• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९९०-४ (3)

भारतीय राजकारणाकडे वळण्यापूर्वी राजकारणाचे तरी स्वरूप काय आहे? काय असते? कशाला राजकारण म्हणावे, याचा थोडा तपशीलात जावून जर आपण विचार केला तर मला वाटते भारतीय राजकारणाचा अभ्यास करायला चांगली पार्श्वभूमी तयार होईल. एका राज्यशास्त्रज्ञाने राजकारणाची अशी व्याख्या केली आहे, “राजकारण म्हणजे कोणाला केव्हां, कसे आणि काय मिळते याचा अभ्यास.” म्हणजे या व्याख्येप्रमाणे राजकारणाचे मुख्य कार्य वाटपाचे आहे. समाजामध्ये वाटणी करणे आणि ही वाटणी कशी होते? तो म्हणतो निरनिराळ्या समाज गटांच्या तौलनिक शक्तीनुसार होते. ती नेहमीच न्याय्य होते असे म्हणता येणार नाही. कोणाला वारंवार त्यांच्या पदरांत झुकते माप पडते तर कोणाला कितीही प्रयत्न केला तरी पडत नाही. तेव्हां हे जे सामाजिक संपत्तीचे, संधीचे वितरण होते ते नेहमी कोणत्या तरी न्याय तत्वानुसार होते असे नाही तर समाजामधल्या वेगवेगळ्या घटकांच्या तौलनिक शक्तीतून जे समीकरण शेवटी निघते त्या समीकरणानुसार हे वाटप होते आणि ही शक्ती वेगवेगळ्या समाज गटांची, समाज घटकांची सारखी नसते. काही अधिक संघटित असतात. काही कमी संघटित असतात. जे संघटित असतात ते समाजाचे नाक दाबून तोंड उघडायला भाग पाडतात. आणि आपल्या पदरामध्ये अधिक माप पाडून घेतात. एक अतिशय आदरणीय अशा ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या मुंबईत मला एकदा सांगत होत्या की, “राम जोशी, आम्हा कम्युनिस्टांचे काही खरे नाही. जो कारखान्यातला कामगार आहे ज्याला आजच दोन हजार, अडीच हजार, तीन हजार रूपये महिन्याला मिळतात, त्याला पांच हजार मिळवून देण्यासाठी आम्ही संप करतो. समाजाला वेठीला धरतो आणि ज्यांना मी संघटित करते आहे तो ठाणे जिल्ह्यातला वारली अजूनही कोवळी पाने खाऊन राहतो. पण तीन हजाराचे ऐवजी पाच हजार मिळणा-या कामगाराला एकदाही असे वाटत नाही की यातले शंभर रुपये त्या वारल्यासाठी म्हणून बाजूला काढावेत. तेव्हा आम्ही साम्यवाद्यांनी वैयक्तिक आणि वर्गीय स्वार्थ फक्त प्रज्वलित केला आणि त्यातून सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित होईल अशी भाबडी आशा बाळगली.” अशी त्यांनी माझ्याकडे कबुली दिली. सामुहिक स्वार्थपरायणतेमधून सामाजिक न्याय प्रस्थापना होईल या आशावादाला शास्त्रीय आधार काहीच नाही आणि म्हणूनच संघटित वर्गीय शक्ती ही अधिक उदात्त, अधिक न्याय्य समाजरचनेची उद्गाती न ठरता आपल्यापुरतीच राहिली. हा भ्रमनिरास करणारा अनुभव आज जग घेते. सगळ्या कम्युनिस्ट विश्वामध्ये वावटळे उठली आहेत. या वावटळींच्या मागे नैतिक आणि वैचारिक भ्रमनिरास आहे. लासवेल असं म्हणतो की, “राजकारण समाजामध्ये मर्यादित असलेल्या मूल्य आणि वस्तूंचे वाटप कोणाला कधी आणि कसं करते हे वेगवेगळ्या आर्थिक हितसंबंधी गटांच्या तौलनिक शक्तीवरती अवलंबून असते.” याचाच अर्थ असा की, वेगवेगळ्या समाज गटांची शक्ती भिन्न असे, कोणाची जास्त, कोणाची कमी, कोणी अधिक संघटित, कोणी कमी संघटित, कोणी सत्तास्थानाजवळ, कोणी सत्तास्थानापासून अनेक योजने दूर. याच्यामुळे समाजामध्ये संघर्ष अपरिहार्य असतो. आणि संघर्ष आहे म्हणून राजकारण आहे. संघर्ष घडवून आणण्यासाठी नव्हे. अर्थात काही काही वेळेला राजकारण ही देखील भूमिका पार पाडते. जेथे नसेल तेथे सुद्धा संघर्षाची सुरवात करून देते. मतभेद, संघर्ष ही सामाजिक वस्तुस्थिती आहे. या वस्तुस्थितीची अनेक कारणे आहेत.