यशवंत चिंतनिका १२

गांधी-विचार : मानवजातीचा ठेवा

गांधीजींनी जे विचार दिले आहेत, ते युगायुगांत पुरणारे विचार आहेत. एका देशासाठी, एका पिढीसाठी किंवा एका विशिष्ट समाजासाठी गांधीजी जगले नाहीत. त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांपैकी प्रत्येक गोष्ट आंधळेपणाने आपण स्वीकारावी, अशी त्यांचीही अपेक्षा नव्हती. राजकीय स्वातंत्र्यप्राप्तीशी संबंधित नसणा-या अशा कितीतरी मूलभूत विषयांवर गांधीजींनी मौलिक विचार प्रदर्शित केले आहेत. त्या विचारांचा अभ्यास बदललेल्या काळात व नव्या दृष्टिकोनातून त्या पिढीत चालू व्हावा आणि स्वत:ला पटणारे विचार प्रत्यक्ष कृतीत आणणारे धाडसी प्रयोगवीर निर्माण व्हावेत, एवढीच अपेक्षा आहे. गांधीजींच्या जीवनकार्याचे यथार्थ मूल्यमापन करण्याची शक्ती आपल्याला आहे असे समजणे धाडसाचे होईल; परंतु काळ जसजसा उलटत जाईल, तसतसा गांधी-विचारांचा आशय अधिक स्पष्ट होऊन मानवजातीचा एक अलौकिक ठेवा म्हणून त्यांची महती वाढत जाईल, अशी माझी अपेक्षा आहे.