• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९७४-२०

पुढे आपण असे पाहिले की मार्क्सचा विचार आणि लेनिनचे कर्तृत्व यांचा प्रचंड प्रभाव सगळ्या जगावर पडला. विशेषत: ज्यांना आज मागासलेले देश समजले जाते, जे अविकसित मानवीसमूह आहेत, देश आहेत त्या राष्ट्रांच्यावरदेखील हा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात पडला. त्याबरोबर कालांतराने युरोपच्या अनेक राष्ट्रांमधून विशेषत: पश्चिम युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये, स्कॅंडेनेव्हियन कंट्रीज, स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क म्हणून जी राष्ट्रे आहेत त्या राष्ट्रामध्ये समाजवादाचा आणखी एक प्रकार नियोजनाच्या द्वारा कामगार संघनाच्या जबरदस्त सामर्थ्यांच्या जोरावर जगापुढे आला. हा प्रकार घडत असताना प्रश्न असा निर्माण झाला की भारतासारख्या देशाने कुठल्या समाजवादाचा स्वीकार करायचा? कोणता समाजवाद हा आपल्या समस्यांना काही उत्तरे देऊ शकेल. या प्रश्नाचे नंतर उत्तर असे ठरले की कम्युनिस्ट राष्ट्रांमध्ये ज्या प्रकारची शासनप्रणाली अमलामध्ये आली आहे, ज्या त-हेची हुकूमशाही निर्माण झाली त्या मार्गाने आपले प्रश्न सुटणार नाहीत. म्हणून लोकशाही समाजवादाच्या मार्गाने, संसदीय पद्धतीने समाजवादाचा जो काही आशय आहे तो आपण आपल्या देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशा प्रकारचा विचार प्रबळ झाला. आणि म्हणून समाजवादाची जी चर्चा लोक करतात, विचारवंत करतात, आज ज्या समस्यांबद्दल बोलणार आहोत त्या समाजवादाच्या क्रियेमध्ये लोकशाही अंतर्भूत आहे, नागरिक स्वातंत्र्य अंतर्भूत आहे, अशा प्रकारची समाजाची एक चौकट अभिप्रेत आहे की ज्याच्यामध्ये शासनकर्ता वर्ग, सत्ताधारी वर्ग हा जनतेच्या नियंत्रणाखाली जनतेच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करीत, जनतेच्या इच्छा-आकांक्षाना काहीएक सगुण रुप देईल. परंतु मुळातच जी विचार एका औद्योगिक क्रांतीनंतर युरोपमध्ये निर्माण झाला त्या विचाराचे नेमके स्वरुप काय आहे यासंबंधी कदाचित अजून थोडा गोंधळ आहे. काही गोष्टी आपण गृहित धरतो. त्या वस्तुस्थितीमध्ये तशा नाहीत. म्हणून अविकसित देशामध्ये समाजवादाचे स्वरुप काय असेल पाहिजे हा प्रश्न अधिक महत्त्वाचा झाला आहे.

समाजवादाच्या या स्वरुपाचा विचार करण्यापूर्वी आजच्या जगाची नेमकी वस्तुस्थिती काय आहे, आर्थिकदृष्ट्या जगाची काय परिस्थिती आहे हेही थोडे पाहिले पाहिजे. आज असे मानले जाते की जगाची विभागणी साम्यवादी राष्ट्रे आणि साम्राज्यशाही राष्ट्रे अशी झालेली आहे. असा विश्वास ठेवणारे, प्रामाणिकपणे असे मानणारे लोक आणि विचारवंत आपल्याही देशामध्ये मोठ्या संख्येने आहेत. रशियाच्या नेतृत्वाखाली जगामध्ये साम्यवादाचा पुरस्कार करणारा, शांततेची आराधना करणारा एक गट आहे आणि दुसरा गट आहे अमेरिकन साम्राज्यशाहीच्या नेतृत्वाखाली काम करणारा. तो नसते लोकशाहीचे खोटे ढोंग करतो. घोषणा देतो आणि जगामध्ये आपले सत्तावर्चस्व टिकविण्याचा प्रयत्न करतो. जगाची विभागणी अशा दोन गटांमध्ये झाली आहे. साम्राज्यवादी राष्ट्रे-साम्यवादी राष्ट्रे, शांततावादी राष्ट्रे-युद्धखोर राष्ट्रे अशाप्रकारे जगाची विभागणी झाली आहे असा प्रामाणिकपणे ज्यांचा समज आहे असा एक फार मोठा वर्ग आपल्या देशात आहे. ही विभागणी खरी की खोटी हा वादाचा मुद्दा आपण बाजूला ठेवूया. प्रश्न असा आहे की जगाची विभागणी खरोखर अशीच झाली आहे का? माझ्या मताने ही विभागणी अशी झालेली नाही. जगाची विभागणी झाली आहे तो गरीब राष्ट्रे आणि श्रीमत राष्ट्रे अशीही झालेली आहे. आजच्या संबंध जगापैकी ज्यांना भांडवलशाहीने आणि नंतरच्या कम्युनिझमने समृद्धीचे वरदान दिले असा एक छोटा, जगाचा १/३ हिस्सा आहे प्रामुख्याने युरोपीय देशांचा, गौरवर्णीयांचा. काही राष्ट्रांत भांडवलशाहीने व दुस-या काही राष्ट्रांच्यामध्ये नंतर कम्युनिझममुळे उच्च अशा प्रकारचे राहणीमान हे मिळवून दिलेले आहे आणि बाकीच्या २/३ जगाचा मानवसमूह असा आहे की ज्याला आज कुठल्याही प्रकारची जीवनाची शाश्वती नाही. त्यांचे जीवनमान जगातल्या निकृष्ट अशा प्रकराचे आहे. अशी गरीब आणि श्रीमंत राष्ट्रे अशी ही जगाची विभागणी झालेली आहे.