• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

अभिनंदन ग्रंथ -समाजवाद आणि महाराष्ट्र राज्य

समाजवाद आणि महाराष्ट्र राज्य

- एम्.एम्.जोशी

नवभारताची उभारणी लोकशाही आणि समाजवादी स्वरुपाची असावी याबाबत आता फारसे मतभेद राहिलेले नाहीत. देशांतील सत्तारुढ पक्षानेच आता समाजवादी समाजरचनेचा पुरस्कार केलेला आहे. तें ध्येय लवकरांत लवकर कसें गाठतां येईल, त्यासाठी कोणत्या धोरणाचा अवलंब करावा, आर्थिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये समाजवादी समाजरचनेचा आविष्कार कोणत्या स्वरुपांत होऊं शकेल, इत्यादि प्रश्नांबाबत मात्र मतभिन्नता आहे आणि रहाणारच. परंतु त्यामुळे समाजवादी प्रगतीसाठी महाराष्ट्र राज्याने भरीव कामगिरी करावयाची ठरविल्यास विशेष अडचणी निर्माण होणार नाहीत. किंबहुना त्यामुळे भारतांतील समाजवादाला अनुकूल अशा शक्तींना साहाय्यत्व होईल. कारण शेवटी अखिल भारतामध्ये समाजवादाला अनुकूल असें वातावरण आणि परिस्थिती निर्माण होण्यावरच आपलें यशापयश अवलंबून आहे.

लोकशाही समाजवादाचें ध्येय महाराष्ट्राला एकट्याने गाठतां येईल अशा भ्रमांत कोणी राहूं नये. आपल्या राज्यांत परिस्थिती कांही अंशी अनुकूल आहे हे खरें. परंतु तेवढ्याने सारे प्रश्न सुटत नाहीत. महाराष्ट्रात मोठमोठाले भांडवलदार अथवा जमीनदार नाहीत. समाजवादाच्या दिशेने प्रगति करावयाचें ठरविल्यास स्वहितवादी लोकांकडून पाय मागे खेचले जाण्याची शक्यता इतर प्रांतांच्या मानाने बरीच कमी आहे. परंतु आमचा समाज गरीब आणि श्रमजीवी आहे, एवढें म्हणून भागत नाही. कारण, कोणत्याहि देशांत बहुसंख्य समाज गरीब आणि श्रमजीवीच असतो. त्या समाजावर पक्कड कोणाची आहे हाच महत्त्वाचा प्रश्न आहे.  त्या दृष्टीने पाहतां आपल्या राज्यांत जागृति अधिक असून मूठभर लोकांचीच छाप लोकमतावर नाही. परंतु या अनुकूल परिस्थिती. बरोबरच प्रतिकूल गोष्टी कांही कमी नाहीत. आमच्याकडे मोठमोठाले भांडवलदार नाहीत याचाच अर्थ असा की, महाराष्ट्राचा फार मोठा भाग औद्योगिक दृष्ट्या मागासलेला आहे. कोरडवाहू जमिनीचें प्रमाण मोठें आहे. पावसाचा रोष वरचेवर होत असल्यामुळे वारंवार दुष्काळाच्या आपत्तीला तोंड द्यावे लागतें. शेकडो प्रपंच उध्वस्त होऊन देशोधडीला लागतात. ही सारी परिस्थिती बदलायची आणि तसें करीत असतांना भांडवलशाहीची वाढ होणार नाही अशी खबरदारी घ्यायची म्हणजे भांडवलशाहीकडून जी कायें होत असतात तीं करण्यासाठी जनतेने कंबर बांधायची. भरपूर श्रम करून धनोत्पादन करायचें आणि बचत करून उत्पादनासाठी लागणा-या साधनसामुग्रीचा संचय करायचा. हें सारें आपल्याला करावें लागेल. त्यासाटी आवश्यक अशा घटकसंख्या निर्माण कराव्या लागतील. तरच शेतीची सुधारणा आणि उद्योगधंद्यांची वाढ होऊं शकेल.

समाजशरीर हें निरनिराळ्या घटक संस्थांचे बनलेले असतें. एक घटकी समाजव्यवस्था प्रगत देशांत आढळून येणार नाही. दरेक समाजाचें भरणपोषणाचें कार्य विविध संस्थांच्या मार्फत चाललेलं असतें. भांडवलशाही समाजव्यवस्था स्पर्धेवर आधारलेली आहे असें आपण म्हणतो. परतु त्यांतहि निरनिराळ्या संस्था उभ्या राहतातच. जॉईट स्टॉक कंपन्या आणि व्यापारी संस्था उभारल्या जातात. व्यक्तीला या संस्थांच्याबरोबर एकट्याने टक्क देतां येत नाही. भांडवलशाही समाजव्यवस्थेच्या जागीं समाजवादी समाजव्यवस्था निर्माण करण्याचा आपला मानस आहे. कारण त्यांत बहुसंख्य लोकांनी जीवनाची शाश्वती आणि विकासाची संधि उपलब्ध करून देतां येईल अशी आपली श्रद्धा आहे. याचा अर्थ असा नव्हे कीं, दरेक व्यक्ति पूर्णतया स्वतंत्र राहील. समाजवादी व्यवस्थेमध्ये देखील भरणपोषणाच्या कार्यासाठी निरनिराळ्या संश्था उभाराव्या लागतीलच. एकेकट्या शेतक-याला जी जबाबदारी पेलतां येणार नाहीं ती सहकारी संस्था काढून पेलावी लागेल. ग्रामपंचायतीसारख्या संस्था कार्यक्षम करून, दरेक व्यक्तीला अभय मिळेल अशी खबरदारी घेतां आली पाहिजे. कामगार संघांच्या द्वारा कामगारांनी आपल्या अधिकारांचे संरक्षण आणि आपल्या कर्तव्यांची पूर्तता केली पाहिजे. जुनी समाजव्यवस्था मोडून तिच्या जागी नवी समाजरचना उभारायची म्हणजे जुन्या संस्था मोडून त्यांच्या जागीं परिस्थितिनुसार नव्या संस्था उभाराव्या लागतात. सर्व अवयवांचे मिळून जसें मनुष्याचें शरीर बनतें त्याप्रमाणे विविध संस्था मिळूनच एक समाज बनत असतो. जातीपातीवर आणि जन्मजात उच्चनीचतेच्या कल्पनेवर आधारलेली जुनी समाजव्यवस्था मोडींत काढून सामाजिक आणि आर्थिक समानतेवर आधारलेली नवसमाजरचना आपल्याला करावयाची आहे ही समाज रचना देखील एकघटकी असूं शकणार नाही. शासन ही एकच संस्था, बाकी सर्व व्यक्ति स्वतंत्र अशी रचना होऊं शकणार नाहीं. निरनिराळ्या संस्था निर्माण करूनच तिची उभारणी करावी लागेल. जुन्या समाजरचनेमध्यें आणि त्या रचनेचे घटक असलेल्या संस्थांमुळें जो अन्याय आणि जी विषमता बहुसंख्य लोकांना सोसावी लागत होती, ती विषमता आणि तो अन्याय नाहींसा करण्याची, निदान कमींत कमी करण्याची, शाश्वती ज्या संस्थांच्या द्वारा देतां येईल, अशा संस्थांचाच आपल्याला पुरस्कार करावा लागेल. अशा संस्था कोणत्या, त्या अधिकाधिक कार्यक्षम होण्यासाठी कोणत्या कार्यपद्धतीचा आणि धोरणाचा अवलंब करणें श्रेयस्कर आहे याबाबत अनुभवाच्या आधारावर संशोधनाचें कार्य करावें लागेल.