नागपूर विधिमंडळाचं अधिवेशन चाललेलं होतं. शरदराव कुठेतरी नागपुरला जाऊन येऊन आमच्यात दररोज सामील होत होते. दिंडी निघाली तेव्हा तेही पोहराबंदीच्या जंगलात आमच्यात सामील झाले. दोन-तीन किलोमीटर दिंडीत चालत गेल्यावर पंचवीस-तीस पोलिस अधिका-यांच्या गाड्या, राखीव पोलिकांचा तळ शेतकरी दिंडीला आडवा झाला. दिंडी अडविली गेली. सगळे जंगलात रस्त्यावर थांबले. यशवंतरावांच्या हातात अटकेचं वॉरंट देताना पोलिस अधिकारी अल्मेडा व देव यांच्या डोळ्यांत पाणी होतं. दिंडीकरी शेतकरी प्रचंड घोषणा देऊ लागले. खूपच गडबड सुरू झाली. यशवतंरावांनी सगळ्यांना शांत केलं. शरदराव, एन. डी. पाटील, राजारामबापू पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली. अटक केल्याच्या कागदपत्रांवर सर्वांचे, दंडीक-यांचे सही – अंगठे झाले. त्यात पाच-सहा तास गेले. एस. टी. महामंडळाच्या बसमध्ये दिंडीतले सगळे अटक केलेले लोक बसविण्यात आले. या वेळेपर्यंत अमरावतीचे व दुसरीकडचेही बरेच पत्रकार-फोटोग्राफर त्या ठिकाणी हजर झाले होते. पहिल्या बसच्या पहिल्या सीटवर यशवंतराव बसलेले होते. पत्रकारांनी त्यांना प्रश्न सुरू केले :
“एस. टी. त किती दिवसांनी बसलात?”
“एस. टी. महामंडळाच्या उदघाटनाच्या दिवशी पहिल्यांदा, आणि त्यानंतर आत्ता दुस-यांदा बसलो.”
नंतर शरदरावच मुलाखती घेणा-या पत्रकारांशी बोलले.
आम्हांला कुठे घेऊन जाणार हे पोलिस अधिका-यांनाही नीट माहीत नव्हतं. नागपूरची दिशा दिली. बाहेरून नागपूर पास करायला सांगितलं. मध्ये अमरावतीजवळ सगळ्या गाड्या थांबविल्या. यशवंतराव चव्हाणांना पोलिस अधिका-यांनी लाल दिव्याच्या अँम्बेसिडर गाडीत बसायचा आग्रह धरला. यशवंतराव म्हणाले, “अटक केलेले गुन्हेगार लाल दिव्याच्या गाडीत घेऊन जाणं तुम्हांला हास्यास्पद होईल. मी इथेच ठिक आहे. शरदरावांनी आग्रह धरला. यशवंतराव व बापू त्या अँम्बेसिडर गाडीत बसले. मला त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीत बसण्याचा आग्रह धरला. यशवंतरावही म्हणाले म्हणून त्यांच्या गाडीत मी त्यांच्या सोबत राहिलो. अमरावती- नागपूर – भंडारा खूप धुळीच्या रस्त्यानं गाड्या हळूहळू चाललेल्या होत्या. रस्त्यांवर प्रचंड घोषणा, जल्लोष. अचानक पोलिसांवर दगडफेक सुरू झाली. शरदरावांनी सगळं शांतपणानं काबूत ठेवलं. मी रस्त्यानं यशवंतरावांचं औषध, पाणी, गोळ्या असं सगळं काळजीनं करीत होतो. भंडा-याच्या मार्केट कमिटीच्या उघड्या मैदानात दिंडीचे अटक केलेले लोक अडकविले गेले. तिथल्या भिंतीवर ‘ही जेल आहे’ असं लिहिलं. शासनाच्या आदेशानं त्या ठिकाणी कोर्ट हजर झालं. श्री. गणपतराव देशमुख व श्री. बी. एन. देशमुख या आमच्या निष्णात वकिलांनी कायदेशीर बहस सुरू केली. पाच पु-या व बटाट्याची कोरडी भाजी अशी पाकिटं आली ती आम्ही पटापटा पोटात घातली. मी यशवंतरावांनी तोंड धुण्यासाठी व बाथरूम, संडाससाठी भंडा-याच्या विश्रामगृहात घेऊन गेलो. पोलिस अधिका-यांनी तशी परवानगी दिली. तेही आमच्यासोबत आले. मी कुठून तरी चहा-बिस्किट मागवायला सांगितली. यशवतंराव संडास-बाथरूमला गेलेले होते.
त्याच वेळी त्या ठिकाणी लाल दिव्याच्या गाडीतून आरोग्यमंत्री डॉ. बळीराम हिरे आले. सोबत त्यांच्या पत्नी होत्या. मी त्यांना नमस्कार केला. ते बाथरूमकडे जाणार तसं मी त्यांना थांबविलं. यशवंतराव चव्हाण आत आहेत. असं मी त्यांना सांगितलं.
ते म्हणाले, “यशवंतराव चव्हाण इथे कसे काय?”
“त्यांना शेतकरी दिंडीत अटक झाली आहे. इथे आणण्यात आलं आहे. इथून गोंदियाला घेऊन जाणार असं मी ऐकतो. ते अर्धा तास इथे थांबणार एवढंच.”
त्यांना दिल्लीच्या अटकेचं, नागपूरच्या घडामोडीचं काहीही माहीत नव्हतं. अधिवेशन चाललेलं होतं. पण ते इकडेच कुठे फॉरेस्टमध्ये होते असं दिसत होतं.
यशवंतराव बाथरूमबाहेर आले तेव्हा सौ. हिरे यांनी त्यांना नम्रपणानं नमस्कार केला. यशवंतराव डॉ. हिरे यांना म्हणाले, “कसं काय चाललंय्? तुमच्याकडे शिक्षण व आरोग्य अशी दोन खाती आहेत तर तुम्हांला कुठलं खातं अधिक आवडतं?” डॉक्टर म्हणाले, “आरोग्य!”
यशवंतराव म्हणाले, “तुम्ही इथे थांबा. सहकुटुंब आहात. आम्ही निघतो.”