YChavan Itihasache ek


यशवंतराव

इतिहासाचें एक पान
      

संपादक : रामभाऊ जोशी
-------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

प्रकाशकाची भूमिका

महाराष्ट्रांत आधुनिक नेत्यांच्या मालिकेंत श्री. यशवंतराव चव्हाण यांना खूप वरचें स्थान द्यावें लागले. किंबहुना नेहरू-युगांतील मराठी नेत्यांत ते अग्रगण्यच होत. कोणी बुद्धीने ज्येष्ठ असतील, कोणी शक्तीने श्रेष्ठ असतील, परंतु शक्ति-युक्ति ज्यांच्या ठायीं एकत्र आहे आणि ज्यांनी या शक्ति-युक्तीचा उपयोग कालिदासाने रघुवंशांत सांगितल्याप्रमाणे परप्रयोजनासाठी केला असे यशवंतराव होत. म्हणून ते लोकनेते ठरले.

बुद्धिवादी महाराष्ट्रांत नेतृत्व करणें ही सोपी गोष्ट नाही. येथे सारेच मानदंड उंचावलेले. त्यामुळे महाराष्ट्राचें नेतृत्व ते करीत आहेत यांतच त्यांच्या सर्वांगीण कर्तृत्वाची साक्ष मिळते.

यशवंतरावांना मी विशेषत्वाने ओळखूं लागलों संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून. मी संयुक्त महाराष्ट्र समितीचा खजिनदार व ते काँग्रेस-पक्षाचे निष्ठावंत नेते; त्यामुळे स्वाभाविकच आम्ही विरोधांत उभे होतो. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळींत अनेक किल्मिषांवर मात झाली; त्यांत जातीयतेवरहि झाली असे कांही काळ भासलें; परंतु कांहीजण कृष्णा व कोयनेंत स्नान करूनहि कोरडेच राहिले. या काळांत महाराष्ट्रांतील अनेक पुढारी फार जवळून पहातां आले. दुरून जे साजरे दिसले होते ते जवळ जातांच पोकळ ठरले. जे लहान वाटत होत ते मनाने फार मोठे आहेत असें आढळलें. त्या वेळींच यशवंतरावांच्यांतील माणुसकीच्या गहिनराने माझ्यावर छाप पाडली. महाराष्ट्राला हा माणूस एकत्र बांधून प्रगतिपथावर नेण्यास समर्थ आहे असें वाटलें.

महाराष्ट्राच्या प्रगतींतील सर्वात मोठ अडथळा त्याचा फुटिरपणा! ‘महाराष्ट्रीय मत्सरग्रस्त’ हे कल्हणाने म्हटलें याच्या बुडाशींहि हा जातीय फुटिरपणाच कारणीभूत आहे. या फुटिरपणाच्या प्रवृत्तीने सामाजिक सत्य-शोधनासहि जातीयतेने माखलें. या प्रवृत्तीशीं यशवंतरावांनी मुकाबला केला. एवढेंच नव्हे तर, आपल्या नेतृत्वाखाली सा-यांना न्याय देण्याचा सतत प्रयत्न करून महाराष्ट्रास एकसंघ व एकात्म बनवण्यासाठी ते झटले. यशवंतरावांचे मोठेंपण खरें त्यांत आहे.