यशवंतराव चव्हाण १९५६ ते १९६२ या कालखंडात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पण १९६२ नंतरचा त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा सर्व काळ दिल्ली दरबारात खर्च झाला आहे. ‘दिल्ली दरबार’ या शब्दप्रयोगाला एक ऐतिहासिक संदर्भ आहे. पंडित नेहरूंच्या नंतर या देशाला समर्थ विचार आणि नेतृत्व देण्याचे सामर्थ्य यशवंतराव चव्हाण यांच्यामध्येच होते. परंतु त्यांचे विचार दिल्ली दरबारातील डावपेचामुळे प्रगट होऊ दिले नाहीत. पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधींच्या कारकीर्दीमध्ये राजकीय संघर्षाच्या वेळी यशवंतराव मुग्ध राहिले. इंदिरा गांधींच्या डावपेचामुळे त्यांचे अधिकच खच्चीकरण झाले. जनता राजवटीत विरोधी पक्षनेता म्हणून काम करतांना बाईंना जनता पक्षाने दिलेल्या सूडबुद्धीच्या वागणूकीचा यशवंतरावांनी लोकसभेत कधीही आवाज उठवला नाही. यामुळे ते इंदिरा गांधींच्या मर्जीतून अधिकच उतरले.
पण दिल्ली दरबारातील डावपेचांमध्ये ते उणे पडले असले तरी त्याच दरबारातील अतिशय महत्त्वाची पदे त्यांनी अतिशय प्रभावीपणे व यशस्वीपणे सांभाळली.
अशा या विविधरंगी सर्वस्पर्शी महान व्यक्तिमत्त्वाचा पुढील तीन व्याख्यानात घेतलेला आढावा.
नांव - द्वारकानाथ भगवंत कर्णिक
शिक्षण – बी. ए., एल्. एल्. बी.,
व्यवसाय – पत्रकारिता व लेखक.
जन्म – १४ जानेवारी १९१२ (बेळगांव)
महाराष्ट्र टाईम्सचे पहिले संपादक, एम्. एन्. रॉय यांचे निकटचे सहकारी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. ह. रा. महाजनी, स्व. गोवर्धनदास पारीख यांचे बौद्धिक साहचर्य लाभलेले एक ज्येष्ठ विचारवंत. दिल्लीत बारा वर्षे केसरी व इतर संस्थांचे प्रतिनिधित्व. पत्रकार, लेखक व चिकित्सक अभ्यासक म्हणून प्रसिद्ध.
वर्तमानकालीन व दैनंदिन जटील समस्यांचा शोध घेणे – त्याचे भाष्य करणे हा त्यांचा आवडता छंद आहे. वयाची पंच्याहत्तरी ओलांडली तरी समाज प्रबोधनाचे कार्य अथकपणे चालू आहे.
महाराष्ट्र टाईम्समध्ये संपादक म्हणून काम करीत असतांना अग्रलेखासारख्या गंभीर लेखनाबरोबरच ‘आशावादी’ या सदरातून त्यांनी सामान्य माणसाला पटेल आणि रुचेल असे केलेले ललित लेखन ‘काय सांगू तुम्हाला’ या पुस्तक रूपाने आजही लोकांसमोर आहे.
पत्रकारितेच्या व्यवसायात असूनही माणसांच्या आंतरप्रवृत्तीचा शोध घेणे हा त्यांचा अभ्यासविषय असून महाराष्ट्रातील महान व्यक्तिमत्वांची जवळीक याच प्रवृत्तीतून त्यांनी साधली आहे.
प्रकाशित ग्रंथसंपदा
१. हिटलर चरित्र
२. संपादकाचे जीवनस्वप्न
३. काय सांगू तुम्हाला !
४. Y. B. Chavan – A Political Biography.
५. व्ही. बी. कर्णिक (चरित्र)
६. दिल्लीतील बारा वर्षे
७. चैतन्ययुग
८. भाषांतरीत पुस्तके – मातीच्या मूर्ति, रामवृक्ष बेनीपूरी
त्यांचे निकटचे मित्र यशवंतराव चव्हाणांच्या सारख्या एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे दर्शन केवळ बुद्धिवादी किंवा वैचारिक जाणिवेतूनच नव्हे तर त्यांनी तटस्थ आणि अलिप्त पातळीवरून मानवतावादी दृष्टिकोनातून घडविले आहे.