त्यापैकी २५ कोटी एकर जमीन शेतीची आहे. २५ कोटी शेतकरी जमीन कसतात. म्हणजे शेतक-याकडे सरासरी एक एकर जमीन आहे. ही सरासरी झाली. काहींच्याजवळ शेकडो एकर आहे तर काहींच्याजवळ अजिबात नाही. आपल्याकडे सरासरी एक एकर तर अमेरिकेच्या शेतक-याजवळ सरासरी १४८ एकर जमीन आहे. हा प्रकार पाहिला तर असे दिसून येते की या ठिकाणचा शेतकरी हा दुबळा घटक आहे. शेती करणारा जो कोणी असेल त्याला जास्तीजास्त सहाय्य दिले पाहिजे. त्याला समर्थ बनविण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. यासाठी अद्यावत साधनसामुग्रीचा उपयोग केला पाहिजे. आणि शिवाय सहाय्याची तरतूद अधिक वाढविली पाहिजे. शेतीकडे आपण व्यापारी किंवा धंद्याच्या दृष्टीने पाहतो. व्यापारी किवा नगदी पिके काढतो. याऐवजी अन्नपिके जास्त पिकविण्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. धान्य पिकले तरी ते मिळत नाही. गहू जास्त पिकला तरी तेवढा पदरात पडत नाही. जिल्हाबंदी, प्रांतबंदी या नियंत्रणामुळे जनतेपर्यंत तो येऊ शकत नाही. तेव्हा लोकांचे असे म्हणणं असते की ही नियंत्रणे काढली पाहिजेत आणि बाजार खुला केला पाहिजे. प्रत्येकाला अन्न मिळाले पाहिजे ही शासनाची जबाबदारी आहे. अन्नधान्याचा व्यापार करावा ही त्याची जबाबदारी नाही. खेड्यापाड्यात बाजार भरतात, त्यांनासुद्धा आठवड्यातून एकच दिवस नेमून द्यावयाचा अशी एक बातमी आली ती आपण वाचली असेल. प्रत्येक खेड्यात वेगळा दिवस अशी पूर्वीची प्रथा बंद करावयाची अशी ती बातमी. असा व्यापारात कृत्रिमपणा नको. खुलेपणा हवा. तसे झाले तर अन्नधान्याच्या बाबतीत सुकरता प्राप्त होईल. धान्य उत्पादन ( Production ) व धान्य संपादन ( Procurement) यांसाठी खेडे घटक धरण्यात आले पाहिजे. याचा अर्थ खेडे धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले पाहिजे. असे झाले म्हणजे खेड्याचे वरकड (Surplus) धान्य तालुक्यापर्यंत, तालुक्याचे जिल्हयापर्यंत, जिल्ह्याचे प्रांतापर्यंत व प्रांताचे मध्यवर्ती सरकारपर्यंत जाईल. अलीकडे बोर्लो या अमेरिकन कृषितज्ञाने तर अन्नवितरणाचा विचार एका देशापुरता करुन चालणार नाही, तो सर्व जगाचा प्रश्न आहे असे म्हटले आहे. आपल्यापुरते बोलावयाचे तर धान्य संपादनाबद्दलच्या आपल्या धोरणात खेडे हे घटक धऱले पाहिजे व ते उपयुक्त ठऱेल तसेच वितरणाबद्दल माणूस घटक धरला पाहिजे. शहरी माणसाला आठ किलो आणि खेड्यातील माणसाला दोन किलो हा भेद असता कामा नये. माणूस हा खरा घटक धरला पाहिजे. आपण असे केले तर अन्नधान्याचा प्रश्न सुटण्यासारखा आहे.६
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
६ अन्नतुटवड्याच्या संदर्भात वाढत्या लोकसंख्येचा उल्लेख करण्यात येतो. आणि ते बरोबर आहे. वाढत्या लोकसंख्येत आळा घातला पाहिजे. पूर्वापार चालत आलेल्या अनेक समजूतींना दूर करुन प्रत्येकाने आपले कुटुंब सुटसुटीत, सुदृढ, सुखी व आनंदी केले पाहिजे. मुलांचे नीट संगोपन करणे हे आईवडिलांचे कर्तव्य आहे. सर्व त-हेचे वैद्यकीय सहाय्य मोठ्या प्रमाणात पोहोचविण्याचे निरनिराळे सुलभ उपाय शोधून राबविले पाहिजेत. आज आपल्या देशात दररोज ५७००० मुले जन्मास येतात. संबंध देशाची लोकसंख्या आज ६० कोटीपर्यंत पोहोचली आहे ती २००० इ. स. मध्ये १०० कोटी होईल असे तज्ञांचे मत आहे.
सारासार विचार करता विवाहास योग्य असे वय मुलांसाठी २५ व मुलीसाठी २० वर्षे धरल्यास व याप्रमाणे विवाहाची वयोमर्यादा कायद्याने वाढविल्यास इष्ट परिणाम होईल. मुलगा व मुलगी यांना समान लेखून जास्तीत जास्त दोन अपत्यांवर समाधान मानणे हितदायी होईल. वयाच्या ६० व्या वर्षी मुलाचे वय २५ असेल तरते दोघांनाही समाधानकारक ठरेल. म्हणजे शक्यतो वयाच्या ३५ च्या पुढे मूल न होणे अधिक बरे. अशा उपायांनी लोकसंख्येत आळा घातला गेला पाहिजे.