याचा इतिहास जर पाहिला तर ही जाणीव आपल्या स्वातंत्र्य चळवळीतून निर्माण झालेली आहे असे दिसेल. म. गांधींच्या राजकारणाचा एक सगळ्यात महत्त्वाचा पैलू हा आहे. गांधींच्या आधी अनेक पुढारी होते. गांधींच्या एवढा जनता संपर्क कुठल्याही पुढा-याला कधी जमलेला नाही. गांधींच्या इतकं लोकांना गुंतवणं कुठल्याही पुढा-यांना जमलेलं नाही. कारण गांधीजी जी भाषा बोलत असत ती अतिशय सामान्य माणसाची भाषा होती. पोषाखापासून सामान्य माणसाशी असलेलं आपलं नातं सारख ते सिद्ध करत असत, गांधींच्या चळवळीत स्त्रिया सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात त्या पहिल्यांदा बाहेर पडल्या आणि या चळवळीत सामील झाल्या. तेव्हा गांधींची चळवळ ही भारताच्या लोकशाहीला समृद्ध करणारी अशी चळवळ होती. आणि त्या चळवळीतून जी मूल्ये बाहेर पडली त्याच्यातूनच हे व्यक्तीस्वातंत्र्याचं मूल्य बाहेर पडलेलं आहे. अर्थांच व्यक्तीस्वातंत्र्याचे मूल्य आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला आपणाला हे मान्य करावयाला पाहिजे की स्वातंत्र्यावर नेहमीच मर्यादा असतात. स्वातंत्र्य भोगताना नेहमी आपल्याला काही जबाबदारीची जाणीवही लागते. स्वातंत्र्य म्हणजे मला तुम्हाला मारायचं स्वातंत्र्य नव्हे - तुम्हाला आता ऑडिअन्स मध्ये बसून माझ्यावर अंडी किंवा बटाटे फेकायचं स्वातंत्र्य याला आपण स्वातंत्र्य म्हणत नाही. व्यक्तीला त्याचं व्यक्तीमत्त्व फुलविण्यासाठी जे स्वातंत्र्य लागतं ते स्वातंत्र्य आपल्याल अभिप्रेत असतं. आणि ते स्वातंत्र्य हुकूमशाही राष्ट्रांत कधीही नसतं. 
तरुण पिढीमध्ये मला असं नेहमी दिसतं की हुकूमशाहीबद्दल अतिशय प्रेम असतं ते म्हणतात की लोकशाही पेक्षा कोणीतरी येथे डिक्टेटर आला आणि लोकांना सरळ केलं तर बरे होईल त्यांना मी नेहमीच सांगतो की जगाच्या इतिहासात लोकांच्या कल्याणासाठी झटणारा डिक्टेटर अजून जन्माला आलेला नाही. प्रत्येक डिक्टेटरनी स्वत:च्या फायद्यासाठीच स्वत:ची सत्ता वापरलेली आहे. कम्युनिस्ट डिक्टेटरशिप मध्ये सुद्धा. कम्युनिझममध्ये लोक असे सांगत की एकदा लोकाचं राज्य आलं की तिची पिळवणूक संपले, शोषण संपेल आणि मार्क्सने असं लिहून ठेवल होत की तिथं मग सरकारची काही जरुरीच लागणार नाही. State Withers पण परिस्थिती काय आहे? सोव्हिएत युनियनमध्ये स्टॅलिन काळात लाखो लोकांची कत्तल झाली हे आपणास ठाऊकच असेल. आणि चीनमध्येही तोच प्रकार झालेला आहे. हुकूमशाही राजवट ही काही गोष्टी साध्य मानत असते. त्या निर्माण करण्यासाठी कुठलीही किंमत द्यावी लागली तरी ती किंमत फारशी नाही अशी तिची श्रद्धा असते. आजपर्यंत कुठलाही डिक्टेटर नि:स्वार्थ बुद्धीने वागल्याचे उदाहरण नाही पण डिक्टेटरशिपचे खरं स्वरुप असं आहे की माणसांची मन संपूर्णपणे भरून जातात. आपणाला हा थोडासाच अनुभव आणिबाणीच्या १९ महिन्यांत आलेला आहे. टेलिव्हिजन आणि रेडिओ यांच्या वरुन सारखं सांगण्यात येत असे की अमूक अमूक व्यक्ती म्हणजे देशाची रोशनी आहे. आणि त्या व्यक्तीने दिलेली काहीतरी पाच कलमी कार्यक्रम किंवा ४ कलमी कार्यक्रम हे अतिशय लोकांच्या हिताचे होते. त्याबद्दल मी थोडेसे पुढे बोलीन. हे जे कार्यक्रम आहेत त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणावर पीछेहाट स्विकारावा लागली. कारण ते अतिशय चुकीच्या त-हेन अंमलात आले होते. पण त्या वेळेला आपणाला असं दिसलं की दुसरा कुठलाही विचार लोकांपुढं जर आला नाही तर लोक असं मानायला लागतात की हाच एक विचार फक्त शक्य आहे. दुसरे असे की या हुकूमशाहीमध्ये राज्यकर्त्यांचीही चुकीची भावना होते. काही वेळेला राज्यकर्ते लोकांना फसवत असतात. पण पुढे राज्यकर्ते स्वत:च फसत असतात. 
इंदिरा गांधीनी ज्यावेळी निवडणूक घेतली त्यावेळी त्यांची स्वत:ची अशी फसगत झालेली होती. त्याच लोकांच्यापासून दूर पडलेल्या होत्या. या लोकशाहीकरताच मुळी स्वातंत्र्य आलं. लोकशाही म्हणजे फक्त निवडणूक असा त्याचा अर्थ नाही. लोकशाहीत सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो जर न्याय मिळायला असला तर सामाजिक न्याय हे तत्त्व आपण अतिशय दृढपणे स्वीकारलं पाहिजे आणि याची जाणीव आपल्या राज्यघटनेमध्ये अतिशय समर्थपणे आहे. ही राज्यघटना फक्त आहे त्या परिस्थितीत चालविणारी नाही. बाकीच्या राज्यघटना ज्या झाल्या - अमेरिकेची राज्यघटना काय किंवा ऑस्ट्रेलियाची राज्यघटना काय - या राज्यघटनांमध्ये आपणाला असं दिसत की सरकार कसं चालावं, सरकारवर कुठली बंधनं असावी यांचा ऊहोपोह या राज्य घटनांत आहे. इतर राज्यघटनामध्ये समाजाची जी असलेली मूल्ये असतात त्यांचं रक्षण केलं जातं. पण भारतीय समाज कसा होता? जातींवर आधारलेला समाज निरनिराळ्या धर्मांचे लोक एकत्र रहात आहेत - कोणी एकमेकाचा दुस्वास करत आहेत असा समाज, भोळ्या समजुती, गंडेदोरे, ताईत यांच्या अंधश्रद्धेने पोसलेला समाज. तेव्हा या समाजाला बदलण्यासाठी ही राज्यघटना आहे आणि या परिवर्तनाच्या दिशा या घटनेत अतिशय स्पष्टपणे मांडलेल्या आहेत.

 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
			 
									 
			