमणाचा धोका नाहीसा झाल्याबरोबर ती भावना पुन्हा दुबळी होते आणि आपापसातले मतभेदाचे मुद्दे वर येतात. आता या भावनेला जर परराष्ट्राच्या आक्रमणाच्या धोक्यामुळेच बळकटी येणार असली तर मला वाटते आपल्याला चीन व पाकिस्तानबरोबर करारच करायला पाहिजे की तुम्ही दर दोन-चार वर्षांनी जरा आम्हाला धोका निर्माण करा ना म्हणजे मग आमच्यामधल्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेवरची साठलेली राख जरा फुंकर घालून दूर केली जाईल आणि राष्ट्रवादाचे निखारे पुन्हा प्रज्वलित होतील. पण असे काही नेहमीच होईल असे नाही. राष्ट्रीय ऐक्य भावनेची निर्मिती हा एक अतिशय जटील प्रश्न आहे आणि पाच पंचवीस वर्षांमध्ये चुटकीसरशी त्याची उत्तरे मिळतील असे प्रत्येक समाजात घडते असे नाही. शांततेने याची उत्तरे मिळतील असे प्रत्येक समाजात घडते असे नाही. प्रसंगी यादवी युद्धाला सामोरे जाऊनदेखील राष्ट्रैक्य टिकवावे लागते, लागलेले आहे आणि विकसनशील देशांना तशा प्रकारचा अनुभव घ्यावा लागणारच नाही याची कोणीही हमी देणार नाही.