मुख्यमंत्री वसंतदादांकडे तुम्ही त्यांना समक्ष घेऊन जा, दादा ह्यात कोणत्याही अडचणी येऊ देणार नाहीत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाच्या दृष्टीनं ही महत्त्वाची बातमी आहे. यशवंतरावांनी मुख्य सचिव श्री. राम प्रधान ह्यांना फोन केला, ते वसंतदादांशी बोलले.
यशवंतराव म्हणाले: मी मुख्यमंत्री होतो तेव्हा १९६० ला राम प्रधान मुख्य सचिव होते. रवींद्र नाट्य मंदिराची जागा तेव्हा मोठी वाटायची. आज बघा ती किती अपूर्ण व लहान वाटते. म्हणून हा ‘कला प्रकल्प’ करताना रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनच्या पडतीनं सर्वींगसुंदर व्हावं ही इच्छा आहे. तो चांगला व्हावा म्हणून वांद्र्याजवळ जी जागा मागितली ती अठरा एकर आहे. त्यातली तीन-चारच एका ठिकाणी अडकून आहे. तुम्ही कला प्रकल्पासाठी अर्ध्या एकराऐवजी अडीच एकर (एक हेक्टर) जागा मागावी. मी सगळ्यांशी बोलतो. लताबाईंच्या अर्जावर वीस हजार फूट असं लिहिलेलं होतं. त्याच ठिकाणी यशवंतरावांनी माझ्याकडून १ लाख असा आकडा टाकून घेऊन १ लाख वीस हजार फूट असं करून घेतलं.
४ ऑगस्ट १९८३ रोजी सकाळी ‘वर्षा’ व मुख्यमंत्री वसंतदादांनी बोलविलेलं होतं. तिथे श्रीमती लता मंगेशकर, श्री. हृदयनाथ मंगेशकर व मी असे तिघे मिळून सकाळी गेलो. मुख्य सचिव, दोन्ही महसूलमंत्री व कागदपत्र – नकाशा त्या ठिकाणी मागविलेले होते. वसंदादांनी मुख्यमंत्री या नात्यानं स्वत:च्या हस्ताक्षरात लिहून अडीच एकराच्या कला प्रकल्पाच्या अर्जावर सही करून तसे स्पष्ट आदेश सगळ्यांना दिले. यशवतंरावांचा फोन होता हा संदर्भही आम्हांला दिला.
वसंतदादांच्या नंतर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी व खास करून त्यांच्या महसूलमंत्र्यांनी ही वांद्र्यांची जमीन किंवा कोणतीही अन्य जमीन लता मंगेशकरांना देता येणर नाही असं खास पत्र मला व श्रीमती लता मंगेशकराना पाठविलं. श्रीमती लता मंगेशकरांनीसुद्धा पुन्हा असं काहीच करायंच नाही हे काम ठरविलं. व कुठे शब्दही न बोलता ते स्वप्न गाडून टाकून अपमान सहन केला.
एका बाजूला साहित्य – कला – संस्कृतीचा प्रकल्प महाराष्ट्रात होतो आहे म्हणून त्याच्या उभारणीसाठी जिवाचा आटापिटा करणारे यशवंतराव व दुसरीकडे त्याच ठिकाणी हे दुसरे राव!
एकदा औरंगाबादेला यशवंतराव येणार होते. ती तारीख त्यांनी मला पत्रानं कळविली. संध्याकाळी आठ वाजल्यानंतर मी इतर कोणालाही भेटणार नाही. भालचंद्र नेमाडेंची ह्या वेळी भेट व्हावी. कसं ते तुम्ही ठरवा. मी सुभेदारी विश्रामगृहात आहे, असंही लिहिलं. मी त्याप्रमाणे आखणी केली. भालचंद्र नेमाडे व यशवंतराव ह्यांचा खूप पत्रव्यवहार झालेला होता. मनानं, विचारानं ते एकमेकांच्या खूप जवळ होते पण भेट कधीच झालेली नव्हती. यशवंतरावांनी आता आत्मचरित्र लिहावं असी नेमाडेंची फार इच्छा होती. चंद्रकांत पाटील व मी भालचंद्र नेमाडेला घेऊन सायंकाळी आठ वाजता सुभेदारी रेस्ट हाऊसवर आलो. बाहेरच्या व्हरांड्यात प्रवेशदाराशी थांबलो. औरंगाबाद, जालना, नगर अशा अनेक ठिकाणचे आमदार, खासदार, पुढारी गर्दी करून होते. मी त्यांच्याकडे खोलीत गेलो. मला पाहताच त्यांनी ‘नेमाडे आले का?” असं विचारलं. बाहेर थांबले आहेत असं मी सांगितलं. ताबडतोब यशवंतराव उठले व बाहेर आले. नेमाडेंची ओळख करून दिली.
यशवंतराव नेमाडेला मनापासून भेटले व त्याचं स्वागत केलं. नेमाडेना त्यांच्या खोलीत घेऊन गेले. दोघांची खूप दिवसांची घनिष्ट मैत्री असावी असं छानपैकी भेटणं झालं. नगरचे त्या वेळचे खासदार आठल्ये पाटील; श्रीरामपूरचे, औरंगाबादचे नेते व आमदार नेहमीचं सांगू लागले. यशवंतरावांनी हात जोडून नम्रपणानं त्यांना सांगितलं, मला आता तुमच्याशी कोणाशीही बोलता येणार नाही. सकाळी भेटू व बोलू. यांच्याशी मला आता भेटू द्या. अनेक भेटी व चर्चा झालेल्या असाव्यात असं दोघांच्या भेटीचं व चर्चेचं स्वरूप होतं. इतर गप्पा झाल्यावर नेमाडेनं यशवंतरावांनी आत्मचरित्र लिहावं असा आग्रह धरला.