व्याख्यानमाला-१९७४-२१

आज आपण असे पाहातो की ही विभागणी भौगोलिकदृष्ट्या जरी डोळ्यांसमोर आणायची ठरवली तरी आपल्याला दिसून येईल की ही संपत्तिमान राष्ट्रे म्हणजे युरप (रशियासहित ) अमेरिका, कॅनडा असा हा छोटा समूह आहे. जपान सोडून सबंध आशिया, सर्व आफ्रिका, सर्व दक्षिण अमेरिका ज्याला लॅटिन अमेरिका म्हणतात हा पृथ्वीचा दुसरा राष्ट्रसमूह असा आहे की ज्या ठिकाणी अपार दारिद्रय आहे. या २० व्या शतकात विज्ञानाची इतकी प्रगती झाली, मनुष्य चंद्रावर गेला त्या विज्ञानाचा ज्याला स्पर्श झालेला नाही, त्या विज्ञानाने ती समृद्धी निर्माण केली ती काय आहे हे ज्यांना समजले नाही असा हा गरीब राष्ट्रांचा समूह आहे. आणि म्हणून भांडवलशाहीने केवळ मजूर आणि मालक अशी जगाची किंवा समाजाची विभागणी केली हे वरवर दिसणारे सत्य खरे नसून भांडवलशाहीने समृद्ध राष्ट्रे आणि गरीब राष्ट्रे अशीही विभागणी जगाची केली आहे हे सत्य आपण लक्षांत घेतले पाहिजे.

अमेरिकेमध्ये दरडोई उत्पन्न किती, हिंदुस्थान दरडोई उत्पन्न किती? अमेरिकेत किती माणसांमागे टेलिफोन आहे, किती माणसांमागे गाडी आहे, किती माणसांमागे रेडिओ आहे, ही जारी जी केवळ आपल्याला कल्पनासृष्टी वाटते तितक्यापुरतीच ही विभागणी राहिलेली नाही. परिस्थितीने निर्माम केलेली खाई इतकी भयानक आहे की आपल्याला वाटते की ही खाई कशी बुजणारच नाही. काही आंतरराष्ट्रीय निर्देशांक मी आपल्याला मुद्दाम जरा सत्य परिस्थिती कळावी म्हणून वाचून दाखवितो. हिंदुस्थानचे दरदोई उत्पन्न सध्या ५८९ रुपये आहे. अमेरिकेचे हे उत्पन्न २८,६०५ आहे. स्वीडनसारख्या युरोपीय छोट्या राष्ट्राचे दरडोई उत्पन्न २१,७८८, कॅनडा १६ हजार, पश्चिम जर्मनी १४ हजार असे हे आकडे आहेत. हेच असे निराळ्या रीतीने व्यक्त झाले आहे. दर माणसांमागे मोटारी किती, टेलिफोन किती, रेडिओ किती इत्यादि. त्याचप्रमाणे हेही आपण लक्षात घेतले पाहिजे की व्यक्तिगत उत्पन्नांच्या या आकडयाबरोबरच आणखी अनेक प्रकारची केंद्रीकरणे या छोट्या राष्ट्रांमध्ये ज्याला आपण पुढारलेले देश किंवा समाज म्हणतो त्या समाजाच्यामध्ये झालेली आहेत. एक साधा विचार, साधे सत्य असे आहे की या प्रगत झालेल्या राष्ट्रांच्यामध्ये दरडोई जे भांडवल आहे ते भांडवल युरोपमध्ये साधारणत: ८ ते १० हजार रुपये आहे आणि अमेरिकेमध्ये दरडोई १२ पासून २० हजारपर्यंत हे भांडवल गुंतवलेले आहे. हिंदुस्थानसारख्या देशामध्ये चार पंचवार्षिक योजना झाल्यानंतर दरदोई भांडवलाची गुंतवणूक ज्याच्यावर आपला रोजगार अवलंबून आहे, ती आज २०० ते २५० चे पुडे जात नाही. ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा हा जो संपन्न देशांचा एक छोटा समूह आहे त्या संपन्न देशांच्या समूहात या वस्तुस्थितीची अंगे औद्योगिक जगतामध्ये सहा टक्के काम करणारा अमेरिकेचा माणूस हा शेतीवर राबतो. एकूण कामगारांच्यापैकी बाकीचा चौ-याण्णव टक्के श्रम करणारा माणूस उद्योगधंद्यामध्ये किंवा अन्यप्रकारचा व्यवसायांमध्ये काम करतो आणि उद्योगधंद्यामध्ये राबणा-या कामगारापैकी पन्नास टक्क्यांहून अधिक कामगार 'व्हाईट कॉलर' म्हणून ज्याला आपण पांढरपेशा म्हणतो अशा प्रकारचे जगत तेथे झालेले आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की औद्योगिक क्रांतीनंतर ज्या प्रकारचा श्रमजीवी वर्ग निर्माण होईल अशी कल्पना होती त्या श्रमजीवी वर्गाच्या स्वरुपामध्ये मूलभूत स्वरुपाचा फरक पडलेला आहे, बदल झालेला आहे. मेहनत करणारा, श्रम करणारा श्रमजीवी याच्याऐवजी ज्याला आपण पांढरपेशा वर्ग म्हणतो अशा प्रकारचा श्रमजीवी वर्ग त्या देशामध्ये निर्माण झाला आहे. यातून नव्या प्रकारचे सामाजिक संबंध, नव्या प्रकारच्या भविष्यकालांसंबंधीच्या आणि उन्नतीसंबंधीच्या कल्पना निर्माण झालेल्या आहेत.