आपल्याकडील पुष्कळसे सुशिक्षित लोक त्यात काही शास्त्री पंडित सुद्धा होते नामवंत शास्त्री गोरे म्हणून त्यामध्ये होते, ते ख्रिस्त धर्माकडे आर्कषित झाले होते. तर ही जर विचारसरणी, त्या विचारसरणीचा अभ्यास करून त्या भिन्न समाजामध्ये नवीन विचार आणण्याचा प्रयत्न धुरिणांनी केला आणि समाजसुधारणा केली. राजा राममोहन रॉय यांनी ब्राम्हो समाज स्थापन केला आणि मग ख्रिस्त धर्मामध्ये जी प्रार्थना आहे, एक देव आहे इतर मूर्तिपूजा नाही. सर्वांनी एकत्र येऊन परमेश्वराचं भजन करावयाचं आहे, जातिभेद मानावयाचा नाही या गोष्टी राजा राममोहन रॉय व त्यांच्या लोकांनी ब्राम्हो समाजात आणल्या आणि समाजाला एक नवीन बैठक दिली. महाराष्ट्रामध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी आणि इतरांनी प्रार्थनासमाजाची स्थापना करून त्याला एक वेगळी बैठक दिली आणि ख्रिस्त धर्मामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यामध्ये आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न केला. तिकडे पंजाबमध्ये मुसलमानाच्या धर्मांचा प्रसाराविरुद्ध या आर्य समाजाची स्थापना झाली आणि आर्य समाजाची ही मूर्तिपूजा हिंदू समाजाला देखील मानवली नाही आणि एक वेगळे तत्त्वज्ञान घेऊन हिंदू समाजामध्ये सुधारणा होऊ लागलेल्या आहेत. हा समाज सुधारणेचा रोख एक ब्रिटिश अमदानीत जर आपण पाहिला तर फारसा चालू आहे तर फार मोठे सुधारक निर्माण झालेले आहेत. वेगवेगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या समस्यांना उत्तरे दिली आहे आणि ती उत्तरे देताना आज ज्या काही आमच्यापुढे समस्या आहेत, त्यांचा विचार करणारा दुसरा एक महान वारसा समाज सुधारक महाराष्ट्रात झाला आणि त्याच्याइतका सर्वकष दृष्टीने समाज सुधारणेचा विचार करणारा समाज सुधारक सबंध भारतामध्ये झालेला नाही. आणि तो म्हणजे म. जोतिबा फुले. त्यांच्या समाज सुधारणेचा जो आवाज का होता त्यांनी ज्या समाज सुधारणेचा चित्रपट केला होता तो चित्रपट जर आपण संपूर्णपणे अमलात आणला असता तर आज ज्या समस्या आपल्यापुढे आहेत त्या दूर झाल्या असत्या. इतर कोणत्याही समाज सुधारकाला ती दृष्टी नव्हती, ती कुवतच नव्हती, असे मी म्हणेन. भारतात पुष्कळच समस्या होत्या, पण जोतिबांनी जे चित्र नवीन समाजाचे त्यांच्याबद्दल रमाबाईंनी सांगितले आहे ती चित्रे अमलात आणणेचा जर हिंदू समाजाने प्रयत्न केला असता तर ते चित्र अमलात आणले असते तर आज ती दैन्यावस्था आपल्याला जी समाजात दिसत आहे ती मुळीच दिसली नसती. समाज सुधारण्याच्या समस्या त्यांना पूर्णपणे समजल्या होत्या तरी सर्वकष दृष्टीने त्यांनी समाज सुधारण्याचा विचार केलेला होता. जे अनिष्ट आहे त्याच्या विरुद्ध बालहत्या प्रतिबंधक चळवळ त्यांनी सुरू केली. स्त्री शिक्षण आवश्यक आहे त्यांना पटलं आणि त्यांनी स्वत:च्या पत्नीला शिकवून नंतर मुलींकरता शाळा काढल्या. आपली जर आठ मुले असतील तर त्यांचे संगोपन करण्याचा प्रयत्न केला. जातिभेद मानव जातीला कलंक आहे हे त्यांना मान्य होतं म्हणून त्यांनी जातिभेदाविरूद्ध, अस्पृश्येतेविरूद्ध शस्त्र उगारले. शेतीकडे सुद्धा त्यांनी त्यावेळी लक्ष दिले होते. शेतीच्या बाबतीत त्यांनी त्यावेळी जे सांगितले होते ते जर ऐकले असते र धान्याची ही आजची बिकट परिस्थिती आली नसती. सर्व समाजाचा एका बाजूने त्यांनी कधीच विचार केला नव्हता तर समाजाच्या सर्व समस्याचा त्यांनी सर्वकष दृष्टीने विचार केला होता आणि खरा धर्म हा मानवता आहे हे त्यांनी सांगितले होते. जोतिराव फुल्यांची दरवर्षी पुण्यतिथी करतो, त्याची स्तुतिस्तोत्रं गातो, त्यांचा वारसा सांगतो पण त्यांची शिकवण मात्र अमलांत आणीत नाही.
आता हिंदू समाजाचे एक वैशिष्ट्यच आहे कोणाही एका माणसाला मोठा करायचं, त्याला देव्हा-यात नेऊन बसवावयाचं, त्याची पूजा करावयाची पण तत्त्वं मात्र अमलात आणावयाची नाहीत. हा एक प्रकारचा आमच्या समाजाचा मोठा महत्त्वाचा भाग आहे असे म्हणावयास हरकत नाही. त्यांनी सर्वकष अशी समाजसुधारणा देशात आणली पाहिजे असे प्रतिपादन केले होते त्या प्रकारची चळवळ त्यांनी केली होती आणि मित्रहो, सांगतो की भारतातले सगळे समाजसुधारक पाहिले अगदी राजाराममोहन रॉयपासून आजच्या तारखेपर्यंत घ्या. सर्व समाजसुधारकांमध्ये जोतिरावासारखी समाज सुधारण्याची दृष्टी इतर कोणाचीही नव्हती आणि आजही कोणाचीही दिसत नाही. इतकी सर्वकष दृष्टी त्यांनी समाजसुधारणेची ठेवली होती आणि फार उत्तम असे चित्र होते ते जर पूर्ण केले नाही तर आपल्यासारखे दुदैवी आपणच असे म्हणावे लागेल. आमच्या समाजात त्या जोतिरावांच्या सारखा समाज सुधारक दिसला त्याची शिकवण आम्ही आमच्यापुढे ठेवली पाहिजे. एखादा समाज सुधारक त्यांच्याभोवती जो समाज असतो त्यांच्यावर लागू अशी तात्पुरती उपाययोजना करीत असतो. त्याचा अभ्यास केला तर आपणास असे दिसून येईल की समाजसुधारणा ही तात्पुरती असते. एखादा रोग आला आहे. रोगावर आपण औषध देत असतो रोग बरा झाला, औषध सोडून देतो. समाज सुधारणांचा विचार म्हणजे निरनिराळ्या वेळी समाजामधील दोष नाहीसे करण्याचा एक तात्पुरता विचार असल्या प्रकारचं एक मत आहे. पण जोतिरावांचे मत म्हणजे समाज पूर्णपणे उजळाला पाहिजे असे होते हे त्यांचे वैशिष्ट्य कोणत्याही समाजसेवकाला मान्य झालेलं आहे.