नुसती साधने आपण वाया घालवतो असे नव्हे तर लोकांचा विश्वासही आपण वाया घालवतो. सरकारचे मोठमोठो कार्यक्रम होतात. त्या कार्यक्रमाची सरकारने जाणीवपूर्वक चिकित्सा केली होती का? अग्रक्रम ठरवून त्याप्रमाणे अमका कार्यक्रम हाती घ्यायचा, नंतर दुसरा कार्यक्रम घ्यायचा या पद्धतीने तुलनात्मक काही निर्णय घेतले होते का? असे निर्णय घेतल्यानंतर खंबीरपणे त्यांचा पाठपुरावा केला होता का? कधी मोठ्या घटकांना कधी निर्नियंत्रण; कधी लहान घटकांना मदत; कधी मोठ्या घटकांना मदत; कधी या प्रकारचे शिक्षण; कधी त्या प्रकारचे शिक्षण. आपण प्रयोग करीत गेलो. आणि एवढेच नव्हे तर दर वेळेला दडपणाखाली वागत गेलो. त्याचा परिणाम असा की कुठलाही कार्यक्रम सिद्धीस गेला नाही. ‘नियोजन’ असा जरी कार्यक्रम घेतला तरी नेहरूंच्या मृत्यूनंतर (नेहरूंचा मृत्यू मे ६४ मध्ये) नियोजनाबद्दल धरसोड आपण केली आहे. कधी हा नियोजन मंत्री येतो, कधी तो नियोजन मंत्री येतो. ही धरसोड सार्वत्रिक आहे. ‘सॉफ्ट स्टेट’ चा जो कारभार आहे त्याचा नुसता हा भाग आहे. कुठलाही लहान कार्यक्रम घ्या. तो कार्यक्रम तरी सरकारने राबवला का? भूमिवितरणाचा कार्यक्रम घ्या. अमुक अमुक इतक्या एकरावर सिलिंग लागेल. ते सिलिंग तरी राबवले का? ते सिलिंग राबवताना इतके दोष दिसले ते दोष काढण्याचा प्रयत्न झाला का? चार भावांमध्ये जमीन वाटली, ते चार भाऊ होते. की त्यातील चौथे नाव एका बैलाचे होते? कुळकायदा आल्यावर मालकाने कुळाशी संगनमत करून कुळाला मालक दाखवला आणि मालक कूळ बनला, हे काय सरकारला माहीत नाही?
कुठलेही सॉफ्ट स्टेट हे नुसतं साफ्ट रहात नाही. तिथे भ्रष्टाचार येतो. माणसे भ्रष्टाचार करतात ती तशी प्रतिज्ञा करून भ्रष्टाचार करीत नाहीत. नेहमीच्या व्यवहारावरून त्यांच्या लक्षात येते की भ्रष्टाचाराने कामे होतात. लक्षात आले म्हणजे माणसे भ्रष्ट व्हायला लागतात. भ्रष्टाचार एकदा वाढायला लागला म्हणजे शासन हे दु:शासन होते. दु:शासन हा शब्द मी बुद्धिपुर:सर योजतो आहे. शासनाला नीतिमत्तेची चाड रहात नाही. मंत्र्यावर लोकांनी आरोप करावे, अधिका-यावर आरोप करावे, निरलस अधिका-यांवर आरोप करावे आणि तिथल्या अधिका-यांनी आणि मंत्र्यांनी ते आरोप अंगावर घ्यावे-याला काय म्हणावे? इंग्लंडमधील अलिकडील उदाहरण सांगतो. तिथं जे मजून मंत्रिमंडळ आहे त्याच्या आधी सुद्धा मजूर मंत्रिमंडळ होते. आताच्या मंत्रिमंडळामध्ये कॅलेहान नावाचा एक मंत्री आहे. तो मागच्या मंत्रिमंडळातही होता. त्यांनी एकदम राजिनामा देऊन टाकला होता. कारण एवढेच होते त्याची पत्नी ही कलावती आहे. कलावती म्हणून एका नाट्यगृहाशी तिचा संबंध होता. आणि त्या नाट्यगृहाच्या मालकाने एक पैशाचा व्यवहार केला होता आणि तो व्यवहार स्वच्छ नव्हता. ही टीका आली आणि या टीकेबद्दल कॅलेहान ह्याने राजिनामा दिला. किती दूरान्वयाने? त्याची पत्नी – ती कलावती – तिच्या थिएटरचा मालक – तो काही पैशांचा व्यवहार करतो – आणि त्या व्यवहाराबाबत शिक्षा घेतली कॅलहान ह्या मंत्र्याने. आमच्याकडे मोठमोठे आरोप होऊन सुद्धा कधीही त्याची फारशी दखल घेतली जात नाही. मग असे होते की लोकांचा विश्वासच उडतो. सरकार जे जे सांगेल, सरकार जे जे करेल त्याबद्दल लोकांना विश्वास वाटत नाही. आणि ही अवस्था देशाच्या इतिहासामध्ये अत्यंत भयावह असते. एखादा थापाड्या शिक्षक असतो, त्या थापाड्या शिक्षकावर विद्यार्थ्यांचा विश्वास नसतो आणि मग तो शिक्षक सांगतो की बाळांनो, पृथ्वी गोल आहे. ते मुलांना पटत नाही. त्या शिक्षकावर विश्वास नसल्यामुळे जसा मुलांचा विश्वास बसत नाही त्याचप्रमाणे उत्तम कार्यक्रम सुद्धा, तो उत्तम आहे हे सरकारने सांगितले तर हा, सरकारी कार्यक्रम असल्यामुळे लोकांच्या विश्वासास पात्र ठरत नाही. ही आजची अवस्था आहे: इंग्रजीमध्ये एक शब्द वापरला जातो ‘क्रेडिबिलिटी गॅप’ या देशामध्ये लोक आणि सरकार यांच्यामध्ये विश्वासाच्या बाबतीत नुसती लहानशी फट राहिलेली नाही, मोठा खंदक तयार झालेला आहे. सरकारने कुठलाही कुठलाही कार्यक्रम हाती घ्यावा आणि तो कार्यक्रम चांगला आहे असे लोकांना आज वाटण्याची शक्यता कमी राहिली ही गोष्ट मला आज सर्वांत भयावह वाटते. या देशामध्ये साधन सामग्री कमी आहे, या देशामधली माणसे पुरेशी कार्यक्षम नाहीत, वगैरे अनेक गोष्टी आहेत. पण त्यापेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्या सरकारकडे आपण आर्थिक नेतृत्व दिले त्या सरकारवर लोकांचा जितका विश्वास असायला हवा तेवढा विश्वास सरकारमध्ये काही भ्रष्टाचार आल्यामुळे आज राहिलेला नाही.