अध्यक्ष महाराज, क-हाडचे मित्र, नगरपालिकेचे इतर सभासद! यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेकरता मला ज्या वेळेला श्री विठ्ठल पाटील आमंत्रण द्यायला आले; त्यावेळी त्या आमंत्रणाचा स्वीकार करताना, ज्या क-हाड गावात या महाराष्ट्र राज्याचा शिल्पकार जन्मला ते क-हाड गाव पाहण्याची उत्सुकता होती. मी यशवंतरावांना महाराष्ट्र राज्याचा शिल्पकार म्हणालो याचं कारण ते महाराष्ट्राचे निर्मिती करण्यात ज्या अनेकांचा हात लागला त्यांच्यात त्यांचा हात अतिशय समर्थपणे लागलेला आहे हे काही नाकारण्यात अर्थ नाही. पण याच्या पेक्षा महत्त्वाचं असं की यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना वैचारिक क्रांतीलाही चालना दिली.
महाराष्ट्रातील वैचारिक क्रांतीचे ते प्रवर्तक आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. आणि प्रश्न आला की मी विषय कोणता निवडावा? यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाबाबत बोलायचा मला अधिकार नाही कारण तो माझा विषय नाही. राजकारणात अनेक गोष्टी होतात यश मिळतं अपयश मिळतं. मी यशवंतराव चव्हाणांचा एक विचारवंत म्हणून इथे उल्लेख करतो आहे.
लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता ही तीन मूल्ये सामाजिक परिवर्तनाचा आधार होत. आणि यशवंतराव मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी इथल्या वैचारिक क्रांतीला जी चालना दिली त्याच्यात ते तीन विचार अतिशय प्रमुखपणे लोकांच्यापुढे आले - त्या मूल्यांसाठी आवश्यक असणा-या सामाजिक परिवर्तनावरच बोलावे म्हणून मी हा आजचा विषय निवडला. आता हा विषय निवडताना माझ्या पुढे एक अडचण अशी होती की 'राज्यघटना आणि सामाजिक परिवर्तन' हा मथळा तसा मोठा आकर्षक नाही राज्यघटना हा विषय तसा क्लिष्ट वाटतो लोकांना. लॉ कॉलेज मधील विद्यार्थी सुद्धा वर्गात येत नाहीत तर मग बाहेरचे तरी का येतील? असा प्रश्न माझ्यापुढे होता. मी कायद्याच्या एक प्राध्यापक असल्यामुळे आणि या विषयाचे अध्ययन व अध्यापन करीत असताना मला असं वाटल की ज्या घटनेची सुरवातच मुळी We the Peopel of India या अक्षराने होते-म्हणजे आम्ही भारताचे नागरिक आम्ही स्वत:ला ही राज्यघटना देतो आहोत - हे संविधान भारताच्या लोकांनी केलेलं आहे - हे काही वकिलांनी केलेलं नाही. काही न्यायाधीशांनी केलेलं नाही - विद्यापीठातील विद्वान प्राध्यापकांनी केलेलं नाही किंवा त्यांच्यासाठी ते नाही तर या भारतातला सामान्य माणूस जो आहे त्या सामान्य माणसासाठी हे संविधान आहे. ही राज्यघटना आहे. आणि म्हणून या राज्यघटनेमध्ये जी मूल्ये आहेत, जे विचार आहेत ते सामान्य माणसापर्यंत जर नेले तरच ही घटना मजबूत होते. नाहीतर या घटनेला काही अर्थ रहात नाही. एक गोष्ट आपल्याला सांगण्यासारखी म्हणजे अशी की नुकतेच आपण १९७७ साली एक अतिशय बिकट अशा परिस्थितीतून बाहेर आलो. १९७५ ते ७७ हा काळ आणिबाणीचा आणि या आणिबाणीच्या काळामध्ये जर सगळ्यात कोणती गोष्ट झाली असेल तर ती ही की या घटनेमध्ये अनेक दुरुस्त्या झालेल्या आहेत. आणि या घटनेवर प्रेम असणा-या लोकांना असे वाटायला लागले की या घटनेची मोडतोड फार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या परिस्थितीतही त्या घटना-दुरुस्तीविरुद्ध लोकमत तयार करण्याचा प्रयत्न झाला. परंतु पुन्हा जर लोकशाही धोक्यात यायची नसेल तर आपणाला ही राज्य घटना सामान्य माणसापर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे. या राज्यघटनेत ही जी मूल्ये आहेत त्या मूल्यांबाबत सामान्य माणसाला काहीतरी जिव्हाळा वाटला पाहिजे. त्याला ही मूल्ये आणली आहेत असे वाटले पाहिजे. याच्यासाठी एक खास लोकशिक्षणाचा कार्यक्रम - जो गेली ३० वर्षे कोणी घेतला नाही - तो घ्यायला पाहिजे. याची जाणीव आणिबाणीच्या काळात झाली. कारण आणिबाणीचा काळ असा होता की त्यावेळेला भाषण स्वातंत्र्य हे संपूर्ण नष्ट झालं होतं. आज आपण इतक्या मोकळेपणानं इथं बोलू शकतो. आणिबाणीच्या काळात इतक्या मोकळेपणाने बोलता आले नसते. पण त्या काळात छोट्या छोट्या सभा होत होत्या. त्या सभांना बरेच लोक जमत आणि त्यावेळेला असं वाटलं की हा जो सामान्य माणूस आहे. याला याच्यात काहीतरी रस आहे. याच्यापर्यंत हा विषय घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून हे लोकशिक्षणाचे कार्य आणिबाणी गेल्यानंतर थांबता कामा नये ते सतत चालू राहायला पाहिजे. कराण ही लोकशाही-म्हणजेच ही राज्यघटना- कारण लोकशाही राज्यघटनेवर आधारित आहे. ती जर मजबूत व्हायची असेल तर त्या राज्यघटनेचा खरा आधार सामान्य माणूस हाच आहे.