• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९७९-२४

अस्पृश्य समाजात काही गुन्हेगार जाती आहेत. मांग गारूडी ही त्यापैकीच एक महत्त्वाची जमात. या जातीतील सर्व लोकांना आपल्या गावी पाटलाकडे सक्तीने हजेरी द्यावी लागत असे. महाराजांनी ही हजेरीची पद्धत काढून टाकली. अस्पृश्यता निवारणेच्या बाबतीत महाराजांनी चार महत्त्वाचे वटहूकूम काढलें. पहिल्या वटहुकूमाने सरकारी नोकरीत ज्या अस्पृश्यांना घेतले जात असे त्या ऑफिसमधील अधिका-यांनी व इतर नोकरांनी त्यांना समतेची, ममतेची व माणुसकीची वागणूक दिली पाहिजे अशी सक्त ताकीद दिली. अशी वागणूक जे अधिकारी देणार नाहीत त्यांनी एक तर राजिनामा द्यावा किंवा त्यांना नोकरीतून मुक्त केलं जाईल. त्यामुळे सर्व स्पृश नोकरवर्गांना एक प्रकारची दशहत बसली व अस्पृश्य नोकरांशी ते मिळून मिसळून वागू लागले. दुस-या वटहुकूमान्वये सरकारी शाळा किंवा सरकारी मदत मिळत असलेल्या खाजगी दुय्यम शाळा यातील चालकांनी हरिजनांच्या मुलांना त्या शाळेमध्ये मोफत प्रवेश द्यावा व त्या मुलांशी प्रेमळपणाने वागावे. असे जे चालक करणार नाहीत त्यांची सर्व प्रकारची इमारतीच्यारुपाने, अनुदानाच्यारुपाने, ग्राऊंडच्यारुपाने वगैरे प्रकारची सरकारी मदत बंद केली जाईल. सरकारी शाळेतील शिक्षकांनी जर या प्रमाणे वागणूक केली नाही तर त्यांनी एक तर राजिनामा द्यावा. अगर त्यांना नोकरीतून मुक्त करणेत येईल. कोल्हापूर संस्थानात असलेल्या ससकारी दवाखान्यातील डॉक्टरांना उद्देशून महाराजांनी तिसरा एक वटहुकूम काढला. स्पृश्य रोग्यांना ज्या प्रमाणे डॉक्टर तपासतात, औषध देतात व त्यांची सेवाशुश्रुषा करतात त्याचप्रमाणे अस्पृश्य रोग्यांच्या बाबतीतही तशीच काळजी घेतली पाहिजे अशी सक्त आज्ञा दिली. पूर्वी अस्पृश्य रोगी डॉक्टरांचेकडे गेल्यानंतर त्याला दुरूनच डॉक्टरांशी बोलता येई. डॉक्टरांनी त्याला विचारायचं की तुला काय होतंय म्हणून आणि रोग्यांनी आपल्याला ताप आला आहे, पोटात दुखते आहे, डोकं दुखतं आहे अशा प्रकारचे उत्तर द्यायचे. रोग्याने डॉक्टर देतील ते औषध घ्यायचे. नशिबाने तो बरा झाला तर ठीक, नाही तर मेला तरी त्यांची कोणी पर्वा करीत नसत. त्या वेळची परिस्थिती अशी होती की डॉक्टराचा थर्मामीटर अस्पृश्य रोग्याच्या काखेत कधी गेला नाही, डॉक्टराचा स्टेथास्कोप अस्पृश्य रोग्याच्या छातीला कधी लागला नाही आणि डॉक्टराचा हात अस्पृश्य रोग्याच्या नाडीवर कधी पडला नाही म्हणून महाराजांनी सरकारी दवाखान्यातील डॉक्टर्स, परिचारक, परिचारिका (नर्स), ड्रेसर यांना उद्देशून एक वटहुकूम काढला की हरिजनांच्या बाबतीत इतर स्पृश्य रोग्यांप्रमाणेच त्यांना तपासलं पाहिजे आणि औषध उपचार केले पाहिजेत. असे करण्यामध्ये डॉक्टर प्रभृतीं मंडळींनी जर अनमान केला तर त्यांनी आपल्या नोकरीला राजीनामा द्यावा अगर तसे केले नाही तर त्यांना नोकरीतून कमी करण्यांत येईल. त्या नंतर महाराजांनी चौथा वटहुकूम काढून सार्वजनिक विहिरी, तळी, नदीचे पाणवठे, विश्रांतिगृहे वगैरे अस्पृश्यांना खुली केली. या ठिकाणी जी कोणी व्यक्ती अस्पृश्यता पाळील त्याला कडक शासन केले जाईल अशा प्रकारचा इषाराही देण्यास महाराज चुकले नाहीत. महाराजांनी काढलेले हे चार वटहुकूम म्हणजे अस्पृश्यतेविरुद्ध सामाजिक विषमतेविरुद्ध, वर्णवर्चस्वाविरुद्ध चढविलेले चौफेर हल्ले होते. महाराजांनी अस्पृश्यता निवारण्याच्या सद्हेतूने हे जे चार जाहीरनामे काढले त्या बाबतीत मिरजेचे सुप्रसिद्ध मिशनरी डॉक्टर वालनेस यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये अस्पृश्यता निवारणेसाठी अशा प्रकारचे जाहीरनामे काढून त्याची अंमलबजावणी करणारा हा पहिलाच राजा होता. असे महाराजांचे संबंधी गौरवपूर्ण उद्गार काढलेले आहेत. हिंदुस्थानातील इतर संस्थानिकांनी किंवा खुद्द ब्रिटीश सरकारने सुद्धा कायद्याने अस्पृश्यता दूर करण्याचा प्रयत्न कधी केला नव्हता. या पार्श्वभूमीवर महाराजांनी केलेले कार्य अभूतपूर्व होते याची साक्ष पटणारी आहे.