बंधुभगिनींनो, महाराष्ट्रात सामाजिक व राजकीय सुधारणांचे प्रयत्न १९ व्या शतकाच्या अकेरपर्यंत एकाच व्यासपीठावर होत होते. नेमस्त व उदारमतवाद्यांचा प्रभाव जोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणावर होता तोपर्यंत राष्ट्रसभा व सामाजिक परिषद यांची अधिवेशने एकाच ठिकाणी व एकाच व्यासपीठावर भरत होती, याची माहिती आपल्यापैकी अनेकांना असेलच. १८८७ ते १८९५ पर्यंत राष्ट्रीय सभेच्या शामियान्याखालीच अखिल भारतीय सामाजिक परिषदा भरत होत्या. १८८५ साली नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. तिची मूळ प्रकृती व प्रवृत्ती ही सामाजिक व राजकीयदृष्ट्या सुधारणावादी होती. महाराष्ट्रात मवाळ आणि जहालमतवादी विचारप्रवाह अस्तित्वात होतेच. पण १९०१ नंतर जहालवाद्यांचा प्रभाव अधिक वाढला. जहालवादी मतप्रणाली महाराष्ट्राच्या राजकारणात अधिक तीव्रतेने पुढे जाऊ लागली. ती मूलतःच ज्वालाग्राही असल्यामुळे लोकभावनांना ती पेटवू शकली. उदारमतवादी विचारसरणीचे आवाहन भावनेपेक्षा बुद्धीलाच अधिक होते. ती मागे पडली. देशाच्या स्वातंत्र्याचा विचार करणारे मवाळ आणि उदारमतवादी हे दोघेही एका अर्थाने राष्ट्रवादीच होते. पण त्यांचा राष्ट्रवाद सर्वस्वी धार्मिक किंवा सांस्कृतिक पुनरुज्जीवनावर आधारलेला नव्हता. जहालांचा राष्ट्रवाद मात्र बव्हंशी हिंदूत्वादी पुनरुज्जीवनाव अवलंबून होता. सर्वच जहालांना सांस्कृतिकदृष्ट्या पुनरुज्जीवनवादी म्हणता येणार नाही; पण त्यातील बहुतेक लोक धार्मिकदृष्ट्या पुनरुज्जीवनवादी होते हे मी आपल्याला सांगू इच्छितो. सामाजिक अभिसरणासाठी प्रयत्न करणा-या विचारवंताचे व राजकीय स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणा-या राष्ट्रवाद्यांचे मार्ग एकमेकांपासून अलग होणे अपरिहार्य होते. त्यांची भिन्नता अटळ होती असे म्हटले तरी चालेल. एकमेकांना छेद देऊन पुढे जाणे ही देखील एक प्रकारची अपरिहार्यता होती. समाजसुधारणा आधी का राजकीय स्वातंत्र्य आधी? हा वैचारिक वाद महाराष्ट्रात निर्माण करण्यामागे राष्ट्रवाद्यांची जी भूमिका होती ती निखळ डावपेचाची (Strategy) भूमिक नव्हती. त्या भूमिकेतील भिन्नत्व सैद्धांतिक स्वरूपाचे होते. त्यामागे पुनरुज्जीवनवादी दृष्टीकोणही तितकाच प्रखर होता. महाराष्ट्रातील समाजकारणाच्या तसेच राजकारणाच्या क्षेत्रातील नेतृत्व हे प्रामुख्याने उच्चवर्गीयांकडेच होते. महात्मा फुल्यांचा व त्यांच्या सहका-यांचा अपवाद सोडला तर महाराष्ट्रातील समाजकारण आणि राजकारण हे उच्चवर्णीयांनी निर्माण केलेल्या वैचारिक आवर्तातच भरकट राहिले होते. १८९० साली फुले वारले. त्यांनी आरंभिलेल्या सामाजिक कार्याची गती चार-दोन वर्षातच कमी झाली. सत्यशोधक समाजाच्या लक्षवेधक कार्याला फुल्यांच्या मृत्यूनंतर खिळच बसली. फुले हे महाराष्ट्रातील सामाजिक असंतोषाचे जनक होते असे मी मघाशी आपल्याला सांगितले आहेच. त्यांनी निर्माण केलेली सामाजिक असंतोषाची ठिणगी त्यांच्या मृत्यूनंतर राखेखाली सापडली. पुढे राजरषी शाहूंनी तिच्यातून सामाजिक संघर्षाचा वणवा तयार केला. पण राष्ट्रीय चळवळीची लाट एवढी मोठी व तेजस्वी होती की तिनेच प्रामुख्याने काळाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. सामाजिक सुधारणेच्या कार्याला आंदोलनाचे स्वरूप लवकर प्राप्त होऊ शकले नाही. लोकहितवादी, रानडे आणि आगरकर या व्यक्तीही काळाच्या पडद्याआड गेल्या. सामाजिक परिवर्तानाचे कार्या गौण ठरले.
या उलट राजकारणाची गती झपाट्याने वाढली. राष्ट्रवादी विचारसरणी अर्थातच सामर्थ्यशाली बनली. राष्ट्रवादाला भूतकाळातील धार्मिक किंवा वांशिक परंपरा शोधाव्या लागतात. तस प्रयत्न महाराष्ट्रातही या काळात झाला. इतिहासाच्या एका विशिष्ट अवस्थेत अशा प्रयत्नांची अपरिहार्यता असते. हे अमान्य करता येत नाही. पण राष्ट्रवाद जेव्हा सांस्कृतिक किंवा सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेत प्रतिगामी शक्ती म्हणून उभा राहतो तेव्हां त्याला अभिप्रेत असणा-या स्वातंत्र्याचा अर्थ आणि आशयाला मर्यादा पडतात. स्वातंत्र्याचा अर्थ आणि आशय सर्वस्पर्शी राहत नाही. तो जेव्हां समाज परिवर्तनाच्या कार्याच्या पाठीमागे प्रेरकशक्ती म्हणून उबा राहातो तेव्हां ज्या स्वातंत्र्याची अभिलाषा तो बाळगतो त्याच्या सर्व समावेशकत्वाच्या कक्षा तो रूंदावत असतो. पण महाराष्ट्रात दुरैवाने तसे घडले नाही. विष्णुशास्त्री चिपळूणकरांना जाज्वल्या देशभक्तीचा स्त्रोत भारताच्या प्राचीन धार्मिक व ऐतिहासिक परंपरांमध्ये सापडला. चिपळूणकरांच्या वक्तृत्वप्रचूर व पांडित्यपूर्ण भाषेने राष्ट्र भक्तीला भावनिक आणि वैचारिक वैभव प्राप्त करून दिले. सामाजिक परिवर्तनाचा त्यांनी फारसा विचार केला नाही. उलट समाजसुधारकांच्या विरोधात ते उभे राहिले. बहुजन समाजाविषयी, त्यांच्य अनेकविध प्रश्नांविषयी त्यांनी आस्था दाखविली नाही. ज्ञानाच्या सर्व किल्ल्या ब्राह्मणांच्या कंबरेला बांधल्या गेल्या होत्या. ही गोष्ट खरी आहे. त्या किल्ल्यांना कोणीही हात लावू नये याचीच जणून ते काळीज वाहत होते. त्यांच् संकल्पनेतल्या राष्ट्रवादाला आणि राजकीय स्वातंत्र्याला काय अभिप्रेत होते कुणास ठाऊक. सामाजिक सुधारणांच् बाबतीत त्यांनी सातत्याने नकाराचीच भूमिका घेतली.