शैलीकार यशवंतराव ५

राजकारणात वावरतांना यशवंतरावांनी साहित्याकडे पाठ फिरविली नाही.  प्राचीन व समकालीन कवी-लेखकांचे साहित्य हा त्यांच्या वाचन-मनन-चिंतनाचा विषय होता.  भाऊसाहेब माडखोलकरांच्या राजकीय कादंबर्‍या असोत वा ग. दि. माडगूळकरांचे काव्य.  माडखोलकरांना ते सारस्वताचा 'रत्‍नकोश' मानीत.  ग. दि. माडगूळकर हे शब्दसृष्टीचे ईश्वर होते.  त्यांची शब्दसिद्धी हा यशवंतरावांच्या कुतुहलाचा विषय होता.  'पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा', ही गीतरामायणातली ओळ त्यांना अंतर्मुख करीत असे.  ग. दि. माडगूळकर गेले तेव्हा त्यांना अपार दुःख झाले.  'पापण्यात गोठविली मी नदी आसवांची' ही ओळ त्यांच्या थरथरत्या ओठांवर आली.

यशवंतरावजींच्या बोलण्यातील व लिहिण्यातील लय सारखीच होती.  त्यातली शब्दयोजना (Syntax) सारखीच आहे.  जणू ते बाह्यजगताशी संवाद करीत आहेत.  'भाषण म्हणजे संवादच' अशी त्यांची धारणा होती.  लेखन म्हणज देखील संवादच.  त्यांचा तो विविध पातळ्यांवरचा संवाद असायचा.  'आपुलाचि संवाद आपुल्याशी', असे स्वरूपही त्याला प्राप्‍त व्हायचे.  त्यांच्या संवादात लय व लालित्य होते.  साहित्याचा आस्वाद म्हणजे सोने लुटणेच !  यशवंतरावांचे सहज बोलणे म्हणजे देखील साहित्यच !  त्यांची शैली अप्रतीम !  तिच्यावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मुद्रा ठळकपणे उमटलेली होती.  Style is the man हे खरेच आहे.

आत्मचरित्रातदेखील लेखक आणि त्याची शैली या दोन्ही गोष्टींचे दर्शन घडते.  यशवंतराव चव्हाणांचे आत्मचरित्र 'कृष्णाकाठ' (१९८४) हे मराठी साहित्याचे लेणे आहे.  ते एका कालखंडाचे लालित्यपूर्ण चिंतन आहे.  तीन खंडात त्यांना ते लिहावयाचे होते.  पण एकच खंड प्रसिद्ध झाला.  त्यांच्या आयुष्याची जडणघडण कशी झाली याचे उत्तम चित्रण 'कृष्णाकाठ' मध्ये आहे.  

'नका बाबांनो, डगमगू
चंद्र-सूर्यावरील जाई ढगू...'

असा आशावाद त्यांच्या आईच्या ओवीतून त्यांना आयुष्यभर मिळाला.  कृष्णा-कोयनेने त्यांच्यावर संस्कार केले.  विठाई व कृष्णाई या दोन मातांच्या संस्कारांनी ते घडले.  या आत्मचरित्रात अभिनिवेश नाही.  उत्कटता मात्र आहे.  मनाची संवेदनशीलता आहे.  नकळत या हृदयीचे त्या हृदयी घालण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे.  यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वात एक कवी दडलेला आहे.  तो 'कृष्णाकाठ' मध्येही व्यक्त झालेला आहे.  वाचनीयता हे या आत्मकथेचे वैशिष्ट्य आहे आणि वाचनीयता हेच तर उत्कृष्ट साहित्याचे व्यवच्छेदक लक्षण असते.  

आत्मचरित्र हा वाङ्‌मय प्रकार ललित साहित्यात मोडत नाही.  त्याचा समावेश वैचारिक साहित्यात होतो.  काल्पनिकतेला त्यात मुळीच थारा नसतो.  वास्तव हाच त्याचा आत्मा असतो.  यशवंतरावांनी 'कृष्णाकाठ' मध्ये आपले भावविश्व ओतले आहे.  या आत्मकथेचा आरंभ व शेवट हे दोन्ही लक्षात घेतले तर आपण कादंबरी वाचीत आहोत असे वाचकाला वाटेल.  या आत्मकथेचे लावण्य जितके तिच्यातील शब्दलालित्यात आहे, तितकेच ते तिच्यातील आशयलालित्यातही आहे.  तिचा आरंभ उत्कंठा वाढविणारा आहे, तर शेवट उत्कटता वाढविणारा.  ललित साहित्यचेच हे गुणविशेष आहेत.

यशवंतराव चव्हाणांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते.  राजकारण, समाजकारण, अर्थकारण, साहित्यकारण व संस्कृतीकारण अशा पंचकारणांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला समृद्धी दिली होती.  'आलो याचि कारणाशी' हेच जणू त्यांना सांगायचे होते.  सत्यम्-शिवम्-सुंदरम्चा शोध त्यांनी साहित्याच्या माध्यमातून आयुष्यभर घेतला.  शेवटी कला-साहित्याचा आस्वाद तरी दुसरे काय असतो ?  कशासाठी असतो ?  सत्यम्-शिवम्-सुंदरम्चा शोध म्हणजेच कला-साहित्याचा आस्वाद !  त्याच्या आस्वादातून देखील एक प्रकारची अनुभूती प्राप्‍त होते.  यशवंतरावांनी ही अनुभूती आपल्या शब्दांत जीवन ओतून व्यक्त केली आहे.  त्यांना जे भावले व स्पर्शून गेले ते त्यांनी व्यक्त केले.  तोही एक प्रकारचा आविष्कारच आहे.  साहित्य निर्माण होते ते अशा प्रकारच्या आविष्कारातून.  त्याच्यावर इंद्रधनुष्याची दाट सावली पडलेली असते.