पहिला दोष असा की, सध्याच्या निवडणूक पद्धतीतून द्विपक्ष पद्धती निर्माण होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. तशी ती दिसत नाही म्हणून मी खंत करतो अशातलाही भाग नाही. कारण मी आताच आपल्याला सांगितले की हा देश इतका विविधतेने नटलेला आहे की, या सगळ्या विविध जीवनाचे दर्शन दोन पक्षांच्यामार्फतच झाले पाहिजे असे काही नाही आणि जर ते झालेच तर समाजाची सगळी विविधरंगी रूपे त्या पक्षांच्यामध्ये येणार, जसे काँग्रेसमध्ये आले. काँग्रेस ही सर्वात जास्त प्रातिनिधिक झाली त्याचे कारण काँग्रेसने आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासून समाजातल्या सर्व विचारांना, सर्व हितसंबंधांना सामावून घतले. काँग्रेस पक्ष ही आतापर्यंत एखाद्या उघड्या छत्रीसारखी संघटना आहे. बाहेर ऊन तापायला लागले, किंवा अनपेक्षितपणे वर्षाधारा सुरू झाल्या म्हणजे आपण ज्या प्रमाणे छत्रीच्या आश्रयाला जातो त्याचप्रमाणे वेगवेगळे गट हे आपल्या हेतूपूर्तीसाठी आपल्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी काँग्रेसच्या छत्रीच्याखाली जमा झाले. त्यामुळेच काँग्रेस एखाद्या विशिष्ट गटाची न बनता प्रातिनिधिक आणि सर्वसमावेशक अशी राष्ट्रव्यापी संघटना झाली. आणि इंदिरा गांधींच्या कारकिर्दीमध्ये जे घडले ते जर इंदिराजींनी टाळले असते तर काँग्रेसचे हे सर्वसमावेशक प्रातिनिधिक स्वरूप आजपर्यंतही टिकवता आले असते. अजून ही संधी गेलेली आहे असे नाही. काँग्रेसमध्ये आत्मपरिक्षणाची गरज आहे. अंतर्मुख होण्याची गरज आहे. आणि तसा प्रयत्न जर त्यांनी केला तर काँग्रेसला पुन्हा एकदा अधिक व्यापक, अधिक प्रातिनिधिक अशा स्वरूपाचे रूप धारण करणे अशक्य आहे असे नाही. काँग्रेसला जर दुसरा एकच तुल्यबळ पक्ष विरोधामध्ये उभा करावयाचा असेल तर त्यालाही जवळ जवळ काँग्रेससारखेच सर्वसमावेशक स्वरूप धारण करावे लागेल. आजचा जो राज्यकर्ता पक्ष आहे. जनता दल, त्या जनता दलाला दुसरी काँग्रेस असे नाही का म्हणता येणार? निदान त्या प्रक्रियेमध्ये असलेले काँग्रेसमधले सगळे बरे वाईट झपाट्याने आत्मसात करणारे की जनता दल असाच जर कारभार करू लागले तर दोन – चार वर्षाच्या आत प्रति काँग्रेसच उभी राहिल्यासारखी वाटेल. जर व्यापक देशव्यापी पाठिंबा मिळवावयाचा असेल तर तशा प्रकारचे सर्वसमावेशक स्वरूप राजकीय पक्षाला घेतल्यावाचून या देशाचे नेतृत्व करता येत नाही. सबंध देश बरोबर घेऊन जाता येत नाही. पक्ष सेक्टेरियन बनतात म्हणून या देशामध्ये एक ऐतिहासिक गरज अशी होती की, त्याच्यामुळे द्विपक्षपद्धती सुरू झाली नाही. अनेक पक्ष असून बहुपक्ष पद्धतीही रूजली नाही. तर प्रत्यक्षात बहुविध पक्ष असले तरी काही मधली वर्षे सोडली तर एकाच राजकीय पक्षाची सत्ता तीस-चाळीस वर्षे राहिली. त्याला भारतीय राजकारणाचे अभ्यासक एक प्रबळ पक्षपद्धती म्हणतात. One Dominant Party System या डॉमिनंट पार्टीसिस्टिममुळे स्पर्धेची पण हमी मिळाली आणि त्या स्पर्धेच्या परिणामी होणारा सत्ता बदलही टाळता आला. एकाच पक्षाचे राज्य आणि स्थिरराज्य जे देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक होते ते ही या देशाला मिळाले. त्या प्रबळ पक्षाने हुकूमशाही प्रवृत्ती धरू नयेत याकरिता आवश्यक असलेली स्पर्धादेखील काँग्रेसअंतर्गत आणि काँग्रेसबाहेर अशी सर्वत्र आपल्याला दिसून आली. ज्यावेळी काँग्रेसची अंतर्गत स्पर्धा बंद झाली त्यावेळेला सगळ्या अडचणी सुरू झाल्या. अंतर्गत लोकशाही संपली, अंतर्गत निवडणूका संपल्या, अंतर्गत दुसरे नेतृत्व उभे करण्याची प्रक्रिया संपली. उरली एक व्यक्ती आणि पक्ष म्हणजे एक प्रचंड मोठा रबर स्टँप. घटना नाही, निवडणुका नाही, कोणाला घ्यायचे ते त्या व्यक्तीने ठरवायचे. कोणाला हाकलून द्यायचे ते त्या व्यक्तीने ठरवायचे. हा जो सगळा प्रकार सुरू झाला त्याने तो पक्ष मोडीत निघाल्यासारखा झाला.