• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९८०-१६

मित्रांनो, महाराष्ट्रातील समाजक्रांतीच्या गंगोत्रीचा उगम फुल्यांच्या घरातील हौदातून झाला आहे हे आपणाला विसरता येणार नाही. पुण्यातील उच्चवर्णीयांच्य हौदातील पाणी त्यांच्या अंगावर अस्पृश्यांच्या पडलेल्या आणि न पडलेल्याही सावल्यांचा विटाळ धुण्यातच अधिक खर्च होत होते, हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. फुल्यांनी मात्र आपल हौद अस्पृश्यांसाठी खुला ठेवला. आपल्या देशात या पाण्याचा एक मोठा आणि दुःखद इतिहास आहे. तो इतिहास मी आपल्या समोर कथन करू इच्छित नाही, तो सांगणे म्हणजे दलितांच्या मनावर झालेल्या खोल जखमांवर मिठाचे पाणी टाकण्यातलाच प्रकार होईल. या पाण्याच्या दुःखदायी कहाणीची आठवण झाली की मला श्री. दया पवारांच्या “पाणी कुठवर आलंगं बाई” या गीताची आठवण होते. गावागावातील पाणवठ्यावरचं पाणी दलितांच्या गाडग्या-मडक्यांत व रांजणात पडू शकलं नाही हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता आहेच का? महात्मा फुल्यांच्या मानवतावादाचा प्रथमतः जो साक्षात्कार महाराष्ट्रातील अस्पृश्यांना झाला तो त्यांच्या हौदातील पाण्यामुलेच. पण त्यामागे कसलीही उपकाराची भावना नव्हती. कर्तव्यपूर्तीचा आनंद मात्र फुल्यांच्या मनाने निश्चितच भोगला असेल.

जोतीराव फुल्यांचे कार्य एका विशिष्ट समाजापुरते किंवा जातीपुरते मर्यादित नव्हते. ते व्यापक व सर्वंकष स्वरूपाचे होते. ब्राह्मणवर्गावर त्यांनी कठोर भाषेत टीका केली. वस्तुतः ब्राह्मण्य हेच त्यांच्या टिकेचे प्रमुख उद्दिष्ट होते. पण ब्राह्मण वर्गाच्या प्रश्नांकडेही त्यांनी लक्ष दिले. केशवपन व बालविधवांचे प्रश्न त्यांनी हाती घेतले. अनैतिक मार्ग अवलंबून माता बनलेल्या स्त्रियांना व त्यांच्या अर्भकांना फुल्यांनी व त्यांच्या पत्नीने सांभाळले. त्या स्त्रिया प्रामुख्याने ब्राह्मण वर्गातील होत्या. आकाशाएवढे मोठे मन असल्याशिवाय अशा प्रकारचे कार्या कोणत्याही समाजसुधारकाला करता येत नाही हे सांगण्याची आवश्यकता नाही. अशाच एका ब्राह्मण विधवेचा मुलगा फुले दंपत्तीने दत्तक घेतला. या घटनेत फुल्यांच्या व्यक्तिमत्वातली सर्व उदात्तता साठलेली आहे. एखाद्या आशयगर्भ पौराणिक कथेलाही मागे टाकणारी ही घटना आहे. ती प्रत्यक्षतः फुल्यांच्या आयुष्यात व महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात घडली म्हणून तरी तिला सत्य मानायचे. अन्यथा तिच्यावर कुणाचाही विश्वास बसला नसता. It is indeed a historic myth!

फुल्यांच्या क्रांतकारक समाजसुधारणेचा विचार करीत असताना आपल्याला १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील समाजप्रबोधनाचाही विचार करावा लागेल. एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात सामाजिक चळवळीने चांगलाच जोर पकडला होता. हे मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो. सामाजिक सुधारणेच्या विचाराला व कार्याला बळकटी आणण्याचे कार्य ज्या ज्या विचारवंतांनी व समाजसुधारकांनी केले त्यात गोपाळ गणेश आगरकर आणि न्यामूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा क्रम फार वरचा आहे. हे आपल्या लक्षात आल्यावाचून राहणार नाही. आगरकरांनी आपल्या सुधारकी विचारां पोलादी पाणी दिले होते. आणि म्हणूनच त्यांचे विचार आजही गंजलेले नाहीत. ते आजही सशक्त व सतेज आहेत. आगरकरांची निर्भिडता वाखाणण्यासारखी होती. समाज सुधारल्यशिवाय राजकीय स्वातंत्र्य स्थिर पायावर उभे राहू शकणार नाही. ही त्यांची प्रामाणिक धारणा होती. राजकीय सुधारणेपेक्षा सामाजिक सुधारणाही त्यांना अधिक अग्रक्रमाची व महत्वाची वाटली. राजकीय चळवळीला सामाजिक आशय मिळाल्याशिवाय तिला अर्थपूर्ण होता येणार नाही. असे त्यांना प्रामाणिकपणे वाटत होते. महाराष्ट्राच्या या थोर सुधारकाने बुद्धि प्रामाण्याचा अंगिकार केला व कुठलीही वैचारिक तडजोड मान्य केली नाही. आणि म्हणूनच ज्या काळात त्यांना आपले विचार मांडले त्या काळात ते अतिशय वादग्रस्त ठरले. आगरकरांना अध्यात्मिक किंवा पारलौकिक जीवनाच्या तत्वचिंतनामध्ये मुळीच रस नव्हती. व्यक्ति आणि समाजाचे भौतिक जीवन सुखी व समुद्ध करण हाच राजकारणाचा व समाजकारणाचा प्रमुख उद्देश असला पाहिजे अशी त्यांची ठाम भूमिका होती. मिल आणि स्पेन्सरच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला होता.